पश्चिम बंगालमधील दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या दोन नेत्यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. पोलिसांनी उत्तर परगणा २४ जिल्ह्यातील बदुरिया नगरपालिकेचे अध्यक्ष दीपंकर भट्टाचार्य यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून सुमारे ८० लाख रुपये रोख रक्कम आणि सरकारी निधीतून खरेदी करण्यात आलेले ताडपत्र्यांचे (तिरपाल) अनेक गठ्ठे जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, दीपांकर भट्टाचार्य यांच्यावर गेल्या काही काळापासून भ्रष्टाचाराचे आरोप होत होते. ते काही दिवसांपासून नगरपालिका कार्यालयातही अनुपस्थित होते. गुप्त माहितीच्या आधारे बदुरिया पोलिसांनी सोमवारी रात्री त्यांना अटक केली.
यापूर्वी पोलिसांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयातून आणि पक्षाच्या एका नेत्याच्या मालकीच्या बागेतील घरातून सुमारे ४,००० सरकारी ताडपत्र्या जप्त केल्या होत्या. दीपांकर भट्टाचार्य यांच्याविरोधात दोन स्वतंत्र तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. यापैकी एक तक्रार कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (एम) ने तर दुसरी भाजपने दाखल केली होती. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, दीपांकर एका हॉटेलमध्ये लपून बसले होते. त्यांच्या जवळ कपड्यांनी भरलेल्या दोन बॅगा आणि काही औषधे सापडली. यावरून त्यांनी दीर्घकाळ लपून राहण्याची तयारी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दुसऱ्या घटनेत, दक्षिण परगणा २४ पथरप्रतिमा येथील तृणमूलचे प्रादेशिक अध्यक्ष गौतम अरी यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात सरकारी मदत साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. दुर्बचती ग्राम पंचायत परिसरातील त्यांच्या घरातून सरकारी मदत साहित्य सापडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. भाजप आणि स्थानिक नागरिकांच्या एका गटाने आरोप केला की, गौतम आरी यांनी विविध सरकारी योजनांतील साहित्य आणि मदत सामग्री दीर्घकाळापासून आपल्या घरातील गोदामात साठवून ठेवली होती. या आरोपांनंतर स्थानिक नागरिकांनी आणि भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराला घेराव घालत सोमवारी रात्री उशिरापर्यंत आंदोलन केले.
हे ही वाचा:
अनैसर्गिक लोकसंख्याशास्त्रीय बदलांची तपासणी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती
अमेरिकेतील ‘तो’ मूर्ख कोण? मार्को रुबियो यांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
मालदा येथे न्यायिक अधिकाऱ्यांना ओलीस ठेवल्याप्रकरणी १५ जणांना अटक
पश्चिम बंगालच्या नव्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी नीलम मीणा
माहिती मिळताच पथरप्रतिमा पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि ब्लॉक विकास अधिकारी घटनास्थळी पोहोचले. प्रशासनाच्या उपस्थितीत घराची झडती घेण्यात आली. त्यावेळी ब्लँकेट, ताडपत्र्या, चटया, माशांचे खाद्य तसेच इतर सरकारी साहित्य जप्त करण्यात आले. सुंदरबन डेव्हलपमेंट बोर्डने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्याच आधारे गौतम आरी यांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणांमुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
