इराणकडून अद्याप होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यात येत नसल्याने जागतिक पुरवठा साखळीवर संकट निर्माण झाले आहे. मात्र, इराणला होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे पुन्हा उघडता न येण्यामागे एक मूलभूत समस्या आहे, ती म्हणजे मध्यपूर्वेतील संघर्षादरम्यान तैनात केलेले सर्व नौदल सुरुंग त्यांना शोधता येत नाहीत आणि ते हटवण्यासाठी त्यांच्याकडे तांत्रिक क्षमताही नाही, असे अमेरिकी अधिकाऱ्यांनी ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ला सांगितले आहे.
या समस्येची सुरुवात गेल्या महिन्यात झाली, जेव्हा अमेरिका आणि इस्रायलने इराण विरुद्ध युद्ध सुरू केल्यानंतर लगेचच इराणने लहान बोटींचा वापर करून जलमार्गात सुरुंग पेरायला सुरुवात केली. तेव्हाही, अमेरिकन अधिकाऱ्यांनी नमूद केले की ही मोहीम जलद किंवा कार्यक्षम नव्हती.
२ मार्च रोजी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सामुद्रधुनी बंद असल्याचे जाहीर केले आणि आत प्रवेश करणाऱ्या कोणत्याही जहाजाला ‘आग लावली जाऊ शकते’ असा इशारा दिला . यामुळे जहाज वाहतूक स्थगित झाली आणि जगभरात तेलाच्या किमती वाढल्या. एकदा सुरुंग पेरले गेल्यावर त्याचा परिणाम अधिक गंभीर झाला. टँकरची वाहतूक मोठ्या प्रमाणात घटली, आणि त्यात इराणी ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या अतिरिक्त धोक्यामुळे जोखीम आणखी वाढली. वाहतुकीवरील या दबावामुळे संघर्षादरम्यान तेहरानला महत्त्वपूर्ण फायदा मिळाला.
अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे सुरुंग विखुरलेल्या आणि अव्यवस्थित पद्धतीने पेरण्यात आले होते आणि तेहरानने त्यांच्या ठिकाणांची पूर्ण नोंद ठेवली होती की नाही, हे अद्याप अस्पष्ट आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्यामते, जरी त्यांची नोंद ठेवली गेली असली तरी, काही उपकरणे भरकटली असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ती परत मिळवणे अधिक कठीण झाले आहे.
सुरुंग पेरण्यापेक्षा ते काढणे अधिक गुंतागुंतीचे ठरत आहे. अत्याधुनिक प्रणाली असलेले अमेरिकन सैन्यसुद्धा सुरुंग हटवण्यासाठी विशेष किनारी लढाऊ जहाजांवर अवलंबून असते आणि त्यांच्याकडे व्यापक क्षमता नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, इराणकडे, अगदी स्वतः पेरलेल्या सुरुंगांसाठीसुद्धा, अशा कारवाया वेगाने पार पाडण्याची साधने नाहीत.
इराणने एक अरुंद मार्ग खुला ठेवला आहे, ज्यामुळे टोल भरण्यास इच्छुक असलेल्या जहाजांना तो ओलांडता येतो. रिव्होल्युशनरी गार्ड्सने जहाजांना सुरुंग लागण्याच्या धोक्याबद्दल इशारा दिला आहे , तर निम-सरकारी माध्यमांनी अधिक सुरक्षित मार्ग दर्शवणारे नकाशे प्रसिद्ध केले आहेत — तथापि, हे मार्ग अजूनही प्रतिबंधित आहेत.
दरम्यान, आज इस्लामाबादमध्ये अराघची यांच्या नेतृत्वाखालील ७० सदस्यीय इराणी शिष्टमंडळ शांतता चर्चेसाठी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांना भेटणार असल्याने, तो मुद्दा प्रामुख्याने चर्चेला येण्याची शक्यता आहे.







