दुसरीतील हिंदू विद्यार्थ्याला ‘कलमा’ पठणाचा गृहपाठ; शिक्षिकेची हकालपट्टी

हैदराबादमधील खासगी शाळेतील घटना

दुसरीतील हिंदू विद्यार्थ्याला ‘कलमा’ पठणाचा गृहपाठ; शिक्षिकेची हकालपट्टी

तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील एका खासगी शाळेत दुसरी इयत्तेत शिकणाऱ्या हिंदू विद्यार्थ्याला कथितपणे इस्लामी प्रार्थना ‘कलमा’ आणि ‘सुरह फातिहा’ पाठ करण्याचा गृहपाठ दिल्याच्या आरोपावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. पालकांनी तीव्र आक्षेप घेतल्यानंतर शाळा प्रशासनाने संबंधित शिक्षिका शेख आयशा परवीन यांची सेवेतून हकालपट्टी केली आहे. या घटनेमुळे धार्मिक संवेदनशीलता, शाळांमधील धर्मनिरपेक्ष वातावरण आणि विद्यार्थ्यांवरील धार्मिक अभ्यासाच्या मर्यादांबाबत व्यापक चर्चा सुरू झाली आहे.

ही घटना हैदराबादच्या सैदाबाद परिसरातील ‘द सक्सेस स्कूल’ येथे घडली. आरोपानुसार, दुसरीच्या वर्गातील एका हिंदू विद्यार्थ्याच्या शालेय डायरीत १५ जुलैच्या गृहपाठामध्ये “Read 1, 2 Kalma” आणि “Read Fatiha” अशा सूचना लिहिण्यात आल्या होत्या. मुलगा घरी आल्यानंतर पालकांच्या हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी तत्काळ शाळा गाठून प्रशासनाकडे याबाबत जाब विचारला.

विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी हा पहिलाच प्रकार नसल्याचा दावाही केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी ११ जुलै रोजीही विद्यार्थ्याच्या डायरीत “Read Kalma” अशी नोंद करण्यात आली होती. मात्र नंतर ती खोडून टाकण्यात आली होती. त्यामुळे हा केवळ एकदाच झालेला प्रकार नसून वारंवार अशी नोंद केली जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. घटनेनंतर शाळेत पालक आणि व्यवस्थापनामध्ये तीव्र वाद झाला. पालकांनी कोणत्याही विद्यार्थ्यावर त्याच्या धर्मापेक्षा वेगळ्या धर्मातील प्रार्थना किंवा धार्मिक अभ्यास लादणे अयोग्य असल्याचे सांगत संबंधित शिक्षिकेविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. तसेच या प्रकरणाची शिक्षण विभागाकडून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

वाद वाढताच शाळा प्रशासनाने शिक्षिका शेख आयशा परवीन यांच्याविरोधात कठोर पाऊल उचलले. १५ जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार त्यांची सेवा तत्काळ समाप्त करण्यात आली असून, सक्सेस ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स अंतर्गत भविष्यात कोणत्याही संस्थेत नोकरीसाठी अर्ज करण्यासही त्यांना कायमस्वरूपी अपात्र ठरविण्यात आले आहे.

हे ही वाचा:

‘अतिथी देवो भव’! महिला पोलिसांच्या मदतीने विदेशी पर्यटक भारावली

होर्मुझ सामुद्रधुनीत भारतीय खलाशांच्या नियुक्तीवर तात्पुरती बंदी

सोशल मीडिया डिटॉक्स का आवश्यक?

गरीब उपमहापौराला कुणी बंगला देता बंगला

दरम्यान, शाळा व्यवस्थापनाने हा प्रकार जाणूनबुजून घडलेला नसून चुकून चुकीच्या विद्यार्थ्याच्या डायरीत गृहपाठ लिहिला गेला, असा दावा केला आहे. शाळेच्या म्हणण्यानुसार, तेथील बहुतांश विद्यार्थी मुस्लिम असल्याने त्यांच्यासाठी इस्लामिक स्टडीजचे वर्ग घेतले जातात, मात्र इतर धर्मीय विद्यार्थ्यांना हा विषय शिकविला जात नाही. संबंधित गृहपाठ चुकीने हिंदू विद्यार्थ्याच्या डायरीत नोंदविला गेला असावा, असे स्पष्टीकरण शाळेने दिले आहे. प्राथमिक चौकशीत शिक्षिकेनेही वर्गात २५ विद्यार्थी असून त्यापैकी केवळ एक विद्यार्थी हिंदू असल्याने ही नोंद चुकून झाली असावी, असे सांगितल्याचे वृत्त आहे.

Exit mobile version