जंतर मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणावरून जे आंदोलन झालं, ते जेन झीचं आंदोलन म्हणून सुरुवातीला सांगितलं गेलं. प्रश्नही महत्त्वाचा होता. पेपरफुटी होऊन त्यात अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या पालकांची दयनीय स्थिती झाली. त्यामुळे हा विषय महत्त्वाचाच होता. पण तो विषय केवळ एक मुखवटा होता हे हळूहळू सगळ्यांच्या लक्षात आलं. आंदोलनामागे एक वेगळं राजकारण चालत असल्याचं स्पष्ट होऊ लागलं.
याच आंदोलनात विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडून नको त्या गोष्टींना थारा दिला जाऊ लागला, आपले वैयक्तिक रागलोभ काढण्याचा मंच म्हणून या आंदोलनाच्या व्यासपीठाचा उपयोग झाला. त्याचवेळी लहान लहान मुलांना शिव्या देण्याचे एकप्रकारे ट्रेनिंग देणारे तर हे आंदोलन नाही ना, असा संशयही यायला वाव होता. अशा अनेक लहान विद्यार्थ्यांचे व्हीडिओ समोर आले, ज्यातून हे विद्यार्थी अत्यंत घाणेरड्या शिव्या, अभद्र शब्द वापरताना दिसून आले. पण विशेष म्हणजे हे सगळे विद्यार्थी फक्त नरेंद्र मोदींना शिव्या देत होते. त्यांच्या बोलण्यात ना पेपरफुटीचा उल्लेख होता ना शिक्षणातील गुणदोषांचा. याचा अर्थ या मुलांना अशा शिव्या देण्यासाठी मोबाईल कॅमेऱ्याच्या मागे काही कपटी लोक प्रवृत्त करत होते, हे पुरेसे स्पष्ट आहे.
यातल्या एका मुलीचा व्हीडिओ तेव्हा व्हायरल झाला. तिने मोदींना यथेच्छ शिव्या घातल्या. पण नंतर त्याच मुलीचा हात जोडून माफी मागतानाचा व्हीडिओ देखील समोर आला. त्यात तिने आपली चूक झाली, आपण जे बोललो ते निषेधार्हच आहे. आपल्याला कुणीतरी हे बोलण्यास भाग पाडत होते, आम्हीही उत्साहाच्या भरात ते बोलून गेलो, असे तिने स्पष्टपणे सांगितले. याचा अर्थ या विद्यार्थ्यांना आपल्या जाळ्यात ओढून मोदींनी शिव्या देण्याचा कार्यक्रम काही लोकांनी उरकून घेतला. आता ते सगळे अंतर्धान पावले आहेत.
हे ही वाचा:
मोदींना शिवीगाळ करणाऱ्या ‘त्या’ १५ वर्षीय मुलीविरुद्ध गुन्हा नाही
महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण सिंह निर्दोष
‘आप’च्या माजी आमदारांचा मकोका प्रकरणात जामीन फेटाळला
झारखंड पेपरफुटीविरोधात विद्यार्थी संतप्त, ‘कॉक्रोच’ गैरहजर
पण यानिमित्ताने या शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल लोकांच्या मनात असलेला संताप नंतर उसळून बाहेर येऊ लागला. लोक या शिव्या देणाऱ्या विद्यार्थ्यांना शोधून शोधून त्यांच्यावर टीका करू लागले, त्यांना धमक्या दिल्या जाऊ लागल्या. काही अशा मुलांना मारहाणही झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच व्हीडिओ करत यासंदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केली. तोच टर्निंग पॉइंट होता. ते म्हणाले की, या मुलांना माफ करा. त्यांनी उत्साहाच्या भरात, विचार न करता वक्तव्य केली आहेत. त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांची दिशाभूल झाली आहे.
नरेंद्र मोदींच्या या वक्तव्याने खूप मोठा बदल झाला. निदान सोशल मीडियावर या शिवीगाळ करणाऱ्या मुलांविरोधात जो राग व्यक्त होत होता, तो बऱ्याचप्रमाणात कमी झाला. अजूनही अनेकांवर गुन्हे दाखल आहेत, पण कदाचित तेही येत्या काळात एकतर मागे घेतले जातील किंवा त्या मुलांनी माफी मागितली तर पुढे काही कारवाई होणार नाही.
