२०० कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणातील आरोपी महाठग सुकेश चंद्रशेखर हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुकेश चंद्रशेखर याने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला लिहिलेल्या एका ताज्या पत्रात तिला नाताळाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्रीवरील प्रेम व्यक्त करताना, त्याने पत्रात तिला बेव्हरली हिल्समध्ये एक व्हिला (बंगला) भेट देण्याबद्दल आणि त्याचे नाव “लव्ह नेस्ट” ठेवण्याबद्दल देखील सांगितले आहे.
“तुला मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा. हा तो सण आहे जो नेहमीच मला तुझ्यासोबतच्या खास क्षणांची आणि अनुभवांची, तुझ्याबद्दल असलेल्या वेड्या प्रेमाची आठवण करून देतो, जो नेहमीच खरोखर संस्मरणीय असतो,” असे सुकेशने पत्रात लिहिले आहे. सुकेशने जॅकलीन लिहिलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, त्याने तिला तिच्या खास भेटवस्तूबद्दल सांगताना तिच्या ‘बनी’चे हास्य पाहू शकत नसल्यामुळे दुःख होत आहे.
“या खास दिवशी भेटवस्तू उघड करताना मी तुझे हास्य पाहू शकत नाही याचे मला दुःख आहे. या सुंदर दिवशी, मी तुला बेव्हरली हिल्समधील तुझे नवीन, आमचे नवीन घर “द लव्ह नेस्ट” देत आहे,”असे अनेक गुन्हेगारी खटल्यांचा सामना करणाऱ्या सुकेशने पत्रात म्हटले आहे. पुढे त्याने म्हटले आहे की, “हे तेच घर आहे जे मी तुझ्यासाठी आणि आमच्यासाठी बनवले होते, जे तुला वाटले होते की पूर्ण होणार नाही.” घर पूर्ण केल्याचा अभिमान असल्याचे सुकेश याने म्हटले आहे. घराभोवती एक खाजगी असा १९ होल गोल्फ कोर्स असल्याचा उल्लेखही पत्रात आहे.
हे ही वाचा..
‘ऑपरेशन डेव्हिल हंट फेज-२’ पुन्हा सुरू
टोरोंटोमध्ये भारतीय वंशाच्या महिलेची हत्या
उत्तर प्रदेशात महिला उद्योजकतेला मजबूत आधार
मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र लढणार
सुकेश हा जॅकलीन हिला सातत्याने पत्र लिहित असतो. होळी, ईस्टर किंवा स्वतःचा वाढदिवस असो, अशा अनेक प्रसंगी तिला शुभेच्छा देत असतो. जॅकलीन हिने यापूर्वी सुकेशच्या तिला उद्देशून लिहिलेल्या पत्रांच्या मालिकेवर आक्षेप घेतला होता आणि या संदर्भात दिल्ली न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. सुकेशशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जॅकलिनला सह-आरोपी म्हणून नाव दिले आहे. ईडीने आरोप केला आहे की सुकेश गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी आहे हे माहित असूनही तिला सुकेशकडून ७ कोटी रुपयांच्या दागिने, कपडे, वाहने आणि इतर वस्तू अशा महागड्या भेटवस्तू मिळत राहिल्या. जॅकलिनने आरोप फेटाळले आहेत आणि म्हटले आहे की तिला त्याच्या गुन्हेगारी इतिहासाची कोणतीही माहिती नव्हती.







