गेल्या काही वर्षांत जगभरात मोठी भूराजकीय उलथापालथ सुरू आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिका भारताच्या वाकड्यात शिरल्याचे चित्र आपण पाहातो आहोत. युरोपातील काही देश खलिस्तानी देशबुडव्यांना पदराखाली घेत आहेत. अमेरिका-युरोपातील काही राजकीय नेते तर भारताबाबत कायम असूयेने बोलत असतात. जगातील देशांना भारताची इतकी धास्ती का वाटते? हे भय नेमके कसले आहे? केंद्रीय मंत्री अश्विनी यांना ज्यांनी दोन दिवसांपूर्वी ऐकले त्यांना या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. ते जे काही बोलले ते जागतिक महासत्तांसाठी भूकंपापेक्षा कमी नाही. त्यांनी जे सांगितले त्याचा अर्थ येत्या दहा वर्षात भारत सिलिकॉन वेफर्स क्षेत्राचा भारत दादा बनतो आहे.
विविध क्षेत्रात भारताची सुरू असलेली आगेकूच विदेशातील लोकांना खूपते हे आपण समजू शकतो, राहुल गांधी यांच्यासारखे नेतेही यात मागे नाहीत. भारतात आयफोन बनतात, भारत आयफोन आणि मोबाईल फोनची निर्यात करतो, हा केंद्र सरकारचा दावा वारंवार ऐकून बहुधा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे डोके ठणकले असावे. कारण त्यांनी काही दिवसांपूर्वी एक्सवर एक पोस्ट अपलोड केली होती. ‘देशात टीव्ही आणि आयफोनचे पार्ट बाहेरून येतात. देशाला मॅन्यूफॅक्चरींग पावर बनवण्यासाठी, चीनला थेट टक्कर देण्यासाठी तळागाळापर्यंत मोठे बदल करण्याची गरज आहे’, असे सांगून राहुल गांधी यांनी आपण निर्मिती करत नाही फक्त जोडकाम करतो हे सांगण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात केंद्र सरकारच्या दाव्यातील हवा काढण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या मनात गोंधळ निर्माण करण्यासाठी राहुल गांधी हे बोलत असतात ही बाब मान्य केली तरी तंत्रज्ञान क्षेत्रात भारत नेमका कुठे आहे ? राहुल बाबा म्हणतात ते कितपत खरे आहे, याचे उत्तर सर्वसामान्य माणसाला ठाऊक असण्याचे काही कारणच नाही.
वैष्णव यांनी दोन दिवसांपूर्वी हे उत्तर दिले आहे. देशात सेमी कंडक्टरचे चार नवे कारखाने सुरू करणार असल्याची घोषणा दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. आधी सहा कारखान्यांचे काम सुरू आहे. या दहा कारखान्यासह सेमिकण्डक्टरच्या क्षेत्रात भारत १९ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे.
गेल्या ११ वर्षांत भारताने नेमके काय दिवे लावले याचे वैष्णव यांनी दिलेले तपशील भारतीयांची छाती रुंदावणारे आहेत. इलेक्ट्रॉनिक्स निर्मितीच्या क्षेत्रात भारताने मोठी उडी घेतली आहे. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची निर्मिती ६ पटीने वाढली आहे. एकूण निर्मिती १२ लाख कोटी रुपये झाली आहे. निर्यात ८ पट वाढली आहे. ही रक्कम ३.३ लाख कोटी रुपये आहे. मोबाईल फोनची निर्मिती २८ पट वाढली आहे. यांच्या किमतीचा आकडा ५.५ लाख कोटी इतका प्रचंड आहे. निर्यात १२७ पट वाढली आहे. ही रक्कम २ लाख कोटी इतकी आहे.
