जगन्नाथाचा कौल काय?

जगन्नाथाचा कौल काय?

आम्ही त्यांचा शोध घेऊ, त्यांचा माग काढू, त्यांना संपवू असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या भूमीवरून दिला होता, त्याला येत्या २४ एप्रिल रोजी वर्ष पूर्ण होईल. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर मधुबनी येथे झालेल्या जाहीर सभेत मोदींनी दहशतवादी, त्यांचे समर्थक आणि त्यांच्या म्होरक्यांना हा इशारा दिला होता. धुरंधरच्या निमित्ताने पाकिस्तानात पुन्हा एकदा या इशाऱ्याबाबत चर्चा होते आहे. त्यात आणखी एक ठिणगी टाकली, भारताचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्वीवेदी यांनी. शनिवारी पुरी येथील जगन्नाथ मंदीरात दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना द्वीवेदी जे काही सांगितले, ते  पाकिस्तानची कढी पातळ झाली असणार हे निश्चित.

गेल्या वर्षी ऑपरेशन सिंदुर आटोपल्यानंतर जून महिन्यात जनरल उपेंद्र द्वीवेदी केदारनाथ येथे दर्शनला गेले होते. तिथे त्यांनी सपत्निक पूजा केली. दोन दिवसांपूर्वी शनिवारी त्यांनी पुरी येथे भगवान जगन्नाथाचे दर्शन घेतले. ‘आपण जगन्नाथाच्या दर्शनाला आलो होतो. जवान आणि त्यांच्या कुटुंबियांचे कल्याण व्हावे अशी आपण इथे प्रार्थना केली. भगवान जगन्नाथाच्या आशीर्वादाने येत्या काळात आपले लष्कर येत्या काळात अधिक चांगली कामगिरी करेल’, अशा भावना द्विवेदी यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या.

लष्कर प्रमुख जे काही बोलले ते सूचक आहे. केदारनाथ दर्शनानंतर ते असे काही बोलले नव्हते. कारण बहुधा तेव्हा एक परीक्षा संपली होती. जगन्नाथ दर्शनानंतर त्यांचे सूर थोडे वेगळे वाटत आहेत. जणू नव्या अग्नि परीक्षेची तयारी करीत असल्यासारखे. जवानांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी त्यांनी केलेली प्रार्थना, लष्कर यापुढे अधिक चांगली कामगिरी करेल असा आशावाद काही वेगळेच संकेत देणारा आहे. परीक्षेच्या आधी एखाद्याने परमेश्वराचे आशीर्वाद घ्यावेत, कौल मागावा तसा काहीसा हा प्रकार दिसतो आहे.

ऑपरेशन सिंदुरनंतर वेस्टर्न कमांडचे ले. जन. मनोज कुमार कटीयार यांनी जे काही सांगितले होते, त्याची इथे आठवण झाल्याशिवाय राहात नाही. ‘पुढे जर काही कुरापती काढण्याच्या प्रय़त्न झाला तर आम्ही मोठा दणका देऊ, आम्ही काय करू किती करू हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल, परंतु आमचे उत्तर यावेळी केलेल्या कारवाईच्या तुलनेत अधिक उग्र असेल. कदाचित पाकिस्तानला जमीनीचा एखादा तुकडा गमवावा लागले.’

इथे एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे. भारतीय सेनादल अत्यंत व्यावसायिक असून आपले सेनाधिकारी शब्द तोलून मापून वापरण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे जनरल द्वीवेदी काय बोलतात, ले. जन. कटीयार काय बोलले, ते केवळ बुडबुडे नाहीत, त्या प्रत्येक शब्दात अर्थ दडलेला आहे. यावेळी कदाचित पाकिस्तानकडून पुलवामा, पठाणकोट किंवा पहेलगाम घडवण्याच्या आधीच भारत अशा प्रकारची कारवाई करू शकतो. प्रत्येक वेळा त्यांनी आगळीक केल्यावर आपण उत्तर दिले पाहीजे, असे काही नाही.

पाकिस्तानवर अमेरिकेने हल्ला केला, आमच्या अण्वस्त्रांचा ताबा घेण्याचा प्रय़त्न केला तर आम्ही दिल्ली आणि मुंबई बेचिराख करू असा इशारा पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी दिला आहे. त्याचे विचित्र कारण त्यांनी दिले आहे. आमची क्षेपणास्त्रे अमेरिकेपर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्यामुळे आमच्याकडे मुंबई आणि दिल्लीला लक्ष्य करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही, याबाबत आम्ही दुसऱ्यांचा विचारही करणार नाही. बासित जे म्हणाले त्याचा अर्थ स्पष्ट आहे. अमेरिका किंवा इस्त्रायल हल्ला करेल अशी भीती पाकिस्तानच्या मनात आहे. हा हल्ला रोखण्याची त्यांची क्षमता नाही, त्यामुळे जाता जाता भारताला संपवण्याची महत्वाकांक्षा तर पुरी करू अशी त्यांची भूमिका आहे. अमेरिका असे करण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गबार्ड यांनी पाकिस्तान विकसित करीत असलेल्या आंतर खंडीय क्षेपणास्त्रांचा अमेरिकेला धोका आहे, अशी कबुली दिली आहे. अमेरिकेला धोका असलेल्या पाच देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

