७ नोव्हेंबर १८७५. अक्षय नवमीचा पावन दिवस. पश्चिम बंगालमध्ये या दिवशी विश्वसंवर्धिनी देवी जगद्धात्रीची पूजा केली जाते. त्याच दिवशी उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील नैहाटी येथील शांत कानथलपाडा गावात, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय एका आंब्याच्या झाडाखाली बसून सहा कडव्यांची अशी कविता लिहित होते, जी पुढे भारताच्या स्वातंत्र्याची गर्जना ठरली — ‘वंदे मातरम्’.
दुर्गापूजेपासून प्रेरणा घेत बंकिमांनी भारतमातेची प्रतिमा साकारली — नद्यांनी अभिषिक्त, दक्षिणेच्या मंद वाऱ्यांनी शीतल झालेली, धान्याने समृद्ध, पण अन्यायाचा नाश करणाऱ्या शंभर हातांची शक्तीरूपिणी. संस्कृताची तेजस्विता आणि बंगाली सुरांच्या माधुर्याचा संगम करून त्यांनी एक अमर राष्ट्रस्तोत्र निर्माण केले.
कवितेचा जन्म व सुरुवात
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (२७ जून १८३८ – ८ एप्रिल १८९४) हे त्या काळातील सरकारी अधिकारी, नंतर मिदनापूर आणि दुर्गादेवीचे डेप्युटी कलेक्टर. ब्रिटिश राजसत्तेचे टीकाकार आणि बंडखोर विचारवंत. १८६४ साली त्यांनी ‘राजमोहन’स वाइफ’ ही पहिली इंग्रजी कादंबरी लिहिली. पण लवकरच बंगाली साहित्याला नवे रूप देताना प्रकारानं पहिल्या आधुनिक बंगाली कादंबऱ्यांचे जनक बनले.
‘वंदे मातरम्’ लिहून जवळपास पाच वर्षे ही कविता लोकांपर्यंत पोहोचलीच नाही. अखेर १८८०–८२ दरम्यान त्यांनी ही कविता आपली प्रसिद्ध कादंबरी ‘आनंदमठ’ मध्ये अंतर्भूत केली. ज्यात संन्यासी ब्रिटिश साम्राज्याच्या अत्याचाराविरुद्ध लढतात अशी कथा होती.
सुरुवातीला प्रतिसाद संथ होता. निराश होऊन बंकिमांनी एका पत्रात लिहिले, “वंदे उदरम् लिहिले असते तर जास्त लोकप्रिय झाले असते” — म्हणजे भुकेची स्तुती केली असती तर लोकांना अधिक भावले असते, असा टोमणा त्यांनी मारला.
पहिला घोष — १८८६
१८८६ मध्ये कोलकात्यातील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिवेशनात प्रथमच ही कविता सभागृहात गायली गेली.
हेमचंद्र बंद्योपाध्याय यांनी ती भक्तिगीताच्या सुरात मांडली. गायकांनी उभे राहून थरथरत्या स्वरात गायन केले. पहिली धून पंडित जदुनाथ भट्टाचार्यांनी राग मल्हार आणि कौली तालात बसविल्याचे मानले जाते. श्री अरविंदांनी मूळ काव्याचे इंग्रजी भाषांतर करून त्याला आध्यात्मिक व क्रांतिकारी रूप दिले.
टागोरांचा ताल— १८९६
१० वर्षांनी रवींद्रनाथ टागोर यांनीही १८९६ मध्ये कॉंग्रेस अधिवेशनात स्वतःच्या चित्ताकर्षक सूरात हे गाणे सादर केले. पुढे १९०४–०५ मध्ये त्यांनी भारताचे पहिले ग्रॅमोफोन रेकॉर्ड बनवले. १९०५ च्या बंगाल विभाजनानंतर ब्रिटिशांनी ही रेकॉर्ड तपासून बंदी घातली. तरीही हे गाणे भूमिगत मार्गाने पॅरिस आणि बर्लिनपर्यंत पोहोचले!