पण या मुलांनी जी मर्यादा ओलांडली होती, ती निश्चितच संतापजनकच होती. त्यांना कुणीतरी समजावून सांगण्याची आवश्यकता होती, त्यांचे चुकले आहे, त्यांनी असे करून आपल्या भविष्याचे वाटोळे करून घेऊ नये हे सांगितले गेले असते तर ते थांबले असते. पण नरेंद्र मोदी यांच्या विरोधकांसाठी विद्यार्थ्यांनी केलेली शिवीगाळ ही अमृतासमान होती. ते प्रत्यक्ष आंदोलनात नसले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून या शिवीगाळीचे निर्लज्ज समर्थन करताना दिसले. त्यामुळे आपण केलेली शिवीगाळ ही कशी योग्य आहे, असेही या भरकटलेल्या विद्यार्थ्यांना वाटले असेल तर त्यात त्यांची काय चूक?
सदर मुलीने सोशल मीडियातच हात जोडून माफी मागितली आहे. आपण चुकलो आहोत, याची जाणीव तिला झाली आहे. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोदींनी केलेल्या व्हीडिओरूपी आवाहनामुळे या मुलांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला. या मुलीच्या आईने आपली प्रतिक्रिया देताना आपल्या मुलीची चूक कबूल केली. तिने अशा शब्दांचा वापर करणे टाळले पाहिजे होते, हे त्या म्हणाल्या. त्यांनी मोदींचे आभार मानले आणि मोदींनी केलेल्या आवाहनामुळे आपल्या मुलीला एक नवे जीवन मिळाले, माझ्या मुलीचा पुन्हा एकदा जन्म झाला, असे त्या म्हणाल्या त्याला वेगळा अर्थ आहे. तो सगळ्या पालकांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.
या वयात आंदोलनाची, क्रांती घडविण्याची अनेकांमध्ये उर्मी असते. मात्र आपण कुणाच्या हातचे बाहुले तर बनत नाही ना याची या मुलांना समज नसते. त्या मुलीविरोधात जर पुढील पोलिसी कारवाई झाली, तर तिच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होईल, याचे भान सर्वांनीच बाळगणे आवश्यक आहे. तरुणांमध्ये राग, संताप असू शकतो, पण त्याचा योग्य वापर करून, विविध क्षेत्रात कसा बदल करता येईल, हा विचार केला गेला पाहिजे. पण या आंदोलनातून आपल्या पोळ्या शेकण्यासाठी या संतापाच्या ऊर्जेचा वापर काही नतद्रष्ट लोकांनी केला. तेच आज या शिव्यांचे समर्थन करत आहेत, कारण त्यांना आपल्या बंदुका चालविण्यासाठी कुणाचे तरी खांदे हवेच असतात.
मोदींनी केलेल्या आवाहनाचा फायदा या मुलीला झाला. तिचे मतपरिवर्तन आणि मनपरिवर्तन झाले. मोदींनी केलेल्या व्हीडिओनंतर काही तासांनी या मुलीनेही आपले मतपरिवर्तन झाल्याचा व्हीडिओ टाकला. आपण गंभीर चूक केली असून यापुढे आपण अशी चूक करणार नसल्याचे तिने म्हटले होते. या मुलीने शिवीगाळ केल्यानंतर तिच्या आईची अत्यंत वाईट अवस्था झाली. आपली मुलगी अशी कशी काय बोलू शकते, याचा विचार करून तिला अस्वस्थ वाटू लागले. पण जेव्हा मोदींनी आवाहन केले तेव्हा तिला आपल्या मुलीला दिलासा मिळेल अशी आशा वाटू लागली. अशा लहान मुलांना आंदोलनात सहभागी होऊ देऊ नका, त्यांना सोशल मीडियापासून दूर ठेवा असे आवाहन करायला त्या विसरल्या नाहीत. हीच बहुसंख्य पालकांची स्थिती आहे. या आंदोलनाचा ज्यांनी अत्यंत घाणेरड्या पद्धतीने स्वतःच्या राजकारणासाठी उपयोग केला आणि त्यातून या मुलांचे आयुष्य एकप्रकारे दावणीला बांधले त्यांचे खरे उद्देश आज लोकांना कळू लागले आहेत.
