नेपाळनंतर आता सरकारविरोधाचा व्यापक जनक्षोभ फिलीपिन्समध्येही पसरला आहे. राजधानी मनिलामध्ये रविवारी (२१ सप्टेंबर) हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधात तीव्र आंदोलन केले. नागरिकांचा संताप एवढा तीव्र होता की, पोलिस प्रशासनालाही आंदोलकांना नियंत्रणात आणणे कठीण झाले. या निदर्शनेतून लोकांनी महागाई, बेरोजगारी, आणि सरकारच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली. आंदोलनाचा भडका अचानक उडाल्याने स्थानिक प्रशासनाची झोप उडाली आहे.
फिलीपिन्समध्ये सुरू असलेल्या निदर्शनांचे मूळ एका मोठ्या भ्रष्टाचार घोटाळ्यात आहे. या घोटाळ्यात कायदेकर्ते, सरकारी अधिकारी आणि व्यावसायिक यांच्यावर पूर नियंत्रण प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात लाच घेतल्याचे, तसेच गरीब आणि आपत्तीग्रस्त देशात सार्वजनिक निधीचा अपहार केल्याचे आरोप आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांचा संताप उफाळून आला असून, मनिलामध्ये हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आहेत. कोणताही हिंसाचार होऊ नये म्हणून पोलिस आणि लष्कराला सतर्क ठेवण्यात आले आहे. मनिलामधील एका ऐतिहासिक उद्यानात आणि राजधानी प्रदेशातील मुख्य EDSA महामार्गावरील लोकशाही स्मारकाजवळ होणाऱ्या विविध निदर्शनांना सुरक्षित ठेवण्यासाठी हजारो पोलिस तैनात करण्यात आले होते.
फिलीपिन्समध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने आणि हिंसाचार सुरू असताना, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियन दूतावासांनी त्यांच्या नागरिकांना निदर्शनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. निदर्शकांनी फिलीपिन्सचे झेंडे फडकावले आणि एक मोठे बॅनर दाखवले ज्यावर लिहिले होते, “आणखी काही नाही, आता पुरे झाले, त्यांना तुरुंगात पाठवा.”
फिलीपिन्समधील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांची प्रमुख नेत्या अल्थिया त्रिनिदाद यांनी सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला. त्या म्हणाल्या, “मला हे अतिशय दुःखद वाटते की आम्ही अजूनही गरिबीत जगतो, आमची घरे आणि भविष्य उद्ध्वस्त झाले आहे, पण याच काळात काही लोक आपल्या कराच्या पैशांचा वापर आलिशान कार खरेदीसाठी, परदेशात प्रवास करण्यासाठी आणि मोठमोठे व्यावसायिक सौदे करण्यासाठी करत आहेत.”
पूर प्रकल्पांमध्ये मोठा घोटाळा
फिलीपिन्समधील पूर नियंत्रण प्रकल्पांमध्ये मोठ्या घोटाळ्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. विशेषतः बुलाकन प्रांतात, जो पूरप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो, तेथे निकृष्ट दर्जाचे प्रकल्प उभारले गेले किंवा काही ठिकाणी प्रकल्प प्रत्यक्षात बांधलेच गेले नाहीत, असा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, निदर्शनांना आणखी वेग मिळत आहे. कॅथोलिक बिशप कॉन्फरन्सचे प्रमुख कार्डिनल पाब्लो व्हर्जिलियो डेव्हिड यांनी या आंदोलनाच्या अनुषंगाने सांगितले, “आमचे उद्दिष्ट अस्थिरता निर्माण करणे नाही, तर लोकशाही अधिक बळकट करणे आहे.”
या आंदोलनाच्या आयोजकांनी स्पष्ट केले की, त्यांचे लक्ष अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांचा राजीनामा मागणे नाही, तर भ्रष्ट सार्वजनिक बांधकाम अधिकारी, कायदेकर्ते आणि बांधकाम कंपनी मालक यांना उघड करणे आणि जबाबदार धरणे हे आहे. आंदोलकांनी सांगितले की, देशातील पूर नियंत्रण प्रकल्पांतील मोठ्या भ्रष्टाचारामुळे सामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, यामागील दोषींना शिक्षा मिळाल्याशिवाय ते शांत बसणार नाहीत.
हे ही वाचा :
सुप्रिया सुळे आर्थिक आरक्षणाच्या बाजूने, मुलाखतीत केले वक्तव्य
“ऑपरेशन सुरू आहे, नंतर फोन करतो”, हुतात्मा जवान बलदेव चंदचे शेवटचे शब्द!







