केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रणनीती आणि त्यांचे राजकारण काँग्रेससाठी एखाद्या भयस्वप्न राहिलेले आहे. देश बऱ्यापैकी काँग्रेसमुक्त करण्यात शहांचे योगदान मोठे आहे. तरीही काँग्रेस पुन्हा एकदा अमित शहा यांच्याशी पंगा घेण्याच्या तयारी आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात शिक्षण व्यवस्थेचा कायापालट करण्यासाठी नंदन नीलेकणी यांच्या नेतृत्वाखाली टास्क फोर्सची घोषणा केली. त्यामुळे सोमवार पासून संसदेचे अधिवेशन सुरळीतपणे सुरू होईल अशी अपेक्षा होती, परंतु विरोधकांनी आज देखील संसदेचे कामकाज बंद पाडले. ‘धर्मेंद्र प्रधान तो झांकी है, अमित शहा है’, अशा घोषणा देत विरोधीनी आपला अजेंडा स्पष्ट केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ही मोदी सरकारची भक्कम तटबंदी आहे. ते जोपर्यंत आहेत, तो पर्यंत सरकारचा चिराही ढळणार नाही, हे विरोधकांना ठाऊक आहे. त्यामुळे काँग्रेसने जुना खेळ सुरू केला आहे.
सार्वजनिक जीवनात काँग्रेसचा लौकीक पडद्यावरच्या शक्ती कपूरसारखा आहे, परंतु तरीही ते भारत भूषण असल्याचा आव आणत जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत असतात. काँग्रेस नेते विद्यार्थ्यांच्या संतापाचा रोख आता अमित शहा यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. जंतर मंतरवर आंदोलकांवर पेलेट गन आणि बिहारमध्ये आंदोलकांवर एक-४७ ने गोळीबार कऱण्यात आल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी यांनी पत्र लिहून याबाबत खुलासा करण्याची मागणी केली आहे.
सत्तेवर असताना आंदोलने चिरडण्याचा काँग्रेसचा इतिहास आहे. इंदीरा गांधी यांनी गोवंश हत्या बंदीची मागणी कऱणाऱ्या आंदोलनकर्त्या संतांना गोळ्या घालून ठार केले होते. जनतेचा असंतोष चिरडण्यासाठी देशावर आणीबाणी लादली होती. हा इतिहास जनता विसरलेली नाही. विद्यार्थ्यांबाबत कळवळा व्यक्त करणारे राहुल गांधी हे सोयीस्कर रित्या विसरतात की यूपीएच्या काळात किती तरी महत्वाच्या परीक्षांचे पेपर फुटले होते.
पेपर फुटी प्रकरणानंतर धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला. परंतु हा कधी विरोधकांचा अजेंडा नव्हताच. प्रधान असले काय, नसले काय, सरकारच्या मजबुती वर त्याचा काडीचाही परीणाम होणार नाही. सरकारच्या तटबंदीवर साधा ओरखडाही उठणार नाही. मित्र पक्षांच्या पाठिंब्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे सरकार उभे असले तरी भाजपाचे हे आजवरचे सगळ्यात मजबूत सरकार आहे.
हे ही वाचा:
ब्रांझपदकविजेत्या पॅरा पॉवरलिफ्टर झंडूकुमारला १० लाखांचे इनाम
‘कॉक्रोच’वर पोलिस कारवाई नको, नाहीतर पुन्हा आंदोलन
E20 धोरणावरून खोटे आरोप, डीपफेक, बदनामी; गडकरींची न्यायालयात याचिका
“आंदोलन झाले म्हणून लाठीमार करण्याचा अधिकार नाही”
आजवर देशात जी आघाडी सरकारे होती, त्यांचा लौकीक फारसा चांगला राहीलेला नाही. इतिहास असा आहे की, आघाडीत सामील असलेले मित्र पक्ष कायम मुख्य पक्षाला वाकवण्याची आणि त्यांच्याकडून काही तरी उकळण्याची संधी शोधत असतात. पेपर फुटी प्रकरणानंतर भाजपाच्या मित्र पक्षांमध्ये चलबिचल होईल, अशी अनेकांना आशा होती. प्रत्यक्षात रालोआतील प्रत्येक पक्षाने कमालीचा संयम बाळगत सरकारची पाठ राखण केली. भाजपासोबत सगळे पक्ष ठामपणे उभे राहीले. मित्र पक्षाच्या एकाही खासदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा किंवा अगदी धर्मेंद्र प्रधानांवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष टीका केलेली नाही. मोदींना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला नाही की, त्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला नाही. मित्र पक्षांच्या पाठिंब्यावर असलेले हे सरकार २०१४ किंवा २०१९ च्या तुलनेत अधिक भक्कम असल्यासारखे दिसते. यात अमित शहा यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.
अमित शहा हे मोदी सरकारचे ब्रह्मास्त्र आहे. कलम ३७० रद्द करण्याचा एखादा महत्वाचा निर्णय, सीएए कायदा, स्पेशल इंटेन्सिव्ह रिविजन सारखा उपक्रम असो वा एफसीआरएसारखे एखादे महत्वाचे विधेयक, संसदेत आणि संसदेबाहेर अमित शहा यांची त्यात अत्यंत महत्वाची भूमिका असते. रणनीती आखण्यापासून त्याची अंमल बजावणी करण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत त्यांची महत्वाची भूमिका असते.
