आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यात घडलेली एक अनोखी घटना सध्या देशभर चर्चेचा विषय ठरली आहे. घरफोडी करून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या चोरट्यांना अवघ्या १५ दिवसांत आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला. त्यामुळे त्यांनी चोरीतील बहुतांश ऐवज परत करत घराबाहेर माफीचे हस्तलिखित पत्र ठेवले. या घटनेने नागरिकांसह पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.
काकीनाडा जिल्ह्यातील करापा मंडलातील रामकंचिराजू नगर येथे राहणारे नामाला गणेश हे १८ जुलै रोजी कुटुंबासह आपल्या मूळ गावी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडत घरात प्रवेश केला आणि सुमारे ६.५० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच ५० हजार रुपये रोख घेऊन पलायन केले. घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात येताच गणेश यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि इतर धागेदोरे तपासण्यास सुरुवात केली.
हे ही वाचा:
राष्ट्रीय जनता दलाला बाजुला ठेवत मुस्लिम प्रशांत किशोरच्या पाठीशी
शेअर बाजाराला ब्रेक! सेन्सेक्स २१० अंकांनी घसरला
राममंदिर दान प्रकरणात साधू-संतांचा कोणताही संबंध नाही
ओल्ड मॉन्क, रॉयल चॅलेंजवर FSSAI चा दणका
मात्र, चोरीनंतर तब्बल १५ दिवसांनी या प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळाले. पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी चोरीतील बहुतांश सोन्याचे दागिने आणि उरलेली रोख रक्कम गणेश यांच्या घराबाहेर ठेवली. त्यासोबत एक हस्तलिखित माफीचे पत्रही ठेवण्यात आले होते. त्या पत्रात, “आमच्याकडून मोठी चूक झाली. आम्हाला माफ करा. चोरी केलेल्या पैशांपैकी २२ हजार रुपये खर्च झाले आहेत, त्यामुळे ते परत देऊ शकत नाही. उर्वरित सर्व सामान परत करत आहोत,” अशी कबुली देण्यात आली होती.
घराबाहेर स्वतःचे दागिने आणि पैसे परत मिळाल्याचे पाहून गणेश आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला. जरी २२ हजार रुपये परत मिळाले नसले, तरी लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने सुरक्षित परत मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, चोरीचा ऐवज परत मिळाल्याने प्रकरण संपलेले नसून चोरी हा गंभीर गुन्हा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. माफीचे पत्र ठेवणाऱ्या आणि चोरी करणाऱ्या आरोपींची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू असून, त्यांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. चोरीनंतर चोरट्यांनी पश्चात्ताप करून ऐवज परत केल्याची ही दुर्मीळ घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.
