सोरेन यांच्यावर खापर; राहुल गांधी यांच्या काखा वर

सोरेन यांच्यावर खापर; राहुल गांधी यांच्या काखा वर

झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे दोन जणांचे थोबाड काळे झाले आहे—एक राहुल गांधी आणि दुसरे अभिजीत दिपके. जंतर-मंतरवरील आंदोलन संपले, परंतु झारखंडमधील विद्यार्थी आंदोलन अजूनही संपलेले नाही. लाज वाचवण्यासाठी राहुल गांधी यांनी झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांना पत्र लिहिले आहे—’तुम्ही व्यक्तिशः जाऊन या विद्यार्थ्यांची भेट घ्या, त्यांच्याशी संवाद साधा.’ राहुल गांधी स्वतः तिथे का फिरकले नाहीत, याचे उत्तर मात्र ते देत नाहीत. सोरेन यांच्या डोक्यावर खापर फोडून स्वतः नामानिराळे राहण्याचा राहुल यांचा गेम फसलेला दिसतो; कारण आंदोलनकर्त्यांनी ‘झारखंड सरकारचा पाठिंबा काढून घ्या’ अशी मागणी करत राहुल गांधी यांनाच गोत्यात आणले आहे.

दिल्लीवरून रांचीला जाणारी विमाने सुरू आहेत, परंतु राहुल गांधी यांना तिथे जाण्यासाठी मुहूर्त सापडत नाही किंवा विमानाचे तिकीट तरी मिळत नाही, सध्या तरी असे चित्र दिसत आहे. त्यामुळेच बहुधा त्यांनी हेमंत सोरेन यांना पत्र लिहिले आणि त्यांना आंदोलकांना भेटण्याचा, त्यांच्यासोबत चर्चा करून मार्ग काढण्याचा सल्ला दिला. सोरेन यांची यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

राहुल गांधी देशातील एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला आदेश देत आहेत, तोही जाहीरपणे. राजकीय शिष्टाचार कशाला म्हणतात, हे आपल्याला कळत नसल्याचे राहुल गांधी यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे. कंपनीचा एखादा वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकाऱ्याला काय करावे आणि कसे करावे याच्या सूचना देतो, तसा काहीसा प्रकार राहुल गांधी यांनी सोरेन यांच्याबाबत केलेला आहे. आपण कोणीतरी विशेष आहोत, जगावेगळे आहोत आणि बाकीचे लोक सटरफटर आहेत, हा राहुल गांधी यांचा गैरसमज या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आला आहे.

झारखंड सरकारमध्ये सोरेन यांचा झारखंड मुक्ति मोर्चा हा पक्ष काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार चालवत आहे. एकूण ८१ सदस्य असलेल्या विधानसभेत झारखंड मुक्ति मोर्चाचे ३४ आणि काँग्रेसचे १६ सदस्य आहेत. सरकारमध्ये चार मंत्री काँग्रेसचेही आहेत. उघड आहे, जर काँग्रेसने पाठिंबा काढला तर सरकार कोसळणार.

हे ही वाचा:

सांगलीतल्या जिहादीला फाशी द्या, घरावर बुलडोझर फिरवा!

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख दीपक म्हस्के, मालवीय मावळले!

झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या कार्यालयात छापा

“मला कार्यमुक्त करा” शहजाद पूनावाला यांचा पुन्हा राजीनामा

राहुल गांधी यांनी जे पत्र सोरेन यांना लिहिले आहे, त्यात विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य असल्याचे म्हटले आहे. या मागण्यांसाठी त्यांना शांततापूर्ण आंदोलन करण्याचा हक्क आहे, असेही म्हटले आहे. मुख्यमंत्री सोरेन यांना विद्यार्थ्यांना भेटण्याचा व त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. परंतु राहुल गांधी कुठेही संबंधित मंत्र्याचा राजीनामा मागत नाहीत, ना मुख्यमंत्र्यांकडून माफीची मागणी करत आहेत.

हा मानभावीपणा आहे. या पोकळ दिखाव्यातून विद्यार्थ्यांचे काही भले होण्याची शक्यता नाही. राहुल गांधी यांनी त्यांच्या डोक्यावरचे ओझे हेमंत सोरेन यांच्यावर ढकलले आहे. राहुल यांनी १४ ऑगस्टला लिहिलेल्या पत्राचे उत्तर देण्याची गरजही सोरेन यांना वाटली नाही. राहुल गांधी यांचा हा पत्राचार सोरेन यांना खटकला असण्याची शक्यता जास्त; कारण मित्रपक्षांच्या तंगड्यात तंगडी घालण्याचा त्यांचा स्वभाव या निमित्ताने पुन्हा उघड झाला आहे. सरकारमधील एक छोटा पक्ष आपल्यालाच आदेश देतो, हे सोरेन यांना झोंबले असेल. ‘विद्यार्थ्यांना भेटा आणि त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करा’, हे राहुल गांधी सोरेन यांना भेटून किंवा फोनवरून सांगू शकले असते. सोरेन यांच्या दृष्टीने ते जास्त योग्य ठरले असते. परंतु राहुल गांधी यांनी आघाडीतील धुणी चव्हाट्यावर धुण्याचा मार्ग निवडला; कारण त्यांना स्वतःची कातडी वाचवायची होती आणि खापर सोरेन यांच्या डोक्यावर फोडायचे होते. सोरेन यांच्या हा प्रकार व्यवस्थित लक्षात आला असणार. त्यांनी उघड प्रतिक्रिया दिलेली नाही; कारण तूर्तास त्यांचे हात दगडाखाली आहेत. वेळ येईल तेव्हा सोरेन राहुल गांधींना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत.

