31 C
Mumbai
Thursday, April 9, 2026
घरसंपादकीयमोदी हरले, शाहबाज जिंकले?

मोदी हरले, शाहबाज जिंकले?

Google News Follow

Related

इराणची सभ्यता नष्ट करण्याच्या बाता करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा इराण समोर वाकले.  दोन आठवड्यांची नवी युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. पुढील वाटाघाटी इस्लामाबादमध्ये होणार आहेत. युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांनी विजयी झाल्याचा दावा केलाय. अनेकांनी या तात्पुरत्या युद्धविरामाची माळ पाकिस्तानच्या गळ्यात घातली आहे. ‘मोदी हरले, शाहबाज जिंकले’, असा दावा भारतातील पाकिस्तानचे दलाल करतायत. काही जणांना यात ‘चीन-रशियाचा अदृश्य हात’ दिसतो आहे. प्रत्यक्षात यात ‘अग अग म्हशी मला कुठे नेशी’, असा प्रकार असण्याची शक्यता जास्त आहे. ट्रम्प यांची आगतिकता हेच सांगते आहे.

ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी काढलेले पत्रकच पोस्ट केले आहे. या पत्रात अब्बास अरागछी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी एक्सवर केलेली पोस्ट आणि अमेरिकेने केलेल्या विनंती नंतर इराणच्या सुप्रीम नॅशनल काऊंसिलने दोन आठवड्यांच्या युद्धबंदीच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे जाहीर केले आहे. म्हणजे प्रस्ताव अमेरिका आणि ट्रम्प यांचा पिट्टू असलेल्या शाहबाज यांच्याकडून आला. इराणने त्याला होकार कळवला. युद्धाच्या काळात निरोप्या म्हणून केलेल्या कामावर ट्रम्प खूष आहेत. त्यांनी ट्रुथ सोशलवर फिल्डमार्शल असीम मुनीर आणि शाहबाज यांचा उल्लेख केला आहे. हा जगातील एकमेव फिल्ड मार्शल असावा जो युद्ध सुरू असताना पूर्ण काळ बंकरमध्ये बसून होता आणि अन्य दोन देशांमध्ये दंगल सुरू असताना शांतीदूताचे काम करतो आहे. खरे तर ट्रम्प यांनी नोबेलसाठी या दोघांची शिफारस करून परतफेडची संधी साधली पाहिजे. कारण यापूर्वी या दोघांनी त्यांच्या नावाची नोबलेसाठी शिफारस केली होती.

‘अमेरिकेने हल्ले थांबवले तर आम्हीही प्रत्युत्तर देणार नाही’, असे या पत्रकात स्पष्ट केलेले आहे. ‘ट्रम्प यांचा १५ कलमी प्रस्ताव आणि इराणचा १० कलमी प्रस्तावावर इस्लामाबादेत वाटाघाटी होतील, दरम्यान होर्मुजवर इराणच्या आयआरजीसीचे नियंत्रण असेल’, असे या पत्रकात म्हटले आहे. म्हणजे ट्रम्प यांनी मंगळवारी दिलेली रात्रीच्या रात्री सिव्हीलायझेशन संपवण्याची धमकी प्रत्यक्षात युद्धबंदीची विनवणी होती, असे उघड झालेले आहे. ‘ट्रम्प ऑलवेज चिकन्स आऊट’ ही उक्ती ट्रम्प यांनी पुन्हा एकदा सार्थ ठरवलेली आहे.

हे ही वाचा:

लाच घेताना शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र आहिरेला रंगेहाथ अटक

तैवानमधील निवडणुकांत चीन करणार सायबर हल्ले

सेन्सेक्स तब्बल २,९४६ अंकांनी उसळला, निफ्टी २४,००० च्या उंबरठ्यावर

तामिळनाडूत हेड कॉन्स्टेबल रेवतीने नऊ पोलिसांना फाशीच्या तख्तावर पोहोचवले!