२०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपाला २४० वर रोखण्यात विरोधकांना यश आले. काँग्रेसच्या जागा वाढल्या होत्या. हे सरकार सहा महिन्यात जाणार अशी अटकळ काँग्रेसने बांधली होती. परंतु आज दोन वर्षानंतर हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. भाजपाला लोकसभेत पाठिंबा देणाऱ्या खासदारांची संख्या वाढली आहे. एनडीएचा विस्तार झाला आहे. तृणमूल काँग्रेसचे फुटलेले २० खासदार आणि उबाठा शिवसेनेचे फुटलेले ६ खासदार यांची रालोआमध्ये भर पडली आहे. रालोआचे संख्याबळ २९३ वरून ३१८ वर गेले.
यंदाच्या अधिवेशनात नारी शक्ती वंदन, डिलिमिटेशन, सुधारीत एफसीआरए आदी विधेयके संसदेत मांडण्यात येणार आहेत. ती मंजूर होतील अशी फिल्डींग अमित शहा गेले तीन महिने लावत होते. याच प्रयत्नांत सरकार अधिक भक्कम झाले आहे. ही मजबूती आणणारे रसायन म्हणजे अमित शहाच आहेत. ते जोपर्यंत आहेत, तोपर्यंत सरकारचे कोणीही काही वाकडे करू शकत नाही, याची उपरती काँग्रेसला झाली आहे.
मोदी सरकार उलथवण्यासाठी जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला काँग्रेस, समाजवादी पार्टी यांनी हवा दिली. आम आदमी पार्टीचे या आंदोलनाची सूत्रधार होती. एवढे करून सरकार उलथवणे काँग्रेसला शक्य झाले नाही. मोदींना नामोहरम करायचे असेल तर आधी अमित शहा यांचा बंदोबस्त करावा लागणार हे काँग्रेसला ठाऊक आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या संतापाची तोफ अमित शहा यांच्या दिशेने वळवण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे.
जंतर मंतर वर आंदोलन करताना पोलिसांनी बळाचा वापर केला, अमित शहा यांच्या आदेशावरून पोलिसांनी हे आंदोलन कठोरपणे चिरडले, असा नरेटीव्ह चालवण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतायत.
जंतर मंतर वर तोडफोड कऱणाऱ्या आंदोलकांचा बंदोबस्त करण्याचे काम पोलिस करतायत. एकेकाला बिळातून शोधून बाहेर काढले जात आहे. त्यांचा त्रागा आणि थयथयाट सोशल मीडियावर पाहायला मिळतो आहे. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांना कोणताही उपद्रव होताना दिसत नाही, परंतु आंदोलनाच्या नावाखाली ज्यांनी आपला मोदी विरोधाचा कंड शमवण्याचा प्रय़त्न करताना कायद्याची चौकट मोडली, त्यांचे हिशोब आता चुकते होते आहेत. अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. अशी कारवाई होते आहे की, जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनात जो अश्लीलतेचा बीभत्स नाच दिसला तसा नाच यापुढे दिसणार नाही. काँग्रेसला वाटते आहे की, यातून आणखी एक नवी ठिणगी पडेल. आणखी भडका उडेल. एकट्याच्या बळावर सरकारच्या विरोधात आंदोलन कऱण्याची काँग्रेसची ताकद नाही. त्यामुळे आयत्या आंदोलनावर स्वार होऊन अमित शहा यांच्याविरोधात फैरी झाडण्याचा प्रयत्न काँग्रेसवाले करतायत.
काँग्रेस पुन्हा एकदा आगीशी खेळण्याचा प्रयत्न करते आहे. २०१० मध्ये हा प्रयोग काँग्रेसने केला होता. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांचा काटा ढीला कऱण्यासाठी यूपीए सरकारने सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणाचे कुभांड रचले, त्यात त्यांना मोदींना अडकवायचे होते. परंतु थेट त्यांना अडकवणे शक्य नसल्यामुळे आधी सीबीआयने अमित शहा यांना अटक केली. त्यांच्या तोंडून सीबीआयला मोदींचे नाव वदवून घ्यायचे होते. ते त्यांना शक्य झाले नाही. पुढे या प्रकरणातून अमित शहा यांची निर्दोष सुटका झाली. काँग्रेसचा चाल अगदीच वाया गेली, आता पुन्हा एकदा तीच खेळी खेळण्याचा काँग्रेसचा प्रय़त्न आहे. मोदी सरकार पाडायचे असेल तर आधी अमित शहा यांना पत्ता कापणे, काँग्रेससाठी गरजेचे झाले आहे. त्यांना याची कल्पना नाही. गेल्या १६ वर्षांच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्या काळच्या तुलनेत काँग्रेस बरीच दुबळी झाली आहे. अमित शहा यांचे वजन बरेच वाढले आहे. जर काँग्रेसची ताकद असती तर विरोधी पक्ष नेते पदावर राहुल गांधी असताना अमेरिकेतून कॉक्रोच आयात करण्याची गरज कुणाला पडली नसती.
(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
