छापखान्यातून नव्हे, प्रश्नपत्रिका तयार करतानाच फोडला नीटचा पेपर

सीबीआयच्या आरोपपत्रातून धक्कादायक माहिती उघड

छापखान्यातून नव्हे, प्रश्नपत्रिका तयार करतानाच फोडला नीटचा पेपर

नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या आरोपपत्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपासानुसार, राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (एनटीए) कंत्राटी विषयतज्ज्ञांनीच गोपनीय प्रक्रियेदरम्यान प्रश्नपत्रिका बाहेर काढून ती दलालांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली. ही पेपरफुटी छापखान्यातून नव्हे, तर प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या गोपनीय टप्प्यातच झाल्याचा दावा सीबीआयने केला आहे.

सीबीआयने आरोपपत्रात तीन कंत्राटी विषयतज्ज्ञांची नावे नमूद केली आहेत. मनीषा गुरुनाथ मंधारे (वनस्पतिशास्त्र व प्राणिशास्त्र), प्रल्हाद विठ्ठलराव कुलकर्णी (रसायनशास्त्र) आणि मनीषा संजय हवालदार (भौतिकशास्त्र) हे प्रश्नपत्रिकेचे भाषांतर, उलट भाषांतर (बॅक-ट्रान्सलेशन) आणि मुद्रितशोधन (प्रूफरीडिंग) या गोपनीय प्रक्रियेत सहभागी होते. याच टप्प्यात त्यांनी प्रश्नपत्रिकेतील प्रश्न बाहेर काढल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.

सीबीआयच्या तपासानुसार, प्रश्नपत्रिकेची छापील प्रत चोरी करण्यात आली नव्हती. त्याऐवजी संबंधित तज्ज्ञांनी प्रश्न हस्तलिखित स्वरूपात लिहून, काही प्रश्नांची छायाचित्रे काढून तसेच तोंडी माहिती देऊन ती बाहेर पोहोचवली. त्यानंतर ही माहिती पीडीएफ स्वरूपात तयार करून टेलिग्रामसह विविध डिजिटल माध्यमांतून पुढे पाठवण्यात आली. तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या हस्तलिखित नोट्सची न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) तपासणी करण्यात आली असता त्या ३ मे रोजी झालेल्या नीट-यूजी परीक्षेतील प्रश्नांशी जुळत असल्याचे निष्पन्न झाले.

सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, या पेपरफुटीचे रॅकेट महाराष्ट्र, राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये कार्यरत होते. प्रश्नपत्रिका विविध मध्यस्थ आणि एजंटांच्या माध्यमातून निवडक उमेदवारांपर्यंत पोहोचवण्यात आली. यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाणघेवाण झाल्याचा संशयही तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. हा संपूर्ण कट अनेक स्तरांवर आखण्यात आल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

सौदी अरेबिया-पाकिस्तान-तुर्कीची नवी संरक्षण आघाडी ‘इस्लामिक नाटो’?

भारतीय हवाई दलाला मिळाल्या पहिल्या महिला ‘टॉप गन’

कॅलिफोर्नियात ट्रेकिंगला गेलेल्या भारतीय वंशाच्या पीएचडी विद्यार्थ्याचा मृत्यू

मुलांच्या मानसिक आरोग्याशी खेळ महागात; मेटाला ४,७०० कोटींचा दणका

सीबीआयने या प्रकरणात सविस्तर आरोपपत्र न्यायालयात दाखल केले असून, अनेक आरोपींवर गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक करणे आणि गोपनीय माहितीची बेकायदेशीर देवाणघेवाण केल्याचे गंभीर आरोप ठेवले आहेत. या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायालयात सुरू असून, तपास यंत्रणा आर्थिक व्यवहार, मध्यस्थांची भूमिका आणि पेपरफुटीचा लाभ घेतलेल्या उमेदवारांचा शोध घेत आहे.

Exit mobile version