बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी यावर्षी डिसेंबरमध्ये भारतातून बांगलादेशात परतण्याची घोषणा केली आहे. त्यांच्यासोबत अवामी लीगच्या वरिष्ठ नेत्यांचाही स्वेच्छेने न्यायालयात शरण जाण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. अटक किंवा मृत्यूचा धोका असला तरी मायभूमीत परतण्याचा निर्णय घेतल्याचे हसीना यांनी स्पष्ट केले.
भारतात निर्वासित जीवन जगत असलेल्या ७८ वर्षीय हसीना यांनी एका दूरध्वनी मुलाखतीत सांगितले की, “माझ्या परतीनंतर मला अटक होऊ शकते, मला ठारही मारले जाऊ शकते. तरीही मला परत जायचे आहे. माझ्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांवर प्रचंड दडपशाही सुरू आहे. मृत्यू आला तर तो माझ्या मातीत यावा, जिथे माझ्या आई-वडिलांचे दफन झाले आहे आणि जिथे त्यांचे रक्त सांडले.”
हसीना यांनी सांगितले की, त्यांच्या पक्षातील अनेक वरिष्ठ नेतेही त्यांच्यासोबत बांगलादेशात परतून न्यायालयासमोर हजर होणार आहेत. त्यामध्ये माजी गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल यांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यावरही बांगलादेशात गंभीर गुन्ह्यांचे आरोप असून त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये विद्यार्थी आंदोलन तीव्र झाल्यानंतर शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडावा लागला होता. त्यानंतर त्या भारतात आल्या आणि तेव्हापासून येथेच वास्तव्यास आहेत. त्यांच्या सरकारविरोधातील आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्याविरोधात मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचे खटले दाखल करण्यात आले.
बांगलादेशातील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (International Crimes Tribunal) २०२५ मध्ये हसीना यांना अनुपस्थितीतच मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. २०२४ मधील विद्यार्थी आंदोलन दडपण्यासाठी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याप्रकरणी त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. मात्र, हसीना यांनी हे सर्व आरोप सातत्याने फेटाळले आहेत.
हे ही वाचा:
बीएचयूमध्ये झाडांची बेकायदा तोड महागात; २.६५ कोटींची भरपाई
‘फिलिप्स’च्या आरोग्यसेवा AI सोल्युशनसाठी भारताला पसंती
वन्यजीव तस्कर अडकले जाळ्यात; सीबीआय, डीआरआयची कारवाई
व्हेनेझुएलामधील भूकंपातील मृतांचा आकडा ३,८८९ वर
बांगलादेश सरकारने शेख हसीना यांचे भारतातून प्रत्यार्पण करण्यासाठी अनेक वेळा भारताकडे औपचारिक मागणी केली आहे. याबाबत ढाकाकडून वारंवार पत्रव्यवहार होत असल्याचेही हसीना यांनी सांगितले. मात्र, “मला परत पाठवण्याची गरज नाही. मी स्वतःहून बांगलादेशात जाणार आहे,” असे त्या म्हणाल्या. भारताने या प्रत्यार्पणाच्या मागणीवर कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे यापूर्वी स्पष्ट केले आहे.
हसीना यांच्या या घोषणेमुळे बांगलादेशातील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अवामी लीगवर बंदी असताना आणि पक्षाच्या अनेक नेत्यांवर कारवाई सुरू असताना त्यांचे स्वदेशात परतण्याचे पाऊल आगामी राजकीय घडामोडींना वेग देऊ शकते. तसेच या निर्णयाचा भारत-बांगलादेश संबंधांवरही परिणाम होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
