जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन झाले, तेव्हा पाकिस्तानमधून सोशल मीडियाची ४०० हँडल्स सक्रिय होती. ‘नीट’ (NEET) पेपरफुटीप्रकरणी या हँडल्सवरून सतत काही पोस्ट आणि व्हिडिओ व्हायरल करण्यात येत होते. आंदोलनात पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ (ISI) समर्थित दहशतवादी घुसखोरी करून घातपात करण्याच्या तयारीत होते, अशी माहिती उघड केल्यामुळे पंजाबमधील ‘आम आदमी पार्टी’च्या सरकारने गुरुप्रीत सिंह भुल्लर यांना अमृतसरच्या पोलिस आयुक्त पदावरून काढून टाकले. आता तर ‘आयएसआय’चा हस्तक आणि पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याने एका व्हिडिओद्वारे कॉकरोच जनता पार्टीला समर्थन जाहीर केले आहे.
भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते की, शहजाद भट्टीच्या संपर्कात असलेल्या देशातील २०० जिहादी तरुणांना स्वातंत्र्यदिनाआधी अटक करण्यात आली. शाह यांच्या वक्तव्यानंतर शहजाद भट्टीने एक व्हिडिओ जारी केला. “भारतात ज्या २०० तरुणांना अटक करण्यात आली, त्यांचा माझ्याशी काडीचाही संबंध नाही,” असे भट्टीने स्पष्ट केले.
भट्टी गेली अनेक वर्षे भारतात जिहादी तरुणांचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने सोशल मीडियाला हत्यार बनवले आहे. व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून जिहादी साहित्य व्हायरल करायचे; ज्यामध्ये मीम्स, व्हिडिओ आणि मजकुराचा समावेश असतो. यातील काही तरुण देशात हेरगिरी व घातपातासाठी वापरले जातात. त्यासाठी सढळ हस्ते पैसा खर्च केला जातो. आखाती देशांमध्ये बसून भट्टीचे हे चाळे सुरू असतात. भारतात त्याच्या कामावर पाणी फेरण्याचे काम सुरक्षा यंत्रणा करत आहेत.
जारी केलेल्या व्हिडिओमध्ये भट्टी म्हणतो की, “सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतलेले हे सगळे तरुण कॉकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतर येथील आंदोलनात सहभागी झाले होते. फेस रेकग्निशन तंत्रज्ञानामुळे त्यांची चेहरेपट्टी पोलिसांकडे होती; त्याचाच वापर करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई माझ्या नेटवर्कवर झालेली नसून कॉकरोच जनता पार्टीच्या नेटवर्कवर झालेली आहे. ज्या तरुणांना अटक झाली, त्यांना मी सर्व प्रकारचे सहकार्य करणार आहे. एवढेच नाही, तर मी कॉकरोच जनता पार्टीलाही पाठिंबा जाहीर करतो आहे. यापुढे त्यांना काहीही लागले, तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा.”
काही दिवसांपूर्वी खलिस्तानी दहशतवादी गुरुपतवंत सिंह पन्नू याचाही एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्याने कॉकरोच जनता पार्टीला पूर्ण पाठिंबा जाहीर केला होता आणि त्यांच्या आंदोलनाला १ दशलक्ष डॉलरची मदत जाहीर केली होती. तो व्हिडिओ आणि शहजाद भट्टीचा व्हिडिओ या दोन्हीमध्ये कमालीचे साम्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि त्यांच्या सरकारला दोघांनीही शिव्या घातल्या आहेत; तर ‘कॉकरोच’ मंडळींचे भरपूर कौतुक केले आहे. दोन्ही व्हिडिओंमध्ये त्यांना मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.
भट्टी अमित शाह यांच्यावरही घसरला आहे. तो म्हणतो, “अमित शाह मला गँगस्टर म्हणतात; परंतु त्यांनीच त्यांच्या देशात गँगस्टर पाळले आहेत. कॅनडात निज्जरची हत्या याच गँगस्टरनी केली.” भारताच्या गृहमंत्र्यांना दमबाजी करण्याइतपत भट्टीची हिम्मत झाली आहे. पाकिस्तानात बसलेल्या या दहशतवाद्यांनी अज्ञातांचा धसका घेतला आहे. भट्टीने या व्हिडिओत जाहीर केले आहे की, तो पाकिस्तानात नाही. मात्र, तो नेमका कुठे आहे, हे ही त्याने स्पष्ट केलेले नाही.
