पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता चर्चेची एक फेरी पार पडली. या चर्चेतून काहीही निष्पन्न झाले नसले तरी यातून आता एक एक खुलासे होत आहेत. या चर्चेत सहभागी झालेल्या इराणी शिष्टमंडळाचे सदस्य, प्राध्यापक मोहम्मद मरांडी यांनी खुलासा केला की, चर्चेनंतर इराणमध्ये परतत असताना त्यांच्या सर्वांच्या जीवाला धोका होता. सर्व इराणी अधिकाऱ्यांना भीती होती की, त्यांचे विमान हवेतच क्षेपणास्त्राने पाडले जाऊ शकते. त्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी त्यांना शेवटच्या क्षणी अगदी फिल्मी थाटात आपला संपूर्ण मार्ग बदलावा लागला.
लेबनीज वृत्तवाहिनी ‘अल मयादीन’शी बोलताना, प्राध्यापक मरांडी यांनी स्पष्ट केले की, इस्लामाबादमध्ये अमेरिकेसोबत झालेल्या चर्चेदरम्यान सुरक्षेचा धोका इतका जास्त होता की इराणी शिष्टमंडळाला आपल्या सुरक्षा धोरणाबाबत संपूर्ण गुप्तता पाळावी लागली. ते म्हणाले, आमच्या विमानाला लक्ष्य केले जाऊ शकते याची आम्हा सर्वांना खात्री होती. प्राध्यापक मरांडी म्हणाले, परतीच्या प्रवासात आम्ही थेट तेहरानला गेलो नाही. ती एक खूप मोठी कहाणी आहे, पण त्या वेळी आम्हा सर्वांना वाटत होते की ‘ते’ आमचे विमान पाडतील किंवा आमच्या विमानावर क्षेपणास्त्र डागतील, अशी दाट शक्यता आहे.
या जीवघेण्या धोक्याला तोंड देत, इराणी शिष्टमंडळाने आपली रणनीती बदलली आणि अत्यंत गुप्तपणे दुसऱ्या विमानात प्रवेश केला. पुढील धोका टाळण्यासाठी, ते विमानसुद्धा तेहरानला गेले नाही. उड्डाणादरम्यान, विमानाचा मार्ग अचानक बदलण्यात आला आणि ते तेहरानऐवजी मशहद शहरात उतरवण्यात आले. हे सर्व इतक्या गुप्ततेने आणि चपळाईने करण्यात आले की, संभाव्य हल्लेखोरांना शिष्टमंडळाचे नेमके ठिकाण कळू शकले नाही.
हे ही वाचा:
अमेरिका–इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर!
औषध शोधाला गती देण्यात AI बजावणार मोठी भूमिका
वाढत्या तापमानात ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
छत्तीसगडमध्ये वेदांताच्या वीज प्रकल्पात भीषण स्फोट; १० कामगारांचा मृत्यू
मशहदमध्ये सुरक्षित लँडिंग झाल्यानंतरही, इराणी अधिकाऱ्यांनी हवाई मार्ग वापरणे असुरक्षित मानले. मरांडी यांनी स्पष्ट केले की, मशहदला पोहोचल्यानंतर प्रतिनिधी मंडळाचे सदस्य काही गटांमध्ये विभागले गेले. काही जण रेल्वेने, काही जण कारने, तर काही जण बसने प्रवास करून रस्ते मार्गाने तेहरानला परतले. या संपूर्ण प्रवासाची आखणी या उद्देशाने केली होती की, जरी एका मार्गावर हल्ला झाला तरी उर्वरित पथक सुरक्षित राहील.