राहुल गांधी यांच्या मते आपण कुठून तरी स्पेअर पार्ट्स आणून ते फक्त जोडण्याचे काम करतो. त्यांना असे सुचवायचे आहे की, भारतात टॅलेंट नाही आपण फक्त जोडकाम करतो. स्वत:च्या देशाबद्दल जमेल तेवढे वाईट बोलायचे आणि देशाची प्रतिमा मलिन करायची हा राहुल गांध यांचा जुना धंदाच आहे. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाला त्यांच्या भारतीयत्वाबाबत टीप्पणी करावीशी वाटते. सुदैवाने भाजपाकडे सुधांशू त्रिवेदी, अश्विनी वैष्णव यांच्यासारखे लोक असल्यामुळे राहुलबाबांचे हे दुकान बंद होत चालले आहे.
हे ही वाचा:
भारत-फ्रान्स महासागर मिशनमध्ये भारताने किती मीटर खोलीपर्यंत मारली डुबकी ?
जम्मू आणि काश्मीर: हंडवाऱ्यात तीन दहशतवादी साथीदारांना अटक!
एसएंडपी ग्लोबलने भारताला काय रेटिंग दिले ?
‘वोट चोरी’ सारख्या शब्दांवर निवडणूक आयोगाने व्यक्त केली नाराजी
वैष्णव जे काही बोलले ते ऐकून जगातील महासत्तांचे कान उभे राहीले तर फार आश्चर्य वाटण्याची गरज नाही. भारत सिलिक़ॉन वेफर्सच्या क्षेत्रात ज्या प्रकारे पावले टाकतोय ते अभूतपूर्व आहे. महासत्तांना भारताचे वाटणारे भय यातच दडलले आहे.
सिलिकॉन वेफर्स अर्थात सेमिकंडक्टर चीपबाबत भारत जे काही करतो आहे, ते पाहाता येत्या दहा वर्षात भारत या क्षेत्राचा दादा बनणार आहे. भारतातील पहीली सेमिकंडक्टर चीप याच वर्षी तयार होणार असल्याची घोषणा वैष्णव यांनी केली. दक्षिण कोरीया, जपान सारख्या देशांसोबत भारत काम करतो आहे. सेमिकंडक्टर इंडस्ट्रीचा वाढता पसारा लक्षात घेता २०३२ पर्यंत जगभरात या क्षेत्रातील १० लाख तज्ञांची गरज निर्माण होईल. सेमि कण्डक्टर सर्वव्यापी आहेत. संगणक, क्षेपणास्त्र, उपग्रह, रडार, इलेक्ट्रॉनिक्स सगळीकडे याची आवश्यकता आहे. भारताला याचे महत्व ठाऊक असल्यामुळे आपण या दिशेने दमदार पावले टाकलेली आहेत. कोणतेही क्षेत्र काबीज करण्यासाठी तुमच्याकडे प्रशिक्षित मनुष्यबळ हवे. येत्या दहा वर्षांत देशात ८५ हजार तज्ज्ञ तयार करण्यासाठी सरकारने इंडीया सेमिकण्डक्टर मिशन अंतर्गत २७८ युनिवर्सिटी आणि शिक्षणसंस्थांमध्ये काम सुरू केले आहे. यासाठी आवश्यक असलेली इलेक्ट्रॉनिक डीझाईन ऑटोमेशन उपकरणे या शिक्षण संस्थांना उपलब्ध करून दिली आहेत. ही अशी उपकरणे आहेत, की जी जगाच्या फार कमी शिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध आहेत. या उपक्रमाची गोमटी फळे दिसू लागली आहे.
आयआयटी भुवनेश्वरमध्ये विद्यार्थ्यांनी सेमि कण्डक्टर चीप बनवलेली आहे. देशातील विविध शिक्षणसंस्थांच्या विद्यार्थ्यांनी अशा २० सेमि कण्डक्टर चिप बनवल्या आहेत. सेमिकण्डक्टर तंत्रज्ञान अत्यंत गुंतागुतीचे आणि किचकट आहे. विद्यार्थी शिक्षण संस्थांमध्ये सेमिकण्डक्टर चीप बनवतात असे उदाहरण जगातील कोणत्याही देशामध्ये नाही.
