विक्रोळी पूर्वेकडून पश्चिमेला जाणाऱ्या पुलामुळे सध्या प्रवाशांना प्रचंड डोकेदुखीचा सामना करावा लागतो आहे. विक्रोळी रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या रस्त्याजवळ असलेला हा पूल काही काळापूर्वी बांधण्यात आला. त्यातून विक्रोळी पश्चिमेला जाणे व तिथून पूर्वेला येणे शक्य व्हावे असा उद्देश होता, पण त्या पुलामुळे प्रचंड रहदारी होते आणि लोकांचा प्रचंड वेळ वाया जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
या पुलावरून गाड्या पश्चिमेला जातात तसेच पश्चिमेहून पूर्वेलाही गाड्या येतात. त्यातच हा पूल हायवेलगत असल्यामुळे अनेक वाहने ही विक्रोळी पश्चिमेला जाण्यासाठी याच पुलाचा वापर करतात. विक्रोळी पूर्वेहून अर्थात,कन्नमवार नगरहून येणारी वाहनेही याच पुलाच्या दिशेने जातात. त्यातील काही वाहने पुलावरून जाणारी असतात तर काही वाहने ही स्टेशनच्या दिशेने जाणारी असतात.
हे ही वाचा:
विम्बल्डनमध्ये सेरेनाच्या पुनरागमनाला धक्का
पॉन्झी स्कीम्सवर लक्ष ठेवणाऱ्या इंटेलिजन्स युनिट्सचे काय झाले?
मुंबईत मुसळधार पावसाचा कहर, ५ दिवसाचा रेड अलर्ट
रशियाची भारताकडे पेट्रोल पुरवठ्याची मागणी
पण सकाळी ९ ते ११ या वेळेत इथे प्रचंड रहदारी वाढते. संध्याकाळी ऑफिसेस सुटली की अशीच गर्दी इथे होते. सगळी वाहने एकाचवेळी या चौकात येतात आणि मग गोंधळ होतो. त्यातच तिथे ट्रॅफिक हवालदार नसल्यामुळे या रहदारीला नियंत्रित करणारेही कुणी नसते. प्रामुख्याने रिक्षांचा वावर या भागात मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे रिक्षाचालकच रस्त्यावर उतरून रहदारीला नियंत्रित करण्यासाठी पुढाकार घेतात.
या भागात शाळा, महाविद्यालये, न्यायालय असल्यामुळे लोकांची ये-जा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातच इथे इमारतींचा पुनर्विकासही मोठ्या प्रमाणावर झालेला असल्यामुळे लोकसंख्याही वाढलेली आहे. अशा परिस्थितीत ही समस्या अधिकच त्रासदायक ठरू लागली आहे.
कन्नमवार नगर ते रेल्वे स्टेशन किंवा उलटा प्रवास यासाठी एरवी १०-१५ मिनिटे लागतात पण या पुलामुळे रहदारीचा जो गोंधळ होतो, त्यामुळे अर्धा तास ते ४० मिनिटेही लागतात. प्रामुख्याने नोकरीवर जाणारे लोक रिक्षाच्या प्रतीक्षेत असतात. पण रहदारीमुळे रिक्षादेखील अडकून पडल्यामुळे रिक्षासाठी वाट पाहणाऱ्यांच्या रांगा वाढत जातात. शेअर रिक्षाचालकांच्या धंद्यावर या सगळ्या परिस्थितीचा परिणाम होतो. खासगी रिक्षाही मिळणे मुश्कील होते. ओला, उबर यासारख्या सेवांनाही फटका बसत असल्यामुळे या गर्दीच्या वेळेत तिथे या सेवा मिळणे दुरापास्त होते.
या सगळ्या समस्येची दखल नेमके कोण घेणार आहे, तिथे रहदारीला कोण नियंत्रिण करणार आहे, सध्या पाऊस कोसळत असल्यामुळे रहदारीची ही समस्या आणखी गंभीर बनली आहे. त्यामुळे प्रवासी, वाहन चालक यांची चीडचीड वाढली आहे.







