दिल्लीत जे काही घडवण्याचा प्रयत्न होता ते काही दहशतवाद्यांना घडवता आले नाही. त्यांना १९९३ चे मुंबईत झालेले साखळी बॉम्बस्फोट आणि २००८ च्या मुंबई हल्ल्याची पुनरावृत्ती करायची होती. सुरक्षा यंत्रणांच्या सजगतेमुळे दहशतवादाचे जम्मू काश्मीर मॉड्युल उद्ध्वस्त झाले. सुरूवातीपासून आता चाललेल्या तपासापर्यंत याचा संबंध जैश ए मोहम्मदशी आहे हे उघड झाले आहे. तपासाची सुरूवातही जैशच्या पोस्टरपासूनच झाली होती. ऑपरेशन सिंदूरमध्ये अख्खे खानदान ठार झाल्यानंतर जैशचा म्होरक्या मसूद अजहर म्हणाला होता की, सुभानल्ला मशीदीचे मीनार भारतीयांवर असे काही कोसळतील की त्यांच्या भावी पिढ्याही विसरू शकणार नाहीत. मसूदचे मनातले मांडे मनातच राहिले.
ऑपरेशन सिंदूरचा जबरदस्त दणका जैश ए मोहम्मदला बसला. लष्कर ए तोयबा आणि हिजबुल मुजाहीदीनसह त्यांचे बरेच तळ उद्ध्वस्त झाले. पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानात हे हल्ले झाले. बहावलपूर, मुद्रीके, सियालकोट, बर्नाला, कोटली, मुजफ्फराबादमधील तळांचा यात समावेश होता. बहावलपूरमध्ये मरकज सुभानअल्ला या जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात त्याची बहीण आणि भाच्याचे कुटुंबीय मिळून दहा लोक ठार झाले होते. त्यानंतर त्याने फुत्कार टाकले होते की, मरकज सुभानल्लाचे मीनार भारतीयांवर कोसळतील. त्यांच्या भावी पिढ्याही विसरू शकणार नाहीत. ७ मे रोजी हा मसूदचे खानदान अल्लाकडे रवाना झाले. त्याच दिवशी त्याने हे शब्द उच्चारलेले होते. ते खरे करून दाखवण्यासाठी मसूद तडफडत होता. त्याचसाठी भारतात मोठा रक्तपात घडवण्याचा कट रचला जात होता. मसूदच्या दुर्दैवाने याची पोलखोलही जैशच्या श्रीनगर आणि नौगावमध्ये लागलेल्या पोस्टरमुळे झाली. पोस्टर लावणाऱ्यांची काश्मीरमध्ये झालेली धरपकड हा तपास फरीदाबादेतील अल फलाह युनिवर्सिटीत कट रचणाऱ्या डॉ. मुजम्मीलपर्यंत गेला.
या प्रकरणात सातत्याने नवे गौप्यस्फोट होत आहेत.
डॉ. मुजम्मील आणि डॉ. उमरने तुर्कीयेमध्ये जैश ए मोहम्महच्या टॉप कमांडरची भेट घेतली होती. हा कमांडर मसूद अजहर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाकिस्तानवर बालंट येऊ नये, म्हणून कटाची बोलणी इस्लामाबाद किंवा रावळपिंडीत न करता पाकिस्तानचा कडवा समर्थक असलेल्या तुर्कीमध्ये झाली. तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष तय्यीप एर्दोगान यांना इस्लामी जगाचे नेतृत्व करण्याचे डोहाळे लागले आहेत. जे कधी काळी सौदी अरेबियाला लागले होते. ज्यांना ज्यांना असे डोहाळे लागतात, पाकिस्तानचे राज्यकर्ते त्यांच्या या महत्वाकांक्षांना हवा द्यायला तिथे पोहोचतात आणि आपले इप्सित साध्य करून घेतात.
देशात जेव्हा केव्हा दहशतवादी घटना घडते तेव्हा तेव्हा स्लीपर सेल, सिमी, पीएफआयशी संबंधित असलेले आणि कट्टरतावादी विचारांचे तमाम लोक सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर येतात. देशभरात छापेमारी आणि कोंबिंग ऑपरेशन सुरू होते. महाराष्ट्रातही ते सुरू झालेले आहे. पुण्यातील कोंढवा, मुंब्रा ही महाराष्ट्रातील कट्टरवाद्यांची आश्रय स्थाने आहेत. महाराष्ट्र एटीएसच्या टीमने काल इथे मोठ्या प्रमाणात छापेमारी केली.
२७ ऑक्टोबरला जुबेर हंगरेकर नावाच्या एका तरुणाला पुणे येथे अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे अल कायदाशी संबंधित काही साहित्य सापडले होते. त्याच्याशी संबंधित एका प्रोफेसरच्या घरावर मुंब्र्यात कौसा येथे छापा मारण्यात आला. हा इसम एका इंजिनिअरिंग कॉलेजचा माजी प्राध्यापक आहे. सुरक्षा यंत्रणांना सहकार्य करायचे सोडून त्याच्या पत्नीने याबाबत मीडियाकडे खूप हंगामा केला. म्हणे त्यांच्या प्रतिष्ठेवर या कारवाईमुळे कलंक लागला. ज्यांना देशद्रोह्यांच्यासोबत असलेल्या संबंधांबाबत लाज वाटत नाही. परंतु, पोलिस चौकशी करायला आले की जे अपमानीत झाल्याच्या बाता करून तमाशे करतात, पोलिसांच्या विरोधात कोर्टात जाण्याच्या धमक्या देतात, अशा लोकांना कठोरपणे वठणीवर आणले पाहिजे. हेच लोक दहशतवाद्यांच्या कारवाया झाकण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांचे आणि दहशतवाद्यांचे इरादे फार वेगळे असतात, या भ्रमातून समाजानेही बाहेर आले पाहिजे.
