गोरेगाव येथील एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाकडून तब्बल १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने दोन महिलांना अटक केली आहे. बुधवारी आरोपींना एस्प्लेनेड न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
अटक करण्यात आलेल्या महिलांमध्ये हेमलता आदित्य पाटकर उर्फ हेमलता बने (३९, रा. कांदिवली) आणि अमरिना इक्बाल झवेरी उर्फ अलीस उर्फ अमरिना मॅथ्यू फर्नांडिस (३३, रा. सांताक्रूझ) यांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
विधानसभा निवडणुका होतील तेव्हा पक्ष पूर्ण बहुमत मिळवेल
महिला वाहतूक पोलीसाने प्रसंगावधान राखले म्हणून…
यूनस यांनाही चड्डी- बनियानवर पळावे लागणार
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अरविंद गोयल (५२) हे गोरेगाव पश्चिम येथील रहिवासी असून श्रीकृष्णा कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये ‘गोयल अँड सन्स इन्फ्रा एलएलपी’ ही बांधकाम कंपनी चालवतात. गोयल यांचा मुलगा रिदम याचे ५ नोव्हेंबर रोजी यशवी शाह हिच्याशी लग्न झाले होते. या निमित्ताने १४ नोव्हेंबर रोजी आंबोली येथील एका हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
पार्टीनंतर १५ नोव्हेंबर रोजी पहाटे सुमारे २.४० वाजता रिदम, त्याची पत्नी यशवी, तिचा भाऊ आणि एक मित्र लिफ्टने खाली उतरत असताना एक अनोळखी महिला लिफ्टमध्ये शिरली. या वेळी रिदमने आपल्यावर लेसर लाईट टाकल्याचा आरोप करत त्या महिलेने वाद घातला. हा वाद हाणामारीत रूपांतरित झाला असून महिलेला किरकोळ दुखापत झाली. लिफ्ट तळमजल्यावर पोहोचल्यानंतर महिलेने आरडाओरड करत मोठा गोंधळ घातल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेनंतर २० डिसेंबर २०२५ रोजी हेमलता पाटकर हिने अरविंद गोयल यांना फोन करून अंधेरी पश्चिमेतील एका स्टारबक्स कॅफेमध्ये रात्री उशिरा भेटण्यास बोलावले. या बैठकीत गोयल यांच्या मुलाला दीर्घकाळ तुरुंगात डांबले जाईल, जामीन मिळू दिला जाणार नाही तसेच पैसे न दिल्यास सोशल मीडिया व प्रसारमाध्यमांतून कुटुंबाची बदनामी केली जाईल, अशी धमकी देण्यात आली.
सुरुवातीला १० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. नंतर ही रक्कम ५.५० कोटी रुपयांपर्यंत कमी करण्यात आली. २३ डिसेंबर रोजी हेमलता पाटकर आणि अमरिना झवेरी यांनी एकत्र कट रचून आंबोली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा ‘सेटलमेंट’ करण्याच्या नावाखाली खंडणीची मागणी केल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी सापळा रचत लोअर परेल येथे आरोपींना १.५० कोटींची रक्कम (डमी चलनासह) आणि ३० हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी एन.एम. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
