आमिषाने रशियन सैन्यात भरती झालेले २६ भारतीय मृत्युमुखी

रशियन सैन्यात भरती होण्यासाठी आमिष दाखवून तरुणांना फसवले होते

आमिषाने रशियन सैन्यात भरती झालेले २६ भारतीय मृत्युमुखी

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेन- रशिया युद्धादरम्यान २०२ भारतीयांना रशियन सशस्त्र दलात भरती करण्यात आले होते. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, २०२ भारतीयांपैकी २६ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, तर रशियन बाजूने सात जण बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

खासदार साकेत गोखले आणि रणदीप सिंग सुरजेवाला यांच्या प्रश्नांना उत्तर देताना, परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह म्हणाले की, सरकारच्या एकत्रित प्रयत्नांमुळे त्यापैकी ११९ जणांना लवकर परत आणले आहे तर, ५० जणांना सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रशिया- युक्रेन युद्ध क्षेत्रात मारल्या गेलेल्या दोन भारतीयांचे मृतदेह दिल्ली विमानतळावर आल्यानंतर दुसऱ्या दिवशी १७ डिसेंबर रोजी कनिष्ठ मंत्री कीर्ती वर्धन सिंह यांचे उत्तर आले.

भारतातील पुरुषांना रशियन सैन्यात भरती होण्यासाठी आमिष दाखवून आघाडीवर पाठवल्याच्या ताज्या वृत्तांदरम्यान ही माहिती समोर आली आहे. जानेवारीमध्ये केंद्राने म्हटले होते की रशिया- युक्रेन युद्धात किमान १२ भारतीयांचा मृत्यू झाला होता तर, १६ जण बेपत्ता होते. ऑगस्ट २०२४ मध्ये, युक्रेन युद्धादरम्यान रशियन सशत्र दलात काम करणारे आठ भारतीय मारले गेले होते. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की त्यांनी १० मृत भारतीय नागरिकांचे पार्थिव मायदेशी परत आणण्यास मदत केली आणि इतर दोघांचे स्थानिक अंत्यसंस्कार करण्यास मदत केली. मृत किंवा बेपत्ता झालेल्या १८ भारतीयांच्या कुटुंबातील सदस्यांचे डीएनए नमुने रशियन अधिकाऱ्यांसोबत शेअर केले आहेत जेणेकरून मृतांची ओळख पटवता येईल.

हे ही वाचा:

“कायदा- सुव्यवस्था राखण्यात युनूस सरकार अपयशी”

ध्यानाचे एक नाही तर तीन प्रकार

मुक्ती–गुप्तेश्वर महादेव : ऑस्ट्रेलियातील १३वे ज्योतिर्लिंग

बांगलादेशातील तणाव : अमेरिकन दूतावासाकडून अलर्ट

रशिया- युक्रेन युद्धाच्या दरम्यान दक्षिण आशियाई तरुणांना भरती करण्याचा ट्रेंड २०२३ च्या सुरुवातीला सुरू झाला. उच्च वेतन आणि लाभांच्या फसव्या आश्वासनांद्वारे तरुणांना आकर्षित करण्यात आले, ज्यात भारतातील तरुणांचाही समावेश होता. अनेक जण विद्यार्थी किंवा पर्यटक व्हिसावर रशियाला गेले, परंतु त्यांना रशियन सैन्यात सामील होण्यास भाग पाडले गेले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सुरुवातीलाच युक्रेनविरुद्धच्या युद्धात परदेशी स्वयंसेवकांना रशियात सामील होण्याची परवानगी देण्याच्या योजनेला पाठिंबा दिला होता.

Exit mobile version