व्हेनेझुएलामध्ये मे महिन्यात कर्तव्य बजावत असताना मृत्यू झालेल्या एका भारतीय खलाशाच्या कुटुंबाने गंभीर आरोप केला आहे की, त्याचा मृतदेह जवळपास महिनाभरानंतर भारतात आल्यानंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदनात त्याचे मेंदू, यकृत (लिव्हर), हृदय यांसह सर्व अंतर्गत अवयव गायब असल्याचे आढळले. या धक्कादायक खुलाशानंतर फेडरेशन ऑफ सीफेअर्स युनियन्स ऑफ इंडिया (FSUI) ने व्हेनेझुएलाच्या अधिकाऱ्यांनी शवविच्छेदनाचा अहवाल न देता आणि कोणतीही अधिकृत माहिती न पुरवता मृतदेह भारतात कसा पाठवला, याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. संघटनेने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
३३ वर्षीय राकेश चौहान मुंबईत पत्नी, सहा महिन्यांचा मुलगा, वडील आणि भाऊ यांच्यासोबत राहत होता. त्यांचे मूळ गाव उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात आहे. तो नोव्हेंबर २०२५ मध्ये मर्चंट नेव्हीत दाखल झाला होता आणि व्हेनेझुएलामध्ये मरीन फिटर म्हणून काम करत होता.
७ मे रोजी त्याचे वडील रामदेव चौहान यांना राकेश ज्या कंपनीत काम करत होता त्या कंपनीचा फोन आला. त्यात त्यांना सांगण्यात आले की, जहाजावर काम करताना राकेश पडला आणि त्याला गंभीर दुखापत झाली. दुसऱ्या दिवशी कुटुंबाला सांगण्यात आले की त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्याच्या जगण्याची केवळ पाच टक्के शक्यता आहे. त्याच दिवशी संध्याकाळी कंपनीने राकेशचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, चक्कर आल्यामुळे तो पडला, त्याला गंभीर दुखापत झाली आणि उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला.
मात्र, मृतदेहातील अंतर्गत अवयव गायब असल्याचे समोर आल्यानंतर कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे. एफएसयूआयने एक्सवर प्रसिद्ध केलेल्या दीर्घ निवेदनात “राकेश चौहान यांच्या शवविच्छेदनाचा संपूर्ण अहवाल तात्काळ जाहीर करावा आणि व्हेनेझुएलामध्ये त्यांच्या प्रकरणाच्या हाताळणीतील अनेक गंभीर अनियमिततांबाबत तातडीने स्पष्टीकरण द्यावे,” अशी मागणी केली आहे.
संघटनेने पुढील गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत:
कुटुंबाला न कळवता किंवा त्यांची परवानगी न घेता मृतदेहातील महत्त्वाचे अंतर्गत अवयव का काढण्यात आले?
भारतात पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी कुटुंबाने करेपर्यंत त्यांना अंधारात का ठेवण्यात आले?
मृतदेह स्वीकारल्याच्या पावतीवर पत्नीच्या वतीने “रंजना चौरसिया” ऐवजी “अंजना चौरसिया” अशी बनावट सही का करण्यात आली?
रोजगार करारपत्रात नमूद केलेल्या जहाजाचे नाव आणि प्रत्यक्षात ज्या जहाजावर राकेश कार्यरत होता त्याचे नाव वेगळे का आहे?
संघटनेने म्हटले आहे की, या विसंगतींमुळे गैरप्रकार आणि पुरावे लपविण्याचा गंभीर संशय निर्माण होतो. “नेमके काय लपवले जात आहे?” असा सवाल करत संघटनेने व्हेनेझुएलातील भारतीय दूतावासाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.
हे ही वाचा:
मुंबईत मुसळधार पावसाचा कहर, ५ दिवसाचा अलर्ट
ICC टी-२० क्रमवारीत ईशान किशनचा दबदबा
भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्याविषयी फारुख अब्दुल्ला, मेहबूबा यांना चिंता
रशियाची भारताकडे पेट्रोल पुरवठ्याची मागणी
एफएसयूआयने राकेश चौहान यांच्या कुटुंबाला न्याय, जबाबदारी निश्चित करणे आणि योग्य आर्थिक भरपाई देण्याची मागणी केली आहे. “खलाशांच्या जीवनाशी आणि सन्मानाशी असा निष्काळजीपणा करता कामा नये,” असेही संघटनेने म्हटले आहे.
राकेशचा मृतदेह भारतात आल्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने त्याची तपासणी केली; मात्र शवविच्छेदन करण्यास नकार दिला, कारण परदेशात ते आधीच करण्यात आल्याचे सांगण्यात आले. हे ऐकून कुटुंबीयांना धक्का बसला, कारण राकेशच्या कंपनीने परदेशात शवविच्छेदन झाल्याची माहिती त्यांना कधीच दिली नव्हती. यानंतर देवरिया जिल्हाधिकारी मधुसूदन हुलगी यांच्या निर्देशानुसार दुसरे शवविच्छेदन करण्यात आले.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांना राकेशचे सर्व अंतर्गत अवयव गायब असल्याचे आढळले. त्यामुळे त्याच्या मृत्यूचे नेमके कारण निश्चित करणे अशक्य झाले, कारण न्यायवैद्यकीय तपासणीसाठी आवश्यक असलेले कोणतेही अंतर्गत अवयव (विसेरा) शिल्लक नव्हते.
इंडिया टुडेला मिळालेल्या देवरिया येथील शवविच्छेदन अहवालानुसार, राकेशचा मेंदू, हृदय, प्लीहा (स्प्लीन), यकृत (लिव्हर), स्वादुपिंड (पॅन्क्रियाज), पित्ताशय, दोन्ही मूत्रपिंडे, फुफ्फुसे, आतडी, कोरोनरी धमन्या, मूत्राशय यांसह अनेक अंतर्गत अवयव गायब होते.
याशिवाय, त्याच्या शरीरावर मानेपासून जननेंद्रियाच्या भागापर्यंत तसेच डाव्या कानापासून उजव्या कानापर्यंत एकूण २२ टाके आढळून आले. कुटुंबीयांनी कंपनीवर महत्त्वाची माहिती लपवल्याचा आरोप करत राकेशच्या मृत्यूच्या परिस्थितीची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी आर्थिक भरपाईचीही मागणी केली आहे.
राकेशच्या आईचे कोविडमुळे निधन झाले होते. व्हेनेझुएलाला जाण्यासाठी कुटुंबाने लाखो रुपये खर्च केले होते, कारण त्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल अशी आशा होती. सध्या त्यांची पत्नी रंजना आपल्या मुलासह माहेरी राहत असून ती भारतीय दूतावासाच्या सतत संपर्कात आहे आणि संबंधित कंपनीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करत आहे.
