संसदेचे पावसाळी अधिवेशन काँग्रेसच्या गदारोळामुळे अक्षरशः वाया गेले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना हा खूप मोठा विजय वाटत आहे. अधिवेशन संपल्यानंतर ते काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये सामील झाले आणि त्यांनी घोषणा केली की, पंतप्रधानांना नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना वेड करून टाकणारे.
काँग्रेस नेते राहुल गांधी कायम ताळतंत्र सोडून बोलत असतात. त्यांच्या बोलण्यात सभ्यतेचा लवलेश नसतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ते कायम एकेरी भाषेत उल्लेख करत असतात. गेल्या बारा वर्षांत भाजपाच्या समोर पराभवाचे शतक राहुल गांधी लवकरच साजरी करतील. जिंकता येत नाही म्हणून काय झाले, जिंकलेल्यांना शिव्या तर घालू शकतो; हे राहुल गांधी वारंवार त्यांच्या समर्थकांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.
जगातील कोणताही राजकीय पक्ष किंवा नेता जी कोणती खेळी करतो, ती काहीतरी साध्य करण्यासाठी करतो. राहुल गांधी यांचे मात्र तसे नाही. मोदींना शिव्या घालून जिंकता येते का, हे पाहणे हा एक प्रयोग असू शकतो; परंतु गेल्या बारा वर्षांत सतत मोदींना शिव्या घातल्यानंतरसुद्धा यश येत नाही हे पाहून खरंतर राहुल गांधी यांनी त्यांची रणनीती बदलली पाहिजे होती, परंतु शिव्या घालण्याचा त्यांचा आजार वाढतच चाललाय.
हे ही वाचा:
रात्री स्क्रोलिंगची सवय ठरतेय झोपेची शत्रू
गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन यांना राष्ट्रपती पदक
नीरज चोप्रासारखं ऑलिम्पिक पदक जिंकण्याचं शिल्पाचं स्वप्न!
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान सुधारित एफसीआरए (FCRA), ‘एक देश, एक निवडणूक’, ‘विकसित भारत शिक्षण अधिष्ठान विधेयक’ आणि ‘घटनेमध्ये १३० वी दुरुस्ती विधेयक’ ही चार विधेयके सरकारला आणता आली नाहीत, हे आमचे यश आहे असे सांगितले आहे.
जयराम रमेश जी काय म्हणाले ते महत्त्वाचे आहे. एफसीआरए सुधारणा विधेयक त्यांना का नको होते, याबाबत भरपूर चर्चा झालेली आहे; परंतु घटनेची १३० वी दुरुस्ती त्यांना का नको होती, याचा संबंध राहुल गांधी यांच्याशी आहे. गंभीर गुन्ह्याखाली अटक झालेल्या लोकप्रतिनिधींना पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्री बनता येणार नाही, असा या विधेयकाचा मसुदा आहे. राहुल गांधी येत्या काळात तुरुंगात जातील याची दाट शक्यता आहे, हेच जयराम रमेश यांनी व्यक्त केलेल्या आनंदाचे कारण आहे.
दुहेरी नागरिकत्व, उत्पन्नाच्या तुलनेत अनेक पटीने असलेली मालमत्ता या प्रकरणांमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल आहेत. या प्रकरणांची प्रगती संथ गतीने सुरू आहे, परंतु संथ गतीने का होईना राहुल गांधी यांच्या अडचणी वाढतायेत. यापैकी अमर्याद संपत्ती प्रकरणी जनहित याचिकाकर्ते विघ्नेश शिशिर यांची सीबीआयने सलग तीन दिवस पाच-पाच तास चौकशी केली व त्यांच्याकडून माहिती घेतली.
ताज्या सुनावणीत अलाहाबाद उच्च न्यायालयाने ईडी (ED) आणि सीबीआयला या प्रकरणी पडताळणी करण्याचे आदेश दिलेले आहेत; त्यामुळे राहुल गांधी यांचे धाबे दणाणले आहेत. त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली आहे. हा आदेश देण्यापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांची बाजू ऐकून घेतली पाहिजे होती, त्यांना नोटीस बजावली पाहिजे होती, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलाने केला आहे.
