मुंबईतील मालाड पूर्व दिंडोशी येथील संतोष नगर मार्केट परिसरात रविवारी संध्याकाळी दोन गटांत किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली आहे,त्यात ३ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी दिंडोशी येथील संतोष नगर बाजारपेठेत दोन गटांतील तरुणांमध्ये कोणत्यातरी कारणावरून बाचाबाची झाली. सुरुवातीला शाब्दिक असलेला हा वाद काही वेळातच विकोपाला गेला आणि दोन्ही बाजूचे लोक आमनेसामने आले. बघता बघता याचे रूपांतर दगडफेक आणि मारहाणीत झाले. घटनेची माहिती मिळताच दिंडोशी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
हे ही वाचा:
ट्रॉफीचोर पाकड्या मोहसीनचे हसीन सपने!
पडद्यामागचं मार्गदर्शन; मैदानावर डेविडचा जलवा
भाजपा प्रवेशानंतर लिएण्डर पेस यांना ‘एक्स’ दर्जाची सुरक्षा
समान नागरी कायदा आणि ‘वन नेशन, वन इलेक्शन’ हे पुढील मिशन!
गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सुरुवातीला जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले, मात्र काही आंदोलक आणि समाजकंटकांनी पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी सौम्य लाठीमार करून गर्दी पांगवली. या संघर्षात एक तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर राजकीय वातावरणही तापू लागले आहे. भाजपचे माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला,” असा आरोप मिश्रा यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर, जखमींना रुग्णालयात नेत असताना पोलिसांनी लाठीमार केल्याचा दावाही त्यांनी केला असून, या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
“सध्या संतोष नगरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दिंडोशी पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.







