आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या २०२४ मधील बलात्कार-हत्या प्रकरणात तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) माजी आमदार निर्मल घोष यांना पश्चिम बंगाल पोलिसांनी गुरुवारी अटक केली. ते उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील पानीहाटी मतदारसंघाचे माजी आमदार असून, विधानसभेतील टीएमसीचे माजी मुख्य प्रतोदही होते.
पीडितेच्या मृतदेहावर घाईघाईने अंत्यसंस्कार केल्याच्या आरोपावरून घोष यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ९ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री पानीहाटी येथील एका स्मशानभूमीत निर्धारित प्रक्रियांचे पालन न करता अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे मृतदेहाचे पुन्हा शवविच्छेदन करण्याची शक्यता संपवण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर बैरकपूर पोलीस आयुक्तालयाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. पीडितेच्या वडिलांनी खरदह पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनंतर नव्याने एफआयआर नोंदवण्यात आला. त्यात निर्मल घोष यांच्यासह पानीहाटी नगरपालिकेचे टीएमसी नगरसेवक सोमंथ डे आणि पीडितेच्या कुटुंबीयांचे शेजारी संजीव मुखर्जी यांची नावे आहेत.
एफआयआरनंतर घोष फरार झाले होते. त्यांनी पोलिसांना चकवा देण्यासाठी नवीन मोबाइल सिमकार्ड वापरल्याचे तपासात समोर आले. बुधवारी त्यांचा ठावठिकाणा ओडिशातील पुरी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर बैरकपूर पोलिसांच्या पथकाने पुरीतील एका हॉटेलमधून त्यांना अटक केली.
हे ही वाचा:
नांदेडमध्ये अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंह बादल यांच्यावर हल्ला
बांगलादेश अंधारात! १० तास लोडशेडिंग, ८ वाजताच दुकानं बंद
पंजाबमध्ये ‘हायटेक कॉपी’ प्रकरणानंतर ४५४ फार्मसी ऑफिसरच्या भरतीला ब्रेक
ऐतिहासिक क्षण! लोकसभेच्या कामकाजाची सुरुवात प्रथमच ‘वंदे मातरम्’ने
घोष यांना प्रथम ओडिशातील न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांडवर कोलकात्यात आणले जाणार आहे. त्यानंतर शुक्रवारी त्यांना बैरकपूर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येईल. पुढील चौकशीसाठी पोलिस कोठडीची मागणी केली जाणार आहे.
दरम्यान, तपासात पीडितेच्या अंत्यसंस्कारावेळी निर्धारित शुल्क माफ करण्यात आल्याचा आणि कुटुंबातील सदस्याची स्वाक्षरी नसतानाही अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
