बंदी घालण्यात आलेल्या ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या ऑनलाइन प्रचार आणि कथित कट प्रकरणात महाराष्ट्रातील आणखी दोघे संशयित तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. यामध्ये एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.
दिल्ली पोलीस स्पेशल सेल आणि महाराष्ट्र एटीएस यांच्या संयुक्त कारवाईत शनिवारी झालेल्या अटकसत्रा नंतर या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक झाला आहे. या कारवाईत कुर्ल्यातील विद्यार्थी मोहम्मद हमाद सिद्दीकी (१८) आणि ठाणे जिल्ह्यातील खडवली येथील ऑटो इलेक्ट्रिकल मेकॅनिक मोसाईब अहमद उर्फ सोनू उर्फ कमाल (३३) यांना अटक करण्यात आली होती.
तसेच, आयएसआयएसच्या ऑनलाइन प्रचार जाळ्याशी संबंधित कथित हँडलर ‘बडा इम्रान’ यालाही ओडिशामधून अटक करण्यात आली आहे.
तपासादरम्यान, कांदिवली (पश्चिम) येथील १५ वर्षीय विद्यार्थी आणि ठाण्यातील फायनान्स कंपनीत काम करणारा २७ वर्षीय यासिर खान यांची नावे समोर आली. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्यांच्या घरी झडती घेऊन त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे नोटीस बजावले आहे.
हे ही वाचा:
पडद्यामागचं मार्गदर्शन; मैदानावर डेविडचा जलवा
मैदान पेटलंय; सॅमसन-बुमराहमध्ये कोण भारी?
ट्रॉफीचोर पाकड्या मोहसीनचे हसीन सपने!
सॉलिड फ्यूल आधारित नवीन क्षेपणास्त्र प्रणाली करणार विकसित
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या हमाद सिद्दीकीच्या वडिलांनी मुलावर लावण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. “माझा मुलगा बारावीची तयारी करणारा हुशार विद्यार्थी आहे. त्याच्या शिक्षणासाठी मी कर्ज घेतले आहे. तो गेल्या काही वर्षांपासून ऑनलाइन गेम्समध्ये गुंतला होता, मात्र तो दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असेल असे कधीच वाटले नाही,” असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी घरातून कोणतेही संशयास्पद साहित्य जप्त केले नसून केवळ मोबाईल फोन घेतल्याचा दावा त्यांनी केला.
तपास यंत्रणांच्या सूत्रांनुसार, PUBG आणि Free Fire सारख्या ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मचा वापर सुरुवातीच्या संपर्कासाठी करण्यात आल्याचा संशय आहे. गेममधील चॅट व ग्रुप इंटरॅक्शनच्या माध्यमातून ओळखी वाढवून नंतर संभाषण Telegram आणि Signal सारख्या एन्क्रिप्टेड अॅप्सवर हलवले जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.
या माध्यमातून परदेशी नागरिक आणि आयएसआयएसशी संबंधित व्यक्तींशी संपर्क साधून भारतातील विविध ठिकाणांना लक्ष्य करण्याच्या कथित कटावर चर्चा सुरू होती, असा संशय तपास यंत्रणांना आहे.
दरम्यान, दोन्ही अटक आरोपींना मुंबईतील विशेष न्यायालयात हजर करून त्यांचा ट्रान्झिट रिमांड मिळवण्यात आला असून पुढील चौकशीसाठी त्यांना दिल्लीला नेण्यात येणार आहे. तपास यंत्रणा आता या प्रकरणातील ऑनलाइन जाळे आणि संभाव्य सहकारी शोधण्यात गुंतल्या आहेत.







