पाकिस्तान हा आता जगभरात भिकाऱ्यांचा देश म्हणून कुप्रसिद्ध झाल्याचे चित्र आहे. अर्थव्यवस्थेचा कणा मोडलेला असताना सामान्य पाकिस्तानी लोकही परदेशात जाऊन भीक मागत असल्याचे समोर आले आहे. ते जिथे जातात तिथे भीक मागण्यावरून त्यांना फटकारले जात असून त्या देशांमधूनही हकालपट्टी केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच सौदी अरेबियाने भीक मागणाऱ्या सुमारे ५६,००० पाकिस्तानींना हद्दपार केल्याचे उघडकीस आले होते. यानंतर आता संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि अझरबैजानने देखील अशीच मोठी कारवाई केली आहे. हजारो पाकिस्तानी नागरिकांना भीक मागण्याच्या आरोपाखाली त्यांच्या देशातून हद्दपार केले आहे.
सौदी अरेबिया, युएई आणि अझरबैजान हे सर्व मुस्लिम देश आहेत. अहवालानुसार, या वर्षी तिन्ही देशांनी हजारो पाकिस्तानी नागरिकांना भीक मागण्याच्या आरोपाखाली त्यांच्या देशांमधून हाकलून लावले आहे. पर्यटक व्हिसावर दक्षिण आशियाई देशांमध्ये प्रवास करणारे अनेक पाकिस्तानी तिथे राहून भीक मागतात आणि पाकिस्तानात परतण्यास नकार देत असल्याचे लक्षात येताच ही कारवाई करण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे महासंचालक रिफत मुख्तार रझा यांनी राष्ट्रीय असेंब्लीच्या परदेशी पाकिस्तानी आणि मानवाधिकार स्थायी समितीला सांगितले की, या वर्षीच विविध विमानतळांवरून किमान ५१,००० पाकिस्तानींना हद्दपार करण्यात आले आहे. यापूर्वी, युएई, ओमान आणि कतारने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा बंदी घातली होती. मागील अहवालांमध्ये असे सूचित केले गेले आहे की, या देशांनी पाकिस्तानी नागरिकांना गुन्हेगारी, अतिरेकी कारवाया आणि अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी असल्याचे ओळखले आहे.
हे ही वाचा..
आसाममध्ये झालेल्या अपघातात आठ हत्तींचा मृत्यू; राजधानी एक्सप्रेसचे पाच डबे घसरले
सीरियामध्ये ISIS विरुद्ध अमेरिकेचे ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’!
जम्मू- काश्मीर: किश्तवाड जिल्ह्यामधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्याशी संबंध
भारतातील सर्वाधिक पसंती मिळालेल्या १० ट्विटपैकी आठ ट्विट पंतप्रधान मोदींचे
सौदी अरेबियाच्या धार्मिक व्यवहार मंत्रालयाने २०२४ मध्ये इशारा दिला होता की जर परिस्थिती नियंत्रित केली नाही तर त्याचा पाकिस्तानी उमरा आणि हज यात्रेकरूंवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. केवळ सौदी अरेबियाच नाही, तर युएई, कुवेत, अझरबैजान आणि बहरीनसह अनेक पश्चिम आशियाई देशांमध्ये पाकिस्तानी भिकारी आढळतात. २०२४ मध्ये सचिव झीशान खानजादा यांनी सांगितले होते की पश्चिम आशियाई देशांमध्ये ताब्यात घेतलेल्या सर्व भिकाऱ्यांपैकी ९०% भिकारी पाकिस्तानचे आहेत. यामुळे परदेशात पाकिस्तानींच्या प्रतिमेला धक्का बसला आहे.







