26.9 C
Mumbai
Monday, July 6, 2026
घरसंपादकीयऑपरेशनच्या तयारीसाठी काश्मीर स्पेशालिस्ट डॉक्टर

ऑपरेशनच्या तयारीसाठी काश्मीर स्पेशालिस्ट डॉक्टर

Google News Follow

Related

सरकारी नियुक्त्या हा काही फार चर्चा करण्यासारखा रसभरीत विषय नाही. सरकारी तंत्राचा तो एक अविभाज्य भाग. परंतु केंद्र सरकारने डायरेक्टर आयबी या पदावर केलेली नियुक्ती पठडीतील वाटत नाही. यामागे काही खास कारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही नियुक्ती झाली आहे महेश दीक्षित या मराठमोळ्या आयपीएस अधिकाऱ्याची. येणाऱ्या काळातील एका महत्वाच्या मोहिमेचे संकेत जणू सरकारने दिले आहेत.

आयबीचे डायरेक्टर तपन डेका निवृत्त झाले असून त्यांच्या जागी महेश दीक्षित यांनी पदभार सांभाळलेला आहे. वैद्यकीय डॉक्टर असलेले दीक्षित आयबीमध्ये स्पेशल डायरेक्टर या पदावर होते. ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांनी चमकदार भूमिका बजावली होती. अनेक वर्षे काश्मीर हे त्यांचे कार्यक्षेत्र राहिलेले आहे. येत्या काळात काश्मीरमध्ये केंद्र सरकार एक मोठे ऑपरेशन हाती घेण्याची शक्यता आहे. बहुधा त्यामुळे काश्मीर स्पेशालिस्ट डॉक्टरकडे आयबीची सूत्रे सोपवण्यात आली आहेत.

भारताची प्रमुख अंतर्गत गुप्तहेर संस्था ‘इंटेलिजन्स ब्युरो’ च्या संचालकपदी (डायरेक्टर ऑफ इंटेलिजन्स) महेश दीक्षित यांची जून २०२६ मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी तपन कुमार डेका यांची जागा घेतली आहे. दीक्षित यांना दोन वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे.

हे ही वाचा:

मुसळधार पावसाने कल्याण-डोंबिवलीची दाणादाण

विक्रोळीच्या पुलामुळे वाढली डोकेदुखी, प्रवाशांचा, चालकांचा संताप

मुंबईत मुसळधार पावसाचा कहर, ५ दिवसाचा रेड अलर्ट

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण

सध्या पीओकेमध्ये आग लागलेली आहे. तेथील जनता पाकिस्तानचे जोखड झुगारून देण्यासाठी रस्त्यावर उतरलेली आहे. पाकिस्तानी रेजर्स हे आंदोलन मोडून काढण्यासाठी शर्थ करतायत. आंदोलकांवर गोळीबार केला जात आहे. ड्रोन हल्ले सुरू आहेत. गिलगिट बाल्टीस्तान हा पाकिस्तान नाही, अशा घोषणा उघडपणे दिल्या जात आहेत. हा भाग भारतात सामील करून घेण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार झालेली असताना, महेश दीक्षित यांच्या हाती आयबीची सूत्रं आली आहेत, या निव्वळ योगायोग नाही. कारण दीक्षित हे काश्मीर या विषयाचे तज्ज्ञ मानले जातात. कारण ते या भागात अनेक वर्षे कार्यरत होते. जम्मू काश्मीरचे अंतरंग त्यांना अचूक ठाऊक आहेत, अगदी तळहातावरील रेषे इतके.

महेश दीक्षित हे १९९३ च्या बॅचचे आंध्र प्रदेश कॅडरचे आयपीएस  अधिकारी आहेत. ते मूळचे एक वैद्यकीय डॉक्टर, परंतु ते या क्षेत्रात रमले नाहीत. नागरी सेवा परीक्षा देऊन आयपीएस झाले. अलिकडे आयपीएस होणाऱ्यांमध्ये डॉक्टर- इंजिनिअर्सचा भरणा लक्षणीय आहे.

दीक्षित यांनी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये तीन दशके सेवा दिली आहे. त्यांनी भारताच्या विविध आणि कठीण सुरक्षा आघाड्यांवर काम केले आहे. बिहार, तेलंगणासारख्या नक्षलग्रस्त भागात त्यांनी काम केले आहे. हैदराबादमध्ये इंडीयन मुजाहीदीन ही दहशतवादी संघटना मोडीत काढण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. नागालँडमध्येही त्यांची कामगिरी चमकदार होती.

जम्मू काश्मीरशी दीक्षित यांचा संबंध खास राहीलेला आहे. २००९ ते २०१२ या काळात ते त्या भागात आयबीचे डेप्युटी डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. २०२० ते २०२४ या काळात त्यांनी श्रीनगरमधील ‘सबसिडिअरी इंटेलिजन्स ब्युरो’ चे प्रमुख म्हणून काम पाहिले. २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवले. हा निर्णय अत्यंत जोखमीचा होता. ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीर पेटले असते, तर पाकिस्तानच्या हाती आयते कोलीत मिळाले असते. तिथे शांतता राखणे महत्वाचे होते. दहशतवादी आणि फुटीरवादी गटांच्या अंतर्गत गोटातील माहिती मिळाल्याशिवाय हे कठीण होते. याच माहितीच्या आधारे काही घडण्याच्या आधी कारवाई करणे शक्य होते. जम्मू काश्मीर शांत राहीले याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, गुप्तचर खात्याची रणनीती यशस्वी ठरली.

