पुण्यातील केतन अग्रवाल हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबाच्या अडचणी वाढल्या आहेत. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) सिया गोयलच्या वडिलांच्या मार्केट यार्डमधील मसाले आणि सुका मेवा विक्रीच्या दुकानावर कारवाई करत दुकानाचे कामकाज तात्पुरते बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तपासादरम्यान परवान्याशी संबंधित त्रुटी, लेबलिंगमधील अनियमितता आणि भेसळीचा संशय आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.
एफडीएने १४ जुलै रोजी मार्केट यार्डमधील ‘बी. जी. गोयल अँड कंपनी’ या दुकानाची तपासणी केली. या कारवाईदरम्यान ‘संत’ आणि ‘साधू’ ब्रँडच्या हळदीची पूड, तीळ आणि सोयाबीन मिनी चंक्स यांसह चार खाद्यपदार्थांचे नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी घेण्यात आले. तसेच सुमारे ४,१७२ किलो अन्नधान्य व खाद्यपदार्थांचा साठा, ज्याची किंमत ८ लाख १४ हजार ६३० रुपये इतकी आहे, जप्त करण्यात आला.
एफडीएच्या माहितीनुसार, दुकान नव्या ठिकाणी सुरू करण्यात आले होते. मात्र, त्या ठिकाणासाठी आवश्यक असलेला वैध अन्न व्यवसाय परवाना (Food Business Licence) अद्ययावत करण्यात आला नव्हता. याशिवाय, काही उत्पादनांच्या लेबलिंगमध्ये त्रुटी आढळल्या असून काही खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि संभाव्य भेसळीबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
या सर्व अनियमितता लक्षात घेऊन एफडीएने संबंधित दुकानाला ‘पुढील आदेश येईपर्यंत व्यवसाय बंद ठेवावा’ अशी नोटीस बजावली आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यातील (Food Safety and Standards Act) तरतुदींच्या उल्लंघनामुळे करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
“श्रीकृष्ण मुस्लिम होते, दिवसातून पाच वेळा नमाज पढत होते” मौलाना बरळले
दुसरीतील हिंदू विद्यार्थ्याला ‘कलमा’ पठणाचा गृहपाठ; शिक्षिकेची हकालपट्टी
‘अतिथी देवो भव’! महिला पोलिसांच्या मदतीने विदेशी पर्यटक भारावली
होर्मुझ सामुद्रधुनीत भारतीय खलाशांच्या नियुक्तीवर तात्पुरती बंदी
दरम्यान, सिया गोयलचे वडील प्रवीण गोयल यांनी माध्यमांशी बोलताना दुकान सील करण्यात आलेले नसून, परवाना प्रक्रियेअभावी तात्पुरते बंद ठेवण्याचे निर्देश मिळाले आहेत, असे स्पष्टीकरण दिले. नव्या परवान्यासाठी अर्ज केला असून तो आठ ते दहा दिवसांत मिळण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, “माझी मुलगी दोषी आढळली तर तिला कठोरात कठोर शिक्षा व्हावी. मी न्यायव्यवस्थेसोबत आहे आणि तपासात पूर्ण सहकार्य करेन. मात्र, या प्रकरणामुळे संपूर्ण कुटुंबाला लक्ष्य केले जात असून त्याचा मानसिक त्रास होत आहे,” असेही त्यांनी म्हटले.