हे ही वाचा:
आयर्लंडच्या जंगलात आढळला ‘सिंह’, नंतर स्पष्ट झाले तो तर कुत्रा, नाव मात्र ‘माऊस’
उज्जैनमधील मशीद पाडण्याविरुद्ध दाखल केलेली याचिका फेटाळली; प्रकरण काय?
गोराई- दहिसर मॅन्ग्रोव्ह पार्क – “उत्तर मुंबई ते उत्तम मुंबई” संकल्पनेला गती
“वंदे मातरम्” गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त टपाल तिकिट, नाणे प्रकाशित
क्रांतीची गर्जना (१९०५–१९११)
बंगाल विभाजनानंतर विद्यार्थी, स्त्रीसमाज, देशभक्त युवक हे युद्धघोषासारखे “वंदे मातरम्” म्हणू लागले. ढाक्यात शाळकरी मुलांवर लाठीमार झाला, बरिसाल येथे मिरवणुकीवर गोळीबार झाला. रक्तात भिजलेले हे गीत राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक झाले. २२ ऑगस्ट १९०७ रोजी भिकाजी कामा यांनी जर्मनीतील स्टटगार्ट परिषदेत भारताचा पहिला तिरंगा फडकावला — ज्यावर सोनेरी पट्टीवर “वंदे मातरम्” लिहिलेले होते.
संगीतातील प्रवास
१९१५पासून पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी प्रत्येक कॉंग्रेस अधिवेशनात हे गीत गायले. अनेक रागांमध्ये अनेक महान गायकांनी याची सादरीकरणे केली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी राग दुर्गामध्ये याची मार्चिंग धून तयार केली. आजाद हिंद रेडिओवरून ते नियमित प्रसारित होत असे. १४ ऑगस्ट १९४७ रोजी संविधान सभेच्या कार्यक्रमाची सुरुवात सुचेता कृपलानी यांच्या गायनाने झाली आणि १५ ऑगस्टच्या मध्यरात्री पंडित ओंकारनाथ ठाकुर यांनी संपूर्ण सहा कडवी गायली. पुढे ऑल इंडिया रेडिओचे सिग्नेचर ट्यून म्हणून ते वाजू लागले. हे संगीतकार वाल्टर कॉफमन होते, असे म्हणतात.
मुस्लिम संघटनांची चीडचीड
काही मुस्लिम संघटनांनी हिंदू देवीच्या प्रतिमेवर आधारित काव्यभागाचा विरोध केला. १९३७ मध्ये पहिली दोन कडवी (ज्यात देवीच्या प्रतिमांचा उल्लेख नाही) राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारली गेली. अर्थातच, तत्कालिन काँग्रेसने त्याला विरोध केला नाही. मुस्लिमांच्या लांगुलचालनापायीच हे केले गेल्याचा आरोप केला गेला. २४ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रपती राजेंद्र प्रसादांनी जाहीर केले, “वंदे मातरम् हा राष्ट्राच्या इतिहासातील अमर गीत आहे — त्याला ‘जन गण मन’ इतकाच सन्मान मिळेल.”
वाद आणि आजची परिस्थिती
आजही काही मुस्लिम संस्था त्याला ‘आस्थेचा विरोध’ म्हणतात — देवीचे स्तवन इस्लामच्या एकेश्वरवादाशी विरोधात असल्याचे त्यांचे मत. तरीही ए. आर. रहमानसारख्या कलाकारांनी या गीताला आधुनिक जोशात सादर केले आहे. राजस्थान, जम्मू-कश्मीर येथे शाळांमध्ये अनिवार्य वंदे मातरम् म्हणण्याच्या आदेशांवर वाद उठले. कोर्टांनी भूमिका स्पष्ट केली. गाणे प्रोत्साहित करा, पण बंधन आणू नका.
१५० वर्षांचे तेज
अक्षय नवमीच्या दिवशी आजही कानथलपाड्यात लोक एकत्र येऊन मूळ स्वरूपातील कडवी गातात. देशभर विविध रागांत, चित्रपटांत, स्वातंत्र्य सोहळ्यांत, जनआंदोलनात हे गीत आजही गुंजते.