अरागछी यांचे जे पत्रक ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर अपलोड केले आहे, त्याचा अर्थ स्पष्ट आहे. आधी शाहबाज शरीफ यांनी एक्सवर पोस्ट करून ट्रम्प यांच्या वतीने नाक रगडले. त्यानंतर ट्रम्प यांनी नाक रगडले. त्यानंतर इराणने युद्धबंदीसाठी सहमती दर्शवली. इराणच्या तुलनेत ट्रम्प युद्धबंदीसाठी उतावीळ होते. पाकिस्तानचे नेते ट्रम्प यांच्या इच्छेप्रमाणे घडावे यासाठी प्रयत्नशील होते. त्यासाठी त्यांना ठरलेला मेहनताना मिळणार आहे.

ट्रुथ सोशलवर ट्रम्प आपल्या दुसऱ्या पोस्टमध्ये म्हणतायत की, ‘शाहबाज आणि फिल्ड मार्शल असीम मुनीर यांनी केलेल्या विनंतीनंतर हल्ला रोखण्याचा मी निर्णय घेतला’. असीम मुनीर आणि शाहबाज यांना विनंती करायलाही ट्रम्प यांनी सांगितले असणार, याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही. यूएई आणि सौदी यांनी ‘कर्जाची परतफेड करा’, असा तगादा लावल्यानंतर पाकिस्तानची परिस्थिती इतकी वाईट झालेली आहे की, ते स्वत:ची लंगोटी सांभाळणार की युद्धबंदीसाठी प्रयत्न करणार? परंतु त्यांना करणे भाग पडले. कारण मालकाची आज्ञा झाली. ते फक्त मालकाच्या आज्ञेचे पालन करीत होते.

शाहबाज आणि मुनीर यांचे शेपूट पकडून ट्रम्प ‘अग अग म्हशी…’ करत युद्धबंदीच्या दिशेने रवाना झाले. होर्मुजचा ताबा त्यांनी आयआरजीसीला दिला. म्हणजे ज्यांना नष्ट कऱण्याची भाषा ट्रम्प करत होते, त्यांना त्यांनी होर्मुजच्या किल्ल्या दिल्या.

आधीच्या पोस्टमध्ये ट्रम्प हेही जाहीर करून बसले आहेत की, आम्ही आमची युद्ध उद्दीष्टे आधीच गाठली आहेत. इराणमध्ये आधीच्या तुलनेत थोडे मवाळ सरकार आलेले आहे. ट्रम्प यांना हे किती उशीरा सुचले आहे. हल्ल्याच्या पहिल्या दिवशी अयातुल्ला अली खोमेनी यांच्या सह आयआरजीसीच्या ४८ म्होरक्यांचा खात्मा झाला, तेव्हाच ट्रम्प यांनी हे जाहीर करायला हवे होते. त्यानंतर मुज्तबा खोमेनी सत्तेवर आले. तेव्हापासून तेच आहेत. ते मवाळ आहेत, याचा एवढ्या उशीरा ट्रम्प यांना साक्षात्कार होण्याचे करण्याचे काहीच कारण नव्हते. काल ट्रम्प यांनी इराणी सिव्हीलायझेशन संपवण्याची धमकी दिल्यानंतर जगभरातून विरोधात प्रतिक्रिया उमटल्या. ट्रम्प यांना देशांतर्गत विरोधाचे ओझेही जड झालेले आहे.

इराणने ज्या दहा अटी पुढे केल्या आहेत त्या मान्य करणे ट्रम्प यांना अशक्य आहे. ‘संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद आणि आंतरराष्ट्रीय आण्विक ऊर्जा संस्थेने लादलेले निर्बंध उठवा, आखातातील लष्करी तळ उठवा, होर्मुजचे नियंत्रण इराणकडे असेल, इथे इराणकडून टोल वसुली होईल. इराण आणि हिजबुल्लावर होणारे हल्ले तात्काळ थांबवण्यात यावे, भविष्यात हल्ला न करण्याची हमी आणि युद्धाची नुकसान भरपाई’, या इराणच्या अटी आहेत. यापैकी इराणने अटींचा जो प्रस्ताव फार्सीमध्ये जाहीर केला त्यात ‘युरेनियम शुद्धीकरणाचा’ मुद्दा आहे, इंग्रजी प्रस्तावात तो वगळण्यात आला आहे, असे ‘द गार्डीयन’ने म्हटले आहे.

या अटी नव्या नाहीत. जो अण्वस्त्रांचा धोका टाळण्यासाठी इस्त्रायलने इराणवर हल्ले सुरू केले तो धोका यापुढेही कायम राहील, असे या प्रस्तावावरून दिसते. इस्त्रायल त्याला संमती देईल याबाबत साशंकता आहे. तुर्तास दोन्ही बाजूने किमान बसू आणि बोलू यावर सहमती झालेली आहे, हेही नसे थोडके. ट्रम्प यांच्या धमक्या तडजोडीसाठी वापरलेले दबाव तंत्र होते. सिव्हीलायझेशन नष्ट करण्यासाठी अण्वस्त्रांचा पर्याय वापरण्याची आपली तयारी आहे, असे त्यांना सूचित करायचे होते. ट्रम्प इराणच्या विरोधात अण्वस्त्रे वापरतील आणि रशिया चीन पाहात बसतील याची अजिबात शक्यता नव्हती. युद्धबंदीसाठी चीननेही प्रयत्न केले होते. चीन हा इराणचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी इराणला चर्चेसाठी तयार केल्याचे वृत्त आहे. ते आखाती देशांच्याही संपर्कात होते.

पाकिस्तानमध्ये वाटाघाटी होणार म्हणून भारतातील पाकिस्तानचे दलाल प्रचंड खूष आहेत. युद्धाच्या काळात भारत आणि पाकिस्तानच्या परिस्थितीत काय फरक होता पाहा. भारतात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर राहिले. गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू होता, याचे श्रेय नरेंद्र मोदींना देणे टाळणारे करंटे शाहबाज शरीफ यांच्या मिशा पिळायला तयार आहेत. पाकिस्तानमध्ये पेट्रोल डिझेलचे दर भडकल्यामुळे तिथली जनता त्रस्त असली तरी भारतात मात्र अनेकांचे प्रेम शाहबाज यांच्यावर ऊतू जाते आहे. शाहबाज यांनी जे केले ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करायला हवे होते, अशा प्रतिक्रिया पुन्हा सुरू झालेल्या आहे. खरे तर भारत हा पाकिस्तानसारखा दलाल देश नाही, हे परराष्ट्र मंत्री डॉ.एस.जयशंकर यांनी स्पष्ट केलेले आहे. युद्धाच्या काळात देशाच्या जनतेला वाऱ्यावर सोडून इराण-अमेरिकेच्या दरम्यान दलाली करण्याचे धंदे भारताने केले नाहीत. घरगुती पुरवठा सुरळीत राहील याचा विचार केला. देशात जनता उपाशी आणि शाहबाज जागतिक खटल्याच्या उठाठेवी करतायत घरी उंदीर उपाशी मरतायत आणि शाहबाज अमेरिकेसाठी मुत्सद्देगिरीची चमक दाखवतायत, असे चित्र पाहायला मिळाले.

ट्रम्प यांच्या टाईम प्लीजनंतर जगाला पुन्हा दोन आठवड्याची उसंत मिळालेली आहे. युद्धबंदी नंतर इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांनी आपापल्या विजयाचे दावे केलेले आहेत. ही युद्धबंदी तात्पुरती ठरण्याची शक्यता आहे. याकाळात पुन्हा मोर्चेबांधणी करून इराणवर अधिक जीवघेणा हल्ला करण्याची योजनाही कदाचित अमेरिकेकडून बनवली जाणार असल्याची शक्यता आहे. तोपर्यंत होर्मुजची मालकी इराणला सोपवली जाण्याची शक्यता आहे. ‘युद्धाच्या काळात ट्रम्प यांनी अमेरिकेचे जे नुकसान केले ते होर्मुजमध्ये टोल वसुली करून जगाकडून वसूल करा’,  असा बहुधा ट्रम्प यांचा विचार दिसतो. या दोन आठवड्यांच्या संधीकालात मोदी सरकार या कालावधीचा वापर देशातील तेल आणि गॅसचे साठे अधिक मजबूत करेल. जनतेच्या भविष्याची तरतूद करेल. परंतु जनतेचे भले करणे महत्त्वाचे नाही, ढुंगणावर पॅण्ट फाटली असताना दलालीचे धंदे करणे जास्त महत्त्वाचे.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
302,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा