स्वच्छतेचा फज्जा, डॉमिनोजला झटका; सातारासह मुंबईतील चार आउटलेट्सचे परवाने रद्द

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

स्वच्छतेचा फज्जा, डॉमिनोजला झटका; सातारासह मुंबईतील चार आउटलेट्सचे परवाने रद्द

महाराष्ट्रात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेवर आणि स्वच्छतेवरून अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. राज्यातील प्रमुख रेस्टॉरंट ब्रँड्सच्या आउटलेट्सची विशेष तपासणी मोहीम राबवताना डॉमिनोज पिझ्झाच्या चार आउटलेट्सचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यापैकी तीन आउटलेट्स मुंबईतील असून एक सातारा जिल्ह्यातील आहे.

अन्न व औषध प्रशासनाने ११ ऑगस्ट रोजी १०४ रेस्टॉरंट्स आणि खाद्य आस्थापनांची तपासणी केली. यामध्ये डॉमिनोजसोबत केएफसी, पिझ्झा हट, सब-वे, बर्गर किंग, मॅकडोनल्ड, स्टारबक्स आणि मॉन्जिनीस यांसारख्या प्रमुख ब्रँड्सच्या आउटलेट्सचा समावेश होता. तपासणीदरम्यान दोन आस्थापनांचे कामकाज तात्काळ थांबवण्यात आले, तर ९५ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या. पाच खाद्य व्यवसाय परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले.

मुंबईतील विलेपार्ले पश्चिम येथील जुबिलंट फूडवर्क्सच्या डॉमिनोज आउटलेटचा परवाना निलंबित करण्यात आला. येथे FSSAI परवाना दर्शविणे, पिण्याच्या पाण्याची तपासणी, अन्न साठवणूक, कीड नियंत्रण आणि स्वच्छता याबाबत त्रुटी आढळल्या. गोठवलेल्या तसेच इतर खाद्यपदार्थांसाठी योग्य तापमान राखण्याचे निर्देशही देण्यात आले. तपासणीदरम्यान अन्न आणि इतर वस्तूंची योग्य विल्हेवाट व स्वतंत्र साठवणूक न केल्याचेही आढळले. स्वयंपाकघरातील मागील दरवाजा, फरशी आणि चिलिंग रूममध्ये दुरुस्तीची गरज असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने नमूद केले. उंदीर आणि इतर कीटकांचा प्रवेश रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले.

बोरिवली पश्चिम येथील डॉमिनोज आउटलेटला तपासणीत ५४ टक्के अनुपालन गुण मिळाले. अन्न साठवणूक, तापमान नियंत्रण, अन्नपदार्थांची तपासणी, स्वच्छता आणि कीड नियंत्रणात त्रुटी आढळल्या. कच्चे आणि शिजवलेले अन्न तसेच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ स्वतंत्र ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.

हे ही वाचा:

रेवण्णाच्या कोठडीतून जप्त केलेल्या फोनमध्ये ९० अश्लील व्हिडिओ

पाक गृहमंत्र्यांकडून हाफिज सईदचे गुणगान; भारताला धमकी

दिल्लीतील लाल किल्ला स्फोटामागे अल-कायदा?

३६ वर्षांनंतर काश्मिरी पंडित पिता-पुत्र हत्याकांडाची फाईल पुन्हा उघडली

घाटकोपर पश्चिमेतील आर-सिटी मॉलमधील डॉमिनोज आउटलेटचाही परवाना निलंबित करण्यात आला. येथे स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाची योग्य व्यवस्था नसल्याचे, नियमित स्वच्छता वेळापत्रक ठेवले नसल्याचे आणि कीटकांचा प्रादुर्भाव आढळल्याचे अन्न व औषध प्रशासनाने नमूद केले. याशिवाय सातारा जिल्ह्यातील आउटलेटला केवळ ४७ टक्के अनुपालन गुण मिळाले. पायाभूत सुविधा, उपकरणे, स्वच्छता आणि कीड नियंत्रणातील त्रुटींमुळे कारवाई करण्यात आली.

Exit mobile version