चेन्नई येथे आयोजित करण्यात आलेल्या ७९व्या वरिष्ठ राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय रेल्वेच्या वॉटर पोलो संघाने शानदार कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले. संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट सांघिक खेळ, अचूक नियोजन आणि दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय रेल्वेने विजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक यशात पश्चिम रेल्वेच्या सहा खेळाडूंनी मोलाचा वाटा उचलत संघाच्या विजयात निर्णायक योगदान दिले.
भारतीय रेल्वेच्या विजेत्या संघात पश्चिम रेल्वेचे अश्विनीकुमार कुंदे, सारंग वैद्य, श्रेयस वैद्य, भूषण पाटील, मंदार भोईर आणि आदित्य थेते या सहा खेळाडूंचा समावेश होता. या सर्व खेळाडूंनी स्पर्धेदरम्यान सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी करत भारतीय रेल्वेला सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
हे ही वाचा:
‘नो एंट्री’ पुलावर बर्थडे पार्टी! २६ कोटींच्या पुलावर वाढदिवसाचा धुमाकूळ
बँकिंग शेअर्समधील विक्रीमुळे बाजाराची घोडदौड थांबली
चर्चगेट-विरार लोकलमध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर तात्पुरती बंदी
या यशात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला तो म्हणजे पश्चिम रेल्वेचा खेळाडू सारंग वैद्य याची संपूर्ण स्पर्धेतील ‘सर्वोत्कृष्ट वॉटर पोलो खेळाडू’ (Best Player of the Tournament) म्हणून निवड करण्यात आली. स्पर्धेतील त्याच्या सातत्यपूर्ण, प्रभावी आणि उत्कृष्ट खेळाची दखल घेत हा प्रतिष्ठेचा वैयक्तिक पुरस्कार त्याला प्रदान करण्यात आला.
भारतीय रेल्वेच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पश्चिम रेल्वेने संपूर्ण संघाचे अभिनंदन केले असून विशेषतः पश्चिम रेल्वेच्या सहाही खेळाडूंनी संस्थेचा गौरव वाढवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. भविष्यातही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अशीच उल्लेखनीय कामगिरी करून देश आणि रेल्वेचे नाव उज्ज्वल करण्यासाठी पश्चिम रेल्वेने सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.