हीच भारताची ताकद आहे. भारताने दहा वर्षात सेमिकण्डक्टर क्षेत्रातील ८५ हजार तज्ज्ञ निर्माण कऱण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पैकी ६० हजार आपण पहील्या ३ वर्षात तयार केले आहेत. म्हणजे लक्ष्य जवळजवळ गाठल्यात जमा आहे.
भारतात जर मोठ्या संख्येने सेमीकण्डक्टर चीपची निर्मिती केली तर देशात जसे मोठ्या संख्येने तंत्रज्ञ लागतील तसेच या चीप बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेअर अर्थ मटेरीअलही लागेल. ज्यावर आज घडीला चीनचा एकाधिकार आहे. चीनची रेअर अर्थ मटेरीअलवर इतकी घट्ट पकड आहे की अमेरिकेलाही वाकवणे चीनला शक्य झाले आहे. उद्या भारताला सेमि कण्डक्टर चीपच्या क्षेत्रात आघाडी घ्यायची असेल तर तज्ज्ञ मनुष्य बळासह रेअर अर्थ मेटरीअलवरही भारताचा ताबा हवा. चीनवर अवलंबून राहाता येणार नाही. निसर्गाची भारतावर कृपा आहे. अलिकडेच जीओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडीया आणि एटॉमिक मिनरल्स डायरेक्टोरेटने राजस्थानच्या बालोत्रा जिल्ह्यातील भाटी खेडा येथे मोठ्या प्रमाणात लॅन्थॅनम, सेरीअम, नीओडायमिअम सारख्या रेअर अर्थ मिनरल्सचे साठे सापडल्याचे जाहीर केले आहे.
हीच ती गोष्ट आहे, जी जगातील अमेरिका, चीनसारख्या महासत्तांना धास्तावते आहे. भारताने क्षेपणास्त्र निर्मिती, अंतरीक्ष विज्ञान या क्षेत्रात आपली मातबरी जगाला दाखवून दिलेली आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणे, क्षेपणास्त्र, रडार, उपग्रह, त्यांचे प्रक्षेपक, मोबाईल फोन या सगळ्याची निर्मिती सिलिकॉन वेफर्सशिवाय अशक्य. भारताकडे हे तंत्रज्ञान असले तरी यासाठी आवश्यक असलेल्या सेमि कण्डक्टर चीप बाबत भारत जगाच्या नकाशावर कुठेच नव्हता. परंतु गेल्या काही वर्षांत या संदर्भात भारताने नेमकी किती मजल मारली याची झलक अश्विनी वैष्णव यांच्या माध्यमातून जगाच्या समोर आलेली आहे. इंडीयन सेमिकण्डक्टर मिशनच्या माध्यमातून भारतात जे टॅलेंट निर्माण होत आहे, सगळे जग त्या टॅलेंटच्या शोधात आहेत. भारताने जगाचे सॉफ्टवेअर मार्केट याच बळावर ताब्यात घेतले. आता याच टॅलेंटसाठी जपानमधील ६० कंपन्या सेमिकण्डक्टर क्षेत्रात काम कऱण्यासाठी भारतात येतायत. वैष्णव यांनी ओडीशा, आंध्र आणि पंजाबमध्ये ज्या चार कारखान्यांची घोषणा केली, त्यापैकी एकात लॉकहीड मार्टीन ही संरक्षण क्षेत्रातील दिग्गज कंपनी आणि आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इंटेल गुंतवणूक करणार आहे. एका बाजूला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानसोबत चुंबाचुबी करतायत आणि दुसरीकडे अमेरिकी कंपन्या टॅलेंटच्या शोधात भारतात येतायत, इथे गुंतवणूक करतायत. भारत जगातील अनेक देशांना चकीत करतो आहे, काहींना भयभीत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