हे ही वाचा:
हिंद-प्रशांतमध्ये भारत-जपानचा नवा ‘डिफेन्स फॉर्म्युला’
१९८४ शीख दंगलीतील दोषी माजी काँग्रेस खासदार सज्जन कुमार यांचे निधन
शहजाद भट्टी नेटवर्कवर प्रहार; ५२ आरोपी गजाआड
कांदिवलीत बनावट दागिन्यांच्या युनिटवर छापा; १३ बाल कामगारांची सुटका
आश्चर्याची बाब म्हणजे भट्टीसारखा पाकिस्तानी मोहरा कॉकरोच जनता पार्टीला समर्थन देतो, परंतु कॉकरोच जनता पार्टीचे चेहरे असलेले अभिजित दीपके आणि सौरव दास याबाबत तोंडातून अवाक्षरही काढत नाहीत. मिळालेल्या समर्थनाचे एक तर स्वागत करायचे असते किंवा समर्थन नाकारायचे असते; परंतु दीपके आणि त्यांची टोळी मूग गिळून बसलेली आहे. भट्टीने दीपकेला पाठिंबा देणे स्वाभाविक आहे. भट्टी आणि त्याच्या पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचंड त्रास झालेला आहे. ‘डिस्कव्हरी’ चॅनलवर ‘ऑपरेशन सिंदूर’ची डॉक्युमेंटरी पाहून पाकिस्तानी जनरलचे माथे भडकते आणि तो पहाटे २ वाजता सोशल मीडियावर पोस्ट टाकून नापसंती व्यक्त करतो. मोदी सरकारच्या काळात जेवढे आयएसआयचे हस्तक आणि हेर भारतात पकडले गेले व पाकिस्तानात ठोकले गेले, तो एक उच्चांक आहे. पाकिस्तानला ग्रहण लावणाऱ्या अशा सरकारच्या विरोधात कोणीही असले, तरी त्यांना खांद्यावर घेण्याचे काम हे लोक करणारच! खलिस्तानींना आश्रय आणि पैसा ‘आयएसआय’ देते, पन्नूला फंडिंग त्यांचेच आहे. त्यामुळे भारतात ‘रिजीम चेंज ऑपरेशन’ करणाऱ्या डीप स्टेटचे मोहरे बनलेल्या कॉकरोच मंडळींना त्यांनी पाठिंबा दिला, तर त्यात फार आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही; हे तर अपेक्षितच आहे.
भारतीयांना हा खेळ ओळखण्याची गरज आहे. कॉकरोच जनता पार्टीने जंतर मंतरवर आयोजित केलेल्या मोर्चात २८७३ रेकॉर्डवरील गुंडांचा समावेश होता. अमृतसरच्या पोलिस आयुक्तांच्या माहितीनुसार आयएसआय-समर्थित दहशतवादी यात सहभागी झाले होते. अरुण भालकेसारखा नक्षलवादीही या आंदोलनात उतरला होता. दीपकेने हे सगळे अमित शाह यांचे अपयश असल्याचे सांगून हात झटकले आहेत; परंतु वास्तव काय आहे, हे भारताच्या जनतेला लक्षात येत आहे.
मोदी सरकारच्या विरोधात ही एकच टीम आहे, जी वेगवेगळे चेहरे घेऊन खेळत आहे. भट्टीच्या नेटवर्कमधील तरुणांचा ‘नीट’ पेपर परिक्षेशी थेट संबंध नसला, तरी त्यांनी आंदोलनाच्या काळात सहभाग घेतला असेल आणि सोशल मीडियावर पेटलेल्या आगीत तेल ओतण्याचे कामही केले असेल. हे सगळे गंभीर आहे. अर्बन नक्षलवादी (दिमागी नक्षलवादी), दहशतवादी आणि आयएसआय समर्थक जिहादी यांचीही मोट तोडण्याची गरज आहे.
मोदींनी दिमागी नक्षलवाद्यांच्या विरुद्ध लाल किल्ल्यावरून शंखनाद केला आहे. आधी त्यांचा कार्यक्रम करायचा, याबाबत निर्णय झाल्याशिवाय मोदींनी त्यांना अंगावर घेतलेले नाही, ही बाब उघड आहे. फक्त एक प्रश्न शिल्लक आहे— ही कारवाई होणार कधी? देशद्रोही शक्तींचा जो तमाशा देशात सुरू आहे, त्याला चाप लावण्याचा मुहूर्त कदाचित जवळ आला असेल. लांबला तरी तो उत्तर प्रदेशच्या निवडणुकांनंतरचा असेल, त्यापेक्षा जास्त लांबणार नाही.