ही चर्चा फक्त पाकिस्तानच्या आजी माजी मुत्सद्द्यांमध्ये नाही. पाकिस्तानी पत्रकारही अशाच प्रकारची चर्चा करतायत. आरजू काझमी यांच्या यूट्यूब चॅनलवरील चर्चेत सहभागी झालेले पत्रकार कमर चिमा यांनी धुरंधर सिनेमाबाबत बोलताना नरेंद्र मोदी यांच्या मधुबनी येथील सभेत केलेल्या घोषणेबाबत चर्चा केली होती. ज्यांनी पहेलगाम घडवले आणि त्यांना शोधून काढू, त्यांचा माग काढू आणि त्यांना संपवू. मोदींनी ज्यांना संपवण्याची घोषणा केली, त्यात फक्त दहशतवादी नाहीत, दहशतवादाची षडयंत्र रचणारेही आहेत. मोदींचा इशारा त्यावेळी पाकिस्तानच्या लष्कराकडेही होता.

आता प्रश्न हा निर्माण होती की, इराण युद्धामुळे जग आधीच संकटात असताना भारतासह अनेक देशांमध्ये इंधन आणीबाणी निर्माण झाली असताना, पुरवठा साखळीची सुरक्षा धोक्यात आली असताना मोदी अशा प्रकारचे पाऊल उचलतील का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. चौकटीतला विचार केल्यास या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. पश्चिम आशियातील घडामोडी सुरू झाल्यानंतर भारताची परकीय चलनाची गंगाजळी. ७२० अब्ज डॉलरवरून ६८८ अब्ज डॉलरवर आलेली आहे. सुमारे ३० अब्ज डॉलर्सची घट झालेली आहे. येत्या काळात तेल आणि गॅसचे दर चढे राहणार त्यामुळे तिजोरीला लागलेली गळती वाढण्याची शक्यता आहे. परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर पाकिस्तानवर हल्ला करण्याची हीच ती वेळ आहे. पाकिस्तानचा कळवळा असलेले आखाती देश युद्धात गुंतले आहेत. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू आहे. पाकिस्तानची आर्थिक परीस्थिती डळमळते आहे. अमेरिका इराणमध्ये गुंतला असल्यामुळे ट्रम्प स्वत:चे धोरत सावरण्याच्या गडबडीत आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानला ठेचायला फार ताकद लागणार नाही. पाकिस्तानच्या मदतीला कोणी येण्याची शक्यताही नाही.

हे ही वाचा:

बांगलादेशमध्ये अवामी लीगच्या नेत्यावर गोळीबार

हल्ल्यात जखमी झालेल्या इराणचे नेव्ही कमांडर तंगसीरी यांचा मृत्यू

दोन आमदारांची हत्या करणारा नक्षलवादी सुरेश शरण

श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती; प्रेयसीचे अवयव ठेवले फ्रिजमध्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने देशाच्या जनतेला आव्हान करतायत. एकजूट दाखवा, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे वारंवार आव्हान करतायत. देशभरातील सर्व पक्षीय मुख्यमंत्र्यांची त्यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. इंधन पुरवठा आणि अंतर्गत सुरक्षेबाबत चर्चा केली. जनरल द्वीवेदीं, ले.जन. कटीयार, अब्दुल बासित, तुलसी गबार्ड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वक्तव्य स्वतंत्रपणे पाहीली तर कदाचित त्यातून काही अर्थबोध होण्याची शक्यता नाही. परंतु या सगळ्या कड्या एकत्र जोडल्या तर त्यातून निर्माण होणारे चित्र काही वेगळेच सांगते आहे.

अब्दुल बासित हे भारतात पाकिस्तानचे उच्चायुक्त राहीले होते. सर्वसाधारणपणे दूतावासात, उच्चायुक्तालयात काम करणारे अधिकारी हे त्या त्या देशाच्या गुप्तचर एजन्सीशी संबंधित असतात. पाकिस्तानचे अनेक पत्रकार आयएसआय़शी जोडलेले आहेत, ते थेट त्यांच्यासाठी काम करतात. ते सांगतील ते काम करतात. कमर चिमा जे काही म्हणतायत, त्यात बोल त्याचें असले तरी ती स्क्रीप्ट दुसऱ्याची असण्याची शक्यता नाही.

पाकिस्तानमध्ये काही तरी निश्चित शिजते आहे. ते काय शिजते आहे, याची झलक पाकिस्तानचे पडेल फिल्डमार्शल आसीम मुनीर यांनी अमेरिकेच्या भूमीतून केलेल्या वक्तव्यातून जगाला मिळाली. मुनीर त्यानंतर फार दिसले नाहीत किंवा फार बोलले नाहीत. बहुधा ते नव्या पहेलगामची तयारी करण्यात गुंतले आहेत. भारताच्या कानावर ही तयारी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत तयारी बसला आहे. द्वीवेदींचे देवदर्शन, त्याचाच एक भाग असावा. भारतीय लष्कर जगन्नाथाच्या कृपेने यावेळी अधिक चांगली कामगिरी करेल असे ते म्हणाले आहेत. ती कामगिरी कधी होते आहे, याचा मुहुर्त मोदी, अमित शहा, यांच्या शिवाय कोणालाच ठाऊक नसावा. अधिकाऱ्यांना कदाचित कुणकुण असावी. भारतीय जनता त्या क्षणाची वाट पाहते आहे.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version