तमिळनाडूमध्ये द्रमुकसोबत निवडणूक लढवल्यानंतर टीव्हीकेसोबत सत्तेसाठी हातमिळवणी केल्यानंतर राहुल गांधी हे विश्वास ठेवण्यासारखे नेते नाहीत, ही बाब उघड झाली होती. जो अनुभव एम. के. स्टॅलिन यांनी घेतला, तोच सोरेन घेत आहेत. दोन्ही पक्ष जेव्हा सरकारमध्ये सामील आहेत, तेव्हा राज्यात झालेल्या परीक्षा घोटाळ्याची जबाबदारी कोण्या एकावर टाकता येत नाही. जे काही घडले ते पाप आहे, त्यात दोन्ही पक्षांचा सारखा वाटा आहे. तरीही राहुल गांधी कोरडे उसासे टाकत आहेत आणि दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की जे काही घडले त्यात काँग्रेसचा काहीही संबंध नाही; सगळी जबाबदारी सोरेन यांची आहे.

राहुल गांधी यांना विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त वाटतात, मग त्यांनी केवळ सुके सल्ले न देता त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पावले उचलायला हवीत. त्यांनी सोरेन यांना सांगायला हवे—एक तर मागण्या पूर्ण करा किंवा राजीनामा द्या. ‘या दोन्ही गोष्टी होत नसतील तर आम्ही सरकारमधून बाहेर पडतो’, असे जाहीर करा. राहुल गांधी यातले काहीही करणार नाहीत; कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात त्याप्रमाणे काँग्रेस हा परजीवी पक्ष झालेला आहे. राज्य पातळीवर ज्या ज्या पक्षासोबत काँग्रेसने आघाडी केली, त्यांच्या जीवनरसावर काँग्रेस जगते आहे; परंतु ते सगळे पक्ष मात्र खंगले, सुकले किंवा संपले आहेत.

राहुल गांधी पूर्णपणे स्वतःच्या सापळ्यात अडकलेले दिसतात. झारखंड आंदोलनामुळे त्यांचा दुटप्पीपणा उघड झाला. ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणांनंतर केंद्र सरकारने तर तात्काळ कारवाई केली. दोषींना अटक केली, परीक्षा रद्द केली आणि नव्याने परीक्षा घेतली. जंतर-मंतर आंदोलनानंतर शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला व प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू आहे. यातले काहीही झारखंडमध्ये झाले नाही; परंतु राहुल गांधी तोंडात मळी भरल्यासारखे गप्प होते. लोक तोंडावर टीका करू लागल्यानंतर त्यांनी सोरेन यांना पत्र लिहून हात झटकले. परंतु आंदोलक त्यांच्यापेक्षाही शहाणे आहेत, त्यांनी राहुल यांच्या तंगड्या त्यांच्याच गळ्यात घातल्या आहेत. सरकारचा पाठिंबा काढणे राहुल यांना शक्य नाही; कारण हे सरकार गडगडले तर भाजपला रोखणे कठीण होऊन बसेल. निवडणुका झाल्या तर भाजपची सत्ता येणार, झाल्या नाहीत तर राष्ट्रपती राजवट येणार. राहुल गांधी चारही बाजूंनी अडकले आहेत.

 

झारखंडच्या विद्यार्थ्यांनी राहुल गांधी यांचा कावा ओळखलेला आहे. ‘सोरेन मागण्या मान्य करत नसतील तर काँग्रेसने सरकारमधून बाहेर पडावे’, असे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांचे हे आवाहन म्हणजे ‘बाप दाखव नाही तर श्राद्ध कर’ अशा प्रकारचे आहे.  मागण्या मान्य झाल्या नाहीत तर २० ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री निवासाला घेराव घालण्याची घोषणा आंदोलनकर्त्यांनी केली आहे. असे घडल्यास सरकार बळाचा वापर करणार हे निश्चित आहे. काय घडू शकते याची राहुल गांधी यांना कल्पना आहे, त्यामुळे ते आधीच काखा वर करून मोकळे झाले आहेत. उद्या काही बरे-वाईट घडले, तर ‘आम्ही तर विद्यार्थी आंदोलन आणि त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला होता’, असे सांगून राहुल गांधी मोकळे होणार आहेत. ते सोरेन यांच्यावर टीकाही करतील, फक्त ते सरकारमधून बाहेर पडणार नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना आम्ही वेड लावणार, अशी डायलॉगबाजी करणारे राहुल गांधी सध्या तरी त्यांच्या मित्रपक्षांना वेड लावण्याच्या तयारीत आहेत. सोरेन यांना घाम फुटला आहे आणि मोदी-शाह मुकाटपणे हा तमाशा पाहत आहेत.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version