ही विघ्नेश शिशिर यांचीही याचिका हलकीफुलकी नाहीये. राहुल गांधी यांच्या जगभरातील मालमत्तांचा तपशील या याचिकेमध्ये देण्यात आला आहे. विघ्नेश शिशिर त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “गेली ८० वर्षे देशाची लूट करून गांधी परिवाराने ट्रिलियन डॉलरची संपत्ती जमवली असून ही संपत्ती जगातील ६८ देशांमध्ये विखुरलेली आहे.” हेच राहुल गांधी यांचे फ्रस्ट्रेशन आहे. जो परिवार कधी काळी देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान होता, राष्ट्रपती, निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती करत होता, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करत होता; तो परिवार आता कायद्याच्या अशा कचाट्यात अडकला आहे की त्यातून सुटका नाही.
राहुल गांधी जे काय बोलतायत त्यामागे हे नैराश्य असले, तरी केंद्रात बसलेले भाजपचे नेते त्यांचा हा मूर्खपणा सहन का करतायत, असा प्रश्न भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना नेहमी पडलेला असतो. राहुल गांधी यांची रवानगी तुरुंगात का केली जात नाहीये, हा प्रश्नसुद्धा अनुत्तरित आहे.
मोदी आणि शाह यांना राहुल गांधी आणि गांधी परिवार यांची रणनीती स्पष्ट आहे. त्यांना जनतेच्या न्यायालयातच राहुल गांधी यांना पराभूत करायचे आहे. ही बाब मान्य केली तरीही राहुल गांधी यांचा आचरटपणा पाहून, त्यांची शिवीगाळ पाहून देशातील एका वर्गाला जोर येतो आणि हा वर्ग राहुल गांधी जे काय करतात त्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करतो, ही मात्र चिंतेची बाब आहे.
राहुल गांधी यांचा उद्देश स्पष्ट आहे; त्यांना आपण पंतप्रधानांपेक्षा भारी अशा प्रकारची प्रतिमा त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण करायची आहे. परंतु याच प्रयत्नामुळे गेल्या बारा वर्षांत त्यांच्या पक्षाची माती झाली, हे त्यांच्या लक्षात येत नाहीये. राहुल गांधी यांना असले माकडचाळे आवडतात हे लक्षात आल्यामुळे त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते आणि नुकतेच राज्यसभेत दाखल झालेले पवन खेडा यांनी संसदेच्या परिसरातच डोंबाऱ्याचा खेळ सुरू केला. हे टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून सगळ्या जगात दिसते आणि त्यातून मोदी सरकारची प्रतिमा कमजोर सरकार अशी निर्माण होऊ नये, याचा विचार झाला पाहिजे.
देशाच्या राजकारणात एक शिवीगाळ संस्कृती निर्माण झालेली आहे. जनतेच्या पाठिंब्यावर सत्तेवर विराजमान झालेल्या लोकांना याचा सामना करावा लागतोय. सरकारमध्ये बसलेल्या लोकांची दहशत असू नये, परंतु त्यांचा दरारा मात्र निश्चितपणे असावा. राहुल गांधी आणि कंपनी यांचे माकडचाळे लवकरात लवकर संपवावेत, अशी देशातील जनतेची इच्छा आहे. मोदी सरकारने या जनमताची दखल घेण्याची गरज आहे.
या माकडचाळ्यांचा समाजमनावर परिणाम होतोय. पूर्वी महाराष्ट्रामध्ये असा एकच नमुना होता, आता असे नमुने देशभरामध्ये निर्माण झालेले दिसतात; जे शिव्या घालून आपण किती धाडसी आणि निर्भीड आहोत, आपण कसे देशाच्या सर्वोच्च नेत्याला अंगावर घेऊ शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. त्याला चाप बसला पाहिजे. काही आजार अंगावर काढले की बळवतात, काट्याचा नायटा होतो. राहुल गांधी यांचे हे माकडचाळे बंद करण्यासाठी सरकारने उपाययोजना केली पाहिजे.
(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