२०१२ ते २०१५ या काळात दीक्षित यांनी नागालॅंडमध्ये काम केले. हा भाग काश्मीर इतकाच संवेदनशील आहे. इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात दहशतवादी कारवाया सुरू असतात. ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या कारवाया, बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमेतून होणाऱ्या घुसखोरीमुळे हा भाग अनेक वर्षे धगधगत होता. ईशान्य भारतातील घडामोडींबाबत संवेदनशील माहिती गोळा करण्याचे काम त्यांनी काही वर्षे केलेले आहे.

दीक्षित यांचा कार्यकाळ पाहता एक गोष्ट लक्षात येईल की, अमित शहा यांनी केंद्रीय गृहमंत्री म्हणून जी आव्हाने पेलली त्यात महत्वाची भूमिका दिक्षीत यांनी बजावलेली आहे. कलम ३७० हटवणे, नक्षलवाद संपवणे, पीएफआयवर केलेली कारवाई आदी. २०२४ मध्ये लडाखला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झाले. हे आंदोलन आधी शांततापूर्ण होते, नंतर हिंसक झाले. जम्मू-काश्मीर आणि लेह-लडाख या अत्यंत संवेदनशील क्षेत्रात नागरी संघटना आणि स्थानिक नेत्यांसोबत असलेला दिक्षीत यांचा संवाद इथे उपयोगी पडला.

ऑपरेशन सिंदूर हा महेश दीक्षित यांच्या कारकिर्दीतील लखलखता अध्याय. हे हेरगिरीच्या कौशल्याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल. ऑपरेशन सिंदूर ही पूर्णपणे ‘ऍक्शनएबल इंटेलिजन्स’  म्हणजेच अचूक आणि ठोस गुप्तहेर माहितीवर यशस्वी झालेली लष्करी मोहीम होती. या मोहिमेत भारतीय गुप्तचरांनी सीमेपलीकडील दहशतवादी तळांची अत्यंत बारीकसारीक आणि अचूक माहिती गोळा केली. या तळांचे भौगोलिक स्थान, तिथली सुरक्षा व्यवस्था आणि तिथे होणाऱ्या हालचालींचा तपशील त्यांनी गोळा केला.

याच माहितीच्या आधारे भारतीय सुरक्षा दलांना या तळांवर अचूक मारा करणे शक्य झाले. पाकव्याप्त काश्मीरमधील  दहशतवाद्यांचे प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त करता आले.

‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान वापरलेल्या रणनीतीचे तीन प्रामुख स्तंभ होते. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, तरी मानवी गुप्तहेरांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. दीक्षित यांचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे त्यांचे ‘ग्राउंड नेटवर्क’. सीमेच्या दोन्ही बाजूंना राहणाऱ्या स्थानिक लोकांचे, व्यापाऱ्यांचे भक्कम जाळे त्यांनी तयार केले. स्लीपर सेल कार्यान्वित केल्या.

दहशतवादी कॅम्पच्या आसपास होणारी हालचाल, तिथे येणारी वाहने, रसद (अन्न-धान्य) आणि ये-जा करणारी माणसे ही सगळी माहिती खबऱ्यांमार्फत मिळवण्याची यंत्रणा त्यांनी निर्माण केली.

ह्युमन इंटेलिजन्स अधिक मजबूत करण्यासाठी सॅटेलाइट आणि ड्रोन इमेजरीचा वापर करण्यात आला. उपग्रहांच्या मदतीने त्या विशिष्ट भागांचे हाय-रिझोल्यूशन सॅटेलाइट फोटो आणि थर्मल इमेजेस काढल्या गेल्या. यामुळे जंगलात किंवा डोंगराच्या आडून चालणारे कॅम्प उघडे पडले.

दहशतवादी किंवा त्यांचे हँडलर्स वापरत असलेले सॅटेलाइट फोन्स, रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि मोबाईल सिग्नल्स इंटरसेप्ट (टॅप) करण्यात आले. त्यांच्या संभाषणातून कॅम्पमध्ये नक्की किती लोक आहेत आणि त्यांचे कमांडर कोण आहेत, याचे अचूक पत्ते  मिळाले.

माहीती गोळा केल्यानंतर त्याचे व्यवस्थित विश्लेषण करून कारवाईचा रोडमॅब बनवावा लागतो. इथे दीक्षित यांच्यातील ‘डॉक्टर’ आणि ‘आयपीएस’ कामाला आला. एखाद्या खबऱ्याने सांगितले की “अमक्या गावातून १० पोती धान्य जंगलाकडे गेले”, सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून स्पष्ट झाले की तिथे काही तंबू आहेत. सिग्नल इंटेलिजन्सद्वारे तिथल्या फोन कॉल्सचा तपशील मिळाला. या तीनही गोष्टींची सांगड घालणे महत्वाचे असते. कॅम्पचे अचूक स्थान आणि तिथली सुरक्षा या तपशीलासह एक नकाशा तयार करण्यात येतो. त्यात बारीकसारीक तपशील असतात. बंकर आहेत का, असल्यास त्याची माहिती, पहारेकरी कुठे थांबतात, त्यांची संख्या किती असे अनेक तपशील पुरवले जातात.

खबऱ्यांची माहिती, उपग्रहांची छायाचित्रे आणि दहशतवाद्यांचा सॅटेलाईट फोनद्वारे किंवा एपद्वारे होणारा संवाद या कड्या जोडून, अचूक ‘प्रिसिजन इंटेलिजन्स’ तयार करण्यात गुप्तचर यंत्रणेला यश आल्यामुळे ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले. जगभरात चर्चा झाली, भारतीय माऱ्याच्या अचूकतेची. ऑपरेशन सिंदूर ही झांकी होती, गिलगिट बाल्टीस्तान बाकी आहे. तिथले तपशील आपल्याकडे तयार आहेत, असे मानायला काहीच हरकत नाही.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
319,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा