मातृभाषा महत्त्वाची आहे. पण मातृभाषेचा अभिमान बाळगताना इतरही भारतीय भाषांचा अभिमान बाळगायला हवा. मात्र अनेक लोक भारतीय भाषांचा तिरस्कार करतात आणि इंग्रजीला मात्र पायघड्या घालतात. भाषा हे संवादाचं माध्यम आहे, वादाचं नाही, अशा शब्दांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषेची महती आणि त्यावरून सुरू असलेल्या वादावर आपले मत व्यक्त केले.
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज सामरिक अध्ययन केंद्र तसेच कुसुमाग्रज मराठी भाषा अध्ययन केंद्राची कोनशिला फडणवीसांच्या उपस्थितीत ठेवण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
फडणवीस यांनी सांगितले की, मराठी की हिंदी असा वाद नाही. मराठी आहेच, मराठीला पर्याय नाही. पण मराठीसोबत भारतीय भाषाही महत्त्वाच्या आहेत. मराठीसोबत इतरही भाषा आल्या पाहिजेत. कुठल्याही भारतीय भाषेचा अभिमान वाटला पाहिजे. मराठी माणूस संकुचित विचार करू शकत नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला संकुचित विचार करायला शिकवलेलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान मागितले ते अवघ्या विश्वासाठी.
हे ही वाचा:
त्यांचा शो पाहत मोठी झाले, आजही गाणं ऐकून भावूक होते
हिमाचल प्रदेश : बस दरीत कोसळून ७ ठार
एअर इंडियाला सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाबद्दल नोटीस
इंग्लंड दौऱ्यात भारत पासा पलटू शकतो!
ते म्हणाले की, मराठी नाट्यसृष्टी देशात सर्वोत्तम आहे. देशात थिएटर कुठल्या भाषेने समृद्ध केलं आणि ते टिकवलं तर ते मराठी भाषेने. या मराठी भाषेचे सगळ्या विद्यापीठांत आणि सर्वत्र संशोधन व्हायला पाहिजे.
फडणवीसांनी सांगितले की, मराठी ही अभिजात भाषा आहे. देशातल्या प्राचीन भाषांत मराठीचा समावेश होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. मराठी ही कायमच अभिजात भाषा होती. त्यावर राजमुद्रा लागणं महत्त्वाचं होतं. ते काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
या कार्यक्रमादरम्यान काही डाव्या संघटनांनी फडणवीसांविरोधात घोषणाबाजीही केली. जेएनयूमधील एसएफआय या संघटनेने हे आंदोलन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जेएनयूत सत्कार नको, अशी भूमिका त्यांनी घेतली.