मीडिया या दहशतवाद्यांच्या पाठीराख्यांच्या नावाने खूपच चुकचुकत असतो. दिल्ली कार स्फोटात ठार झालेला दहशतवादी डॉ. उमर आणि डॉ. मुज्जमीलच्या नातेवाईकांना भेटल्यावर मीडियाने अशाच प्रकारचे उसासे टाकले होते. ज्यांच्या घरात असे कुलकलंक जन्माला आले त्या घरांना खरे तर वाळीत टाकले पाहीजे. आपल्याकडे त्यांना लाईम लाईटमध्ये आणून त्यांना सहानुभूती मिळेल अशी व्यवस्था मीडियावाले करत असतात. जणू ते दहशतवाद्यांच्या कुटुंबियांची नाही, ऑलिंपिकचे मेडल पटकावलेल्या एखाद्या खेळाडूच्या कुटुंबियांची बाजू मांडतायत. दहशतवाद्यांच्या पालकांच्या, नातेवाईकांच्या प्रतिक्रीयाही अगदी सारख्या असतात. मिस इंडीया किंवा मिस युनिवर्स झाल्यानंतर विजेत्या तरुणींच्या चेहऱ्यावर अचानक धक्का बसल्याचे, आनंदाने रडवेले झाल्याचे भाव जसे अगदी सारखे असतात. तशाच या प्रतिक्रीयाही अगदी सारख्या असतात. या लोकांना आपल्या घरात जन्माला आलेला दिवटा काय दिवे लावतोय, याची माहिती नाही असा समज करून घेणे म्हणजे भाबडेपणा आहे. मुलाची लक्षणे आई-बाप त्याच्या नजरेच्या कटाक्षावरून ओळखतात. ‘आम्हाला धक्का बसला आहे, तो असे करेल असे वाटले नव्हते. आपला मुलगा शेण खातो आहे, देशाच्या विरोधात कारवाया करतो आहे, हजारो लोकांना ठार कऱण्याचा कट रचतोय हे पालकांना, एकाही नातेवाईकाला माहित नसेल यावर विश्वास ठेवणे कठीण. एकही पालक म्हणत नाही, त्याने देशाच्या विरोधात कट रचला आहे, त्याला फासावर लटकवा. प्रत्येक जण सांगण्याचा प्रयत्न करत असतो, तो कसा साधा सरळ होता, त्याला क्रिकेट किती आवडत होते. त्याला हिंदी गाण्याची कशी आवड होती, वगैरे वगैरे. खाण तशी माती. दोघांमध्ये फारसा फरक नसतो.
हेही वाचा..
अल- फलाह विद्यापीठ ईडीच्या रडारवर; आर्थिक व्यवहारांची होणार चौकशी
माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या मुलाची किती मालमत्ता ईडीने केली जप्त?
छत्तीसगडमध्ये चकमकीत सहा माओवादी ठार
फिलिपिन्समध्ये क्षयरोगाविरोधात मोहीम
दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा जेव्हा कामाला लागतात तेव्हा दहशतवाद्यांच्या इको सिस्टीममध्ये पुढच्या पातळीवर काम करणारे लोक सक्रीय होतात. काश्मीरमध्ये आतापर्यंत दीड हजारावर संशयितांना अटक झाली आहे. काश्मीरी दहशतवाद्यांनी हे जगाला ओरडून सांगितले आहे. काश्मीरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कितीही विकास केला. कितीही पैसा ओतला, लोकांचे कितीही भले केले तरी आम्हाला देशात रक्तपातच करायचा आहे. हिंदूंचे रक्त सांडायचे आहे. सुरक्षा यंत्रणांनी मोठ्या प्रमाणात अटकसत्र सुरू केल्यानंतर आता नागरिकांवर कसे अत्याचार होतायत, याच्या कहाण्यांची चर्चा सुरू होईल. सोशल मीडियावर आधीच एक गट दिल्लीतील बॉम्बस्फोटांचा बिहार निवडणुकांशी संबंध जोडून मोकळा झाला आहे. तो सुद्धा याच इको सिस्टीमचा एक भाग.
त्यामुळे दिल्लीतील कार स्फोटानंतर आता देशातील गद्दारांना हुडकण्याची मोहीम सुरू झालेली आहे. म्हणजे आपले सेनाधिकारी सतत ज्या २.५ फ्रंट वॉरबाबत बोलत असतात. त्यातल्या देशातील .५ फ्रंट वॉरची भारताने सुरुवात केलेली आहे. यात सिमी, पीएफआय, इस्लामिक स्टेट्सच्या पिलावळीवर वरवंटा फिरवताना कोर्टात त्यांच्यासाठी खटले लढणारे प्रशांत किशोर, कपिल सिब्बल यांच्यासारखे वकील, व्होटबँकचे राजकारण करणारे नेते, सोशल मीडियावर सुरक्षा दलांच्या विरोधात गरळ ओकणारे, पाकिस्तानची बाजू घेणारे, दहशतवाद्यांच्या नातेवाईकांबाबत अश्रू ढाळणारे प्रचारकर्ते, देशाच्या विरोधात नरेटीव्ह चालवणारे पत्रकार, मीडिया हाऊस यांच्या विरोधात हा वरवंटा चालला पाहिजे. या देशाला आता सुरक्षा दलाच्या कारवाईनिमित्त शिवशंकराचे तांडव पाहायचे आहे. देश वाचवण्यासाठी हे तांडव आवश्यक आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







