पश्चिम बंगाल निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात विक्रमी ९२.०३ टक्के मतदान झाल्यामुळे डावे आणि पुरोगामी पिसाळले आहेत. मुख्य निवडणूक आय़ुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांना हटवण्यासाठी राज्यसभेच्या ७३ खासदारांनी महाभियोगाची नोटीस दिलेली आहे. काँग्रेसी इकोसिस्टीमचा अविभाज्य भाग असलेले पाकीट पत्रकारही आपापल्या परीने ज्ञानेश कुमार यांच्यावर तीर चालवतायत. भाजपाचे नेते मात्र ज्ञानेश कुमार यांची भरभरून प्रशंसा करून विरोधकांच्या भळभळत्या जखमांवर मीठ चोळतायत.
पहिल्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर भाजपा नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेतली. जनतेचे आभार मानले. जनतेला निर्भय होऊन मतदान करण्यासाठी योग्य वातावरण निर्मिती केल्याबद्दल मुख्य निवडणूक आय़ुक्त ज्ञानेश कुमार आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांचे आभार मानले. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सुर्यकांत यांनी विक्रमी मतदानाची प्रशंसा केली.
काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी तर ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण देण्याची मागणी केली. अर्थात हा खवचट टोला होता. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वसर्मा यांना कपिल सिब्बल यांच्या टिप्पणीबाबत विचारण्यात आले तेव्हा पद्मभूषण कशाला ज्ञानेश कुमार यांना भारतरत्न द्यायला हवे असे सांगत त्यांच्या चिरपरिचित शैलीत चौकार मारला. मृतांची, परराज्यात गेलेल्या मतदारांची आणि बांगलादेशी घुसखोरांची ९१ लाख नावे कापल्याचा विरोधकांना काही त्रास झालाय. ही मते राहिली असती तर ममतांना सोयीचे झाले असते, भाजपाला फटका बसला असता, असा विचार या जळफळाटामागे आहे.
हे ही वाचा:
अल्पवयीन मुलीची बदनामी; गुजरातमधून एकीला अटक
२७ वर्षांनंतर गुंडाच्या पुतण्याने ‘खबऱ्या’चा काटा काढला
पश्चिम बंगालमध्ये रेशन घोटाळ्यावर ईडीची धडक कारवाई
टीसीएस प्रकरण बनावट असल्याचा डाव्यांचा अजब सत्यशोध
२०२१ मध्येच ममता बॅनर्जी हरल्या असत्या. बांगलादेशी घुसखोरांच्या मतांनी आणि दहशतीने त्यांना तारले. ४ मे रोजी काय निकाल लागायचे ते लागतील. परंतु २०२६ च्या निवडणुकीत ज्ञानेश कुमार यांच्यामुळे बांगलादेशी मतदार यादीतून बऱ्यापैकी कमी झाले. मृत आणि परराज्यात गेलेल्या मतदारांच्या नावे मतदान करता आले नाही. दहशत पसरवून मतदारांना घरी बसवता आले नाही किंवा त्यांच्या नावाने मतदान करता आले नाही.
२०२१ ची निवडणूक आणि यंदाची निवडणूक वेगळी का याचे उत्तर ६ एप्रिल रोजी इंडिया टू डेमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात आहे. २०२१ च्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या ३०० घटना झाल्या. ५८ जणांचा मृत्यू झाला. यंदाच्या निवडणुकीत एकही बळी गेला नाही. काही ठिकाणी दहशतीचे प्रयोग झाले. दहशतीचे जे व्हीडीयो समोर आले त्यात चटेरी पटेरी लुंगीवाले आघाडीवर होते. लुंगी हा काही बंगाल्यांचा पेहराव नाही. तो बांगलादेशींचा आहे. त्यामुळेच हे गुंड ममता यांनी पोसलेले बांगलादेशी होते, असे मानायला वाव आहे. केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांचा व्यवस्थित पाहुणचार केला. कुमारगंज मतदार संघातील भाजपाचे उमेदवार शुभेंदु सरकार यांना मारहाण करणाराही लुंगीवाला होता.
आर्म्ड कॉन्फिक्ट लोकेशन एण्ड एव्हेट डेटा प्रोजेक्टच्या आकडेवारीत पश्चिम बंगालच्या हिंसाचाराचे आकडे समोर आले आहेत. हिंसाचाराच्या एकूण ३०० घटनांपैकी उत्तर २४ परगणा आणि दक्षिण २४ परगणामध्ये हिंसाचाराच्या ७४ घटना आहेत. उत्तर २४ परगणा जिल्ह्यात ३३ जागा आहेत. २०२१ मध्ये मुस्लीमांचा टक्का ७३.४६ होता. तृणमूलने ३३ पैकी २८ जागा जिंकल्या होत्या. दक्षिण २४ परगणा येथे ३१ जागा आहेत. मुस्लीमांचा टक्का ६३.१७ होता. इथे तृणमूलने ३० जागा जिंकल्या होत्या. हिंसाचार आणि तृणमूलच्या विजयाचे थेट कनेक्शन स्पष्ट करण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी आहे.
२०२० ते २०२६ या काळात देशात ज्या निवडणुका घडल्या त्यात सर्वाधित हिंसाचाराच्या ३०० घटना प.बंगालमध्ये झाल्या होत्या. त्या खालोखाल दुसरा क्रमांक आंध्रचा आहे. तिथे ८९ घटना घडल्या होत्या. म्हणजे हिंसाचाराच्या बाबतीत प.बंगाल किती पुढे आहे, हे लक्षात येऊ शकेल. हे यंदा घडले नाही. त्याचे स्पष्ट कारण निवडणूक आयोगाने केलेल्या उपाय योजना. केंद्रीय सुरक्षा दलांची हजेरी.
निवडणूक आयोगाच्या उपाययोजना नसत्या तर पुन्हा लुंगीवाल्यांनी उच्छाद मांडला असता आणि निवडणुका हायजॅक केल्या असत्या. त्यामुळे तृणमूलच्या नेत्यांना ज्ञानेश कुमार सलतायत.
हे २०२१ मध्ये घडू शकले नाही, त्याचे कारण त्यावेळी जगावर कोरोनाचे संकट होते. सरकारचा प्राधान्यक्रम कोरोनातून देशाची सुटका कऱणे हा होता. निवडणूक आय़ोगालाही पश्चिम बंगालमध्ये तयारीची संधी मिळाली नाही. यंदाच्या तुलनेत केंद्रीय सुरक्षा दलाची उपस्थिती निम्मीही नव्हती. त्याचात फायदा उठवत २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत १६८१ लोक जखमी झाले हा आकडा २०१६ ची विधानसभा निवडणूक, २०२४ ची लोकसभा निवडणूक यांची तुलना केली तर हा आकडा सगळ्यात मोठा आहे. त्यातुलने २०२६ मध्ये निवडणुकीच्या पहील्या टप्प्यात मतदान ३० लोक जखमी.
अर्थ स्पष्ट आहे. संधी मिळाली असती तर या निवडणुकीतही तोच प्रकार घडला असता. ती संधी केंद्रीय सुरक्षा दल आणि निवडणूक आय़ोगाने केलेल्या कठोर उपाययोजनांमुळे शक्य झाले नाही. त्यामुळे तृणमूलचे कार्यकर्ते निवडणूक आय़ुक्तांवर पिसाळले आहेत. त्यांना पदावरून हटवण्यासाठी महाभियोग आणण्याची तयारी करीत आहेत.
हे नैराश्य का आहे, त्याचे कारण अनुभ्राता मोंडल या तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांमुळे स्पष्ट झालेले आहे. हा वरीष्ठ तृणमूल नेता. बीरभूम जिल्ह्याचा अध्यक्ष. केष्टो म्हणून सुपरिचित. हा दबंग नेता आहे. गुरांच्या तस्करी प्रकरणी तुरुंगावारी करून आलेला आहे. तो म्हणतोय की १५२ पैकी १५-१६ जागा तृणमूलला मिळतील. मी माझ्या आयुष्यात इतके मतदान पाहिले नाही. भाजपाची लाट नाही, त्सुनामी आहे.
अमित शहा म्हणाले की, प.बंगालमध्ये भाजपाची त्सुनामी आहे, तर त्याला फार महत्व नाही. कोणत्याही पक्षाचा नेता निकाल जाहीर होईपर्यंत आपल्याच विजयाचा दावा करणार. मोंडल यांची भविष्यवाणी विपरीत आहे. एका भेदरलेल्या सत्ताधारी नेत्याची ती भविष्यवाणी आहे. त्यात तथ्य किती हे येत्या ४ मे रोजी उघड होणारच आहे. परंतु मोंडल यांच्या भाकीतामुळे तृणमूलच्या नेत्यांची झोप उडालेली आहे. भडकलेले तृणमूल नेते वड्याचे तेल वांग्यावर काढीत, हा राग ज्ञानेश कुमार यांच्यावर काढतायत.
हा राग यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि अलिकडे हिमंता बिस्वसर्मा यांच्यावर सुद्धा काढण्यात येतो. या मंडळींचे दुर्देव असे या जळफळाटाचा काही फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे ज्ञानेश कुमारांचेही काही वाकडे होण्याची शक्यता नाही.
(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