या मुलांविरुद्ध जो संताप उफाळून येऊ लागला तेव्हा मोदींना याचे अचूक आकलन झाले की, हीच वेळ आहे हे सगळे थांबविण्याची आणि या मुलांना एकप्रकारे या संतापाच्या उद्रेकातून दूर ठेवण्याची. त्यामुळेच त्यांनी तो व्हीडिओ केला असला पाहिजे. आज काही दळभद्री मानसिकता असलेले लोक मोदींनी या मुलांना माफ करा म्हणण्याऐवजी स्वतःच माफी मागितली पाहिजे, असे बोलत आहेत. अशा लोकांचे या शिव्यांना पूर्ण समर्थन आहे, या मुलांचे मारेकरी खरे ते आहेत. पण मोदींच्या आवाहनामुळे अशा पालकांना जाणीव झाली की, मुलांना अशा आंदोलनांपासून, उद्रेकापासून दूर ठेवणे आवश्यक आहे. कारण आज याच आंदोलनातचे नेतृत्व करणारे दीपके, आशुतोष रांका, सौरव दास यासारखी मंडळी आपापल्या घरी मजेत आहेत, त्यांना या मुलांच्या जीवनाविषयी, त्यांच्यावर गुदरलेल्या प्रसंगाविषयी जराशीही जाणीव नाही.
आपल्या आंदोलनाचा उपयोग करून या मुलांना चुकीच्या मार्गाला लावण्याचे काम केले गेले, याचे भानही या आंदोलनाच्या नेत्यांना नाही. उलट मुलं चेष्टेने बोलली असतील तर त्याचा एवढा बाऊ करण्याची काय आवश्यकता आहे, असा निर्लज्ज, बेशरम प्रतिवाद ही मंडळी करत आहेत. हा असा प्रतिवाद ते यामुळेच करू शकतात, कारण त्यांना या मुलांचे काय होईल, याच्याशी देणेघेणे नाही. आंदोलन करताना सरकारने कशी अकाऊंटेबिलीटी म्हणजे जबाबदारीचे भान राखले पाहिजे याचे गुणगान गाणारी हीच मंडळी होती. ही तीच माणसे या लहान लहान मुलांची जबाबदारीही घ्यायला तयार नाहीत. आज पालकांना लक्षात आले असेल की, ज्या मुलांनी शिव्या दिल्या, त्यांनाच त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत, आंदोलनाचे नेते मात्र मस्त मजेत आहेत. ते ना या विद्यार्थ्यांसाठी पोलिस ठाण्यात येत आहेत किंवा त्यांच्याविरुद्ध असलेले एफआयआर मागे घेण्यासाठी कोणता पुढाकार घेत आहेत.
मोदींच्या या व्हीडिओमुळे मात्र सगळा नूर बदलून गेला. या मुलीची आई जे बोलली ते सगळ्या पालकांचेच प्रातिनिधिक विचार असले पाहिजेत. यापुढे कदाचित अशा आंदोलनापासून या लहान मुलांनी दूर राहावे आणि त्याना कुणीतरी आपल्या राजकारणासाठी बळीचा बकरा बनवू नये याची काळजी हे पालक नक्की घेतील. एकीकडे आज राष्ट्रकुल स्पर्धेत विविध खेळातील तरुण तरुणी पदके जिंकत आहेत, देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नावारूपास आणत आहेत, पण इकडे काही देशविघातक लोकांना देशातील तरुणांना फक्त भडकवायचे आहे, त्यांना अराजक निर्माण करण्यासाठी प्रवृत्त करायचे आहे, त्यांच्यासाठी अराजक ही सुसंधी आहे. हे लक्षात घेऊन आजच्या पालकांनी आपल्या मुलांना अशा स्वार्थी आंदोलनांपासून दूर ठेवले पाहिजे. तसा विचार करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी पालकांना, भरकटलेल्या विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले, त्याबद्दल त्यांचे आभारच मानले पाहिजेत.
