उत्तर गाझातील रहिवाशांनी तीन तासांत दक्षिण गाझा गाठण्याच्या इस्रायलच्या सूचना

या काळात ठरवून दिलेल्या मार्गावर इस्रायलकडून हल्ला केला जाणार नाही

उत्तर गाझातील रहिवाशांनी तीन तासांत दक्षिण गाझा गाठण्याच्या इस्रायलच्या सूचना

गेल्या आठ दिवसांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. हमासने इस्रायलवर रॉकेट हल्ला केल्यानंतर युद्धाला तोंड फुटलं. याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझा पट्टीवर बॉम्ब वर्षाव केला आहे. यामध्ये अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. तर जवळपास दहा लाख लोक बेघर झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, इस्रायलच्या संरक्षण दलाने गाझा शहर आणि उत्तर गाझा परिसरात राहणाऱ्या नागरिकांना अल्टिमेटमं दिला आहे. नागरिकांना तीन तासांचा वेळ दिला असून या भागात राहणाऱ्या रहिवाशांनी सकाळी १० ते दुपारी एकच्या दरम्यान उत्तर गाझातून तातडीने दक्षिण गाझाच्या दिशेने प्रवास करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. रहिवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव या काळात ठरवून दिलेल्या मार्गावर इस्रायलकडून हल्ला केला जाणार नाही, असंही इस्रायलकडून सांगण्यात आलं आहे.

इस्रायल संरक्षण दलाने ‘एक्स’वर (ट्विटर) केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “गेल्या काही दिवसांत आम्ही गाझा शहर आणि उत्तर गाझामधील रहिवाशांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी दक्षिणेकडील भागात स्थलांतरित होण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे सकाळी १० ते दुपारी एकच्या दरम्यान इस्रायल संरक्षण दलाकडून ठरवून दिलेल्या मार्गावर कोणतंही ऑपरेशन केलं जाणार नाही. त्यामुळे तीन तासांत उत्तर गाझातून दक्षिणेकडे जाण्याचा प्रयत्न करा. तुमची आणि तुमच्या कुटुंबाची सुरक्षितता महत्त्वाची आहे. आमच्या सूचनांचे पालन करा आणि दक्षिणेकडे जा. हमासच्या नेत्यांनी आधीच त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा सुनिश्चित केली आहे,” असंही इस्रायल संरक्षण दलाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हे ही वाचा:

बोगस पासपोर्ट प्रकरणी सीबीआयचे ५० ठिकाणी छापे

इतिहास घडणार; छत्तीसगडमध्ये ‘बुलेट’वर ‘बॅलेट’चे यश

संगीत महोत्सवातील हमासच्या नृशंस हल्ल्याची हादरवणारी दृश्ये उघड!

स्वतःच्याच बंदुकीची गोळी लागून अग्निवीराचा मृत्यू!

या युद्धात अनेक निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे. तर, जखमींची संख्याही मोठी आहे. इस्रायलच्या लष्कराने यापूर्वीही पॅलेस्टाइनच्या ११ लाख लोकांