29 C
Mumbai
Monday, April 13, 2026
घरसंपादकीयहा फरक आहे, फडणवीस आणि पवारांमध्ये !

हा फरक आहे, फडणवीस आणि पवारांमध्ये !

Google News Follow

Related

दिल्लीत महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या सौदामिनी स्मरणिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. त्या स्मरणिकेत महिलांचे सक्षमीकरण हेच माझं स्वप्न अशा आशयाचा लेख शरद पवार यांनी लिहिला आहे. याच लेखात शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने भाष्य केले आहे. त्यांनी या लेखात महिलांची प्रबोधनातील टक्केवारी कमी असल्याबाबत चिंता व्यक्त केली. याच लेखात शरद पवार म्हणतात की, वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाली आहे. ६० टक्के लोकांची मांडणी ही धर्मांध शक्तींना बळ देणारी आहे. आता आम्ही अशा धर्मांध लोकांची, प्रतिगामी लोकांची यादी तयार करायला सुरुवात केल्याचेही शरद पवार म्हणतात. शरद पवार यांच्या या विधानानंतर स्वाभाविकच महाराष्ट्रात प्रतिक्रिया उमटल्या. त्याला काँग्रेसचीही साथ मिळाली. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शरद पवारांच्या या विचारांचे समर्थन केले. सावंत यांनी पवार यांच्या भूमिकेला समर्थन देत सांगितले की वारकरी संप्रदायाने ऐतिहासिकदृष्ट्या सामाजिक सुधारणा आणि जनजागृतीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, काही शक्ती समाजात जाणीवपूर्वक फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुळात शरद पवार हे स्वतःला निधर्मी मानतात. हे स्वतः त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेतील एका भाषणादरम्यानच सांगितले होते. आपले वडील हे नास्तिक असून आपली आई मात्र देवधर्म पाळते. त्यांचे विचार स्वतंत्र आहेत. पवारांच्या धार्मिक श्रद्धांबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांवर सावंत म्हणतात की, हिंदू धर्मात नास्तिकतेलाही मान्यता आहे. त्यांनी सावरकरांचे उदाहरण देत सांगितले की, तेही नास्तिक होते. ते पुढे म्हणाले की ते पवार यांच्या विचारांशी पूर्णपणे सहमत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित विभाजनकारी विचारधारा पसरवणारे काही तथाकथित धर्मगुरू, स्वघोषित आध्यात्मिक नेते आणि कथावाचक वारकरी संप्रदायात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
यावर नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपले मत व्यक्त केले. फडणवीस म्हणाले की, शरद पवार स्वतःला निधर्मी मानतात, पण वारकरी संप्रदायाबाबत त्यांच्याकडे योग्य माहिती नसावी. वारकरी संप्रदाय हा गेल्या ८०० -९०० वर्षांपासून श्रद्धा आणि बंधुत्वाचा विचार मांडत आला आहे. भागवत धर्माची पताका हाती घेऊन या संप्रदायाने नेहमीच समतेचा विचार जपला आहे, अशा शब्दांत त्यांनी पवारांच्या भूमिकेचा निषेध केला.

मुख्यमंत्र्यानी दावा केला की, वारकरी संप्रदायात काही लोक शिरून वेगळा आणि विघातक विचार मांडत होते, त्यांना संप्रदायाने आधीच बाहेर काढले आहे. वारकरी विचारांच्या विरोधात जाणाऱ्यांची यादी माझ्याकडेही आहे. संप्रदायात घुसखोरी करू पाहणाऱ्या काही लोकांचा संबंध थेट अर्बन नक्षल चळवळीशी आहे, असेही फडणवीस म्हणाले.
ते शरद पवारांबद्दल म्हणाले की, साहित्य संमेलनात प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असतो. शरद पवार यांचे राजकीय क्षेत्रातील मोठे योगदान पाहता त्यांचा लेख स्मरणिकेत घेतला असावा. मात्र, त्यांनी केलेली मांडणी वारकरी संप्रदायाची प्रतिमा मलीन करणारी आहे.

या सगळ्या घडलेल्या घटनाक्रमातून काही प्रश्न उपस्थित होतात. एक म्हणजे. शरद पवार हे जर स्वतःला निधर्मी किंवा नास्तिक मानतात तर मग ते संतांच्या विचारांवर, संतांनी आखून दिलेल्या मार्गावर श्रद्धा कसे काय बाळगत आहेत? ते श्रद्धा बाळगत असतील तर मग ते निधर्मी कसे? वारकरी संप्रदायात ६० टक्के लोक धर्मांध विचारांची मांडणी करणारे आहेत असा सरसकट आरोप शरद पवार कोणत्या जोरावर करत आहेत. मग ४० टक्के लोक हे शरद पवारांच्या विचारांचे आहेत असा त्याचा अर्थ काढता येऊ शकतो का? वारकरी संप्रदायात कोणती मंडळी घुसलेली आहेत आणि कोणती नाहीत याचा अभ्यास कुणी केलेला आहे, कुणाकडे असा सखोल अभ्यास केल्याचे काही पुरावे आहेत की आपल्या सोयीप्रमाणे वारकरी संप्रदायाचे मूल्यमापन करण्याचा खोडसाळपणा केला जात आहे, या गोष्टी समोर यायला हव्यात.

काँग्रेसचे सचिन सावंत तर सावरकरांचेच उदाहरण देतात की, ते नास्तिक होते आणि हिंदू धर्मांत नास्तिकतेला स्थान आहे. मग सचिन सावंत यांचे हिंदू धर्माबद्दल एवढे उदार मत असेल तर मग त्याविषयी एवढा तिटकारा असण्याचे कारण काय? शिवाय, काँग्रेसने सावरकरांच्या विचारांचा दाखला द्यावा हे हसून हसून मुरकुंडी वळवणारे आहे. त्यांचे नेते राहुल गांधी दिवसरात्र सावरकरांची बदनामी करतात आणि त्याच काँग्रेसचे प्रवक्ते मात्र सावरकरांची उदाहरणे देऊन विचार मांडतात, हा विरोधाभास नाही का?

आता वळूया वारकरी संप्रदायाकडे. वारकरी संप्रदाय हा काही हिंदू धर्मापासून वेगळा नाही. हिंदू धर्माच्याच प्रवाहातील एक भाग आहे, हे शरद पवार किंवा तत्सम ब्रिगेडी विचारधारेला मान्य नसले तरी वास्तव बदलता येणार नाही. स्वतः सुप्रिया सुळे या निवडणुकीदरम्यान रामकृष्ण हरीचा जप करीत होत्या. ते राम आणि कृष्ण हिंदू धर्मियांची दैवते आहेत आणि वारकऱ्यांचीही, याचा विसर पडू देता कामा नये. संतांनी समाजातील, धर्मातील चुकीच्या प्रथा, परंपरा, होणारा अन्याय यावर कोरडे ओढले आहेत, पण धर्म सोडलेला नाही, देव सोडलेला नाही. संतांनी जे सांगितले त्याचे पालन आज समाजातील सर्व घटकातील लोक करत आहेत, किंवा तसा प्रयत्न करत आहेत. पण सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली वारकरी संप्रदायाला सेक्युलर करण्याचा जो प्रयत्न गेल्या काही वर्षात शरद पवारांनी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनांनी, तथाकथित पत्रकारांनी, वारकरी म्हणवणाऱ्या काही लोकांनी केला ते लपलेले नाही. ते काम अजूनही सुरू आहे, हेच पवारांच्या या लेखाचे सार आहे.

मुळात वारकरी समाजात धर्मांध शक्तींकडून कशी फूट पाडली जात आहे, असे जे सांगितले जाते ते निखालस खोटे आहे. किंबहुना, शरद पवारांच्या विचारांवर चालणारी अनेक मंडळी वारकऱ्यांच्या वेशात हे फूट पाडण्याचे उद्योग करत आहेत. ते संविधानाचा प्रचार करण्याच्या नावाखाली संतपरंपरा, श्रद्धा, भावना यांना दूर लोटण्याचे काम करत आहेत. वारकरी संप्रदायात, पांडुरंगाचा जयघोष करण्याऐवजी संविधानाचा घोष करा अशी मांडणी ही काही मंडळी करू पाहात आहेत. संविधान हे आपल्या जागी श्रेष्ठच आहे, पण संतपरंपरेत त्याची सरमिसळ करण्याचे हे उद्योग आहेत. पांडुरंगाला सोडा, संविधानाची कास धरा हे वारकरी संप्रदायाच्या डोक्यात भिनविण्याची ही त्यामागील लबाडी आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायासमोर या निधर्मी मंडळींचेच मोठे आव्हान आहे. मध्यंतरी नास्तिकांचा मेळा एकेठिकाणी भरला होता, त्यांनी जगद्गुरू संत तुकाराम, ज्ञानोबा माऊली यांच्यावर गरळ ओकली होती. असे निधर्मी लोक श्रद्धेचे महत्त्व काय सांगणार. ज्यांची कशावरही श्रद्धा नाही ते संविधानावर कशी काय श्रद्धा ठेवू शकतात, हा प्रश्न आहे.

हे ही वाचा:

टीसीएसची फ्रेशर्स भरतीत कपात, २५,००० ऑफर्सवरच ब्रेक

बांग्लादेश घेणार भारतातून रिफाइन होणार रशियन क्रूड ऑईल

SIR योजनेमुळे मतदारयादीतून काढली ५ कोटी नावे

युद्धाचा धोका वाढला तरी भारत ‘सुरक्षित’!

महात्मा फुले यांची जयंती नुकतीच झाली. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले यांच्या विचारांवर भाषण केले. जे रोज शाहू फुले आंबेडकर नावावरून राजकारण करतात, ते मात्र फुलेंचे विचार लोकांपर्यंत पोहोचवत नाहीत तर त्यातही ब्राह्मण, वेदपुराण यावर शरसंधान करण्याची संधी साधतात. त्यांचा उद्देश फुलेंचे विचार पोहोचवणे नसतो तर हिंदू धर्मावर प्रहार करण्याचा त्यांचा हेतू असतो. महिलांच्या सक्षमीकरणावर लिहिता लिहिता अचानक शरद पवारांनी वारकरी संप्रदायातल्या तथाकथित धर्मांधतेवर कसे काय लिहिले हा त्यामुळेच प्रश्न आहे.
फडणवीसांनी महात्मा फुलेंवर जे भाषण केले त्यात कुठेही कुणाचा द्वेष नव्हता की, विरोधी मते नव्हती. जे स्वतःला आम्ही शिव, शाहू, फुले आंबेडकरांचे विचार मानणारे मानतात ते मात्र ब्राह्मणांना शिव्याशाप देणे, इतिहासात आपल्या सोयीप्रमाणे बदल करणे आणि हिंदू धर्मावर टीका करण्यासाठी या विचारांची ढाल पुढे करतात. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात हा मूलभूत फरक आहे. फडणवीस हे हिंदुत्ववादी पक्षाचे नेते असले तरी त्यांचे राजकारण हे सर्वसमावेशक राहिलेले आहे. त्यात कुठेही आपण ब्राह्मण आहोत किंवा आपण त्यांचे नेते आहोत असा पुसटसाही उल्लेख येत नाही, तो संकेतार्थाने दर्शविण्याचाही प्रयत्न होत नाही. त्यामुळे ते शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही विचार उत्स्फूर्तपणे मांडू शकतात. जे विचार आपल्याला घ्यायचे आहेत, ते घ्यायचे, ते लोकांपुढे मांडायचे ही भूमिका महत्त्वाची असते. पण आपले विचार न मांडता दुसऱ्यांच्या विचारात डोकावत बसायचे, वाद निर्माण करायचे ही भूमिका समाजविरोधी असते. आपल्या डोळ्यातील मुसळ न पाहता दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ पाहायचे ही म्हण त्याला लागू पडते.

पाडुंरग, भाळी टिळा, मुखात ग्यानबा-तुकारामाचा मंत्रघोष, गळ्यात तुळशीची माळ आणि साधी राहणी हा वारकऱ्यांचा नित्यनेम आहे. आषाढी, कार्तिकीला लाडक्या विठ्ठलाला डोळे भरून न्याहाळण्याच्या सुखासाठी वारकरी कित्येक किलोमीटरची पायवारी करत पंढरपूरला येतो. हे साधेसोपे आयुष्य अनुभवण्यापेक्षा त्यात नाक खुपसण्याचा उद्योग राजकारण्यांनी करण्याची आवश्यकता नाही. वारकरी संप्रदायातील मंडळी बुद्धिवान आहेत, समजदार आहेत, संतवाड्मयातून त्यांची जडणघडण झालेली आहे. ते वारकरी संप्रदायावरील संकट असेलच तर ओळखू शकतील. त्यासाठी कुणी तथाकथित घुसखोरी केलेल्यांच्या याद्या गोळा करत बसण्याची गरज नाही.
आजच्या काळात आपल्याला सर्वसमावेशक राजकारण करणाऱ्यांची गरज आहे. खरे तर, अशा लोकांच्या याद्या आपण तयार करायला घ्यायला हव्यात.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा