महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत दाखल प्रकरणात आम आदमी पक्षाचे (आप) माजी आमदार नरेश बाल्यान यांना दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. न्यायमूर्ती मनोज जैन यांच्या खंडपीठाने सोमवारी (३ ऑगस्ट) बाल्यान यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. हे प्रकरण फरार गँगस्टर कपिल सांगवान उर्फ नंदू याच्या कथित संघटित गुन्हेगारी टोळीशी संबंधित आहे.
नरेश बाल्यान यांचे या टोळीशी संबंध असल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी केला आहे. बाल्यान आणि कपिल सांगवान यांच्यात झाल्याचा दावा करण्यात आलेल्या मोबाईल संभाषणाच्या ऑडिओ क्लिपच्या आधारे तपास यंत्रणांनी हा आरोप केला आहे. या प्रकरणात नरेश बाल्यान यांना डिसेंबर २०२४ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने (क्राइम ब्रँच) बाल्यान आणि इतर काही आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
दरम्यान, याच काळात दिल्लीतील आणखी एका गाजलेल्या प्रकरणातही न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ३१ जुलै रोजी कडकडडूमा न्यायालयाने २०२० च्या ईशान्य दिल्ली दंगलीदरम्यान आयबी अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहिर हुसेन यांच्यासह पाच दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यापूर्वी १३ जुलै रोजी न्यायालयाने सुनावणी पूर्ण करून ताहिर हुसेन, नाझिम, कासिम, जावेद आणि अनस यांना हत्या आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले होते. शिक्षा सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांनी सर्व दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
हे ही वाचा:
महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण सिंह निर्दोष
पाकिस्तानात रॅलीवर आत्मघाती हल्ला
रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकल्यास दंड!
तेल स्वस्त, बाजार मस्त! सेन्सेक्स ७९ हजारांच्या उंबरठ्यावर
हे प्रकरण फेब्रुवारी २०२० मधील ईशान्य दिल्ली दंगलीदरम्यान घडले होते. त्यावेळी गुप्तचर विभागाचे (आयबी) सुरक्षा सहाय्यक अंकित शर्मा यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांचा मृतदेह चांदबाग परिसरातील नाल्यात आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालानुसार, त्यांच्या शरीरावर ४० हून अधिक जखमा आढळल्या होत्या. या खटल्यात एकूण ११ आरोपींवर न्यायालयात खटला चालवण्यात आला होता. त्यापैकी पुराव्याअभावी सहा आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली, तर ताहिर हुसेन यांच्यासह पाच जणांना दोषी ठरवण्यात आले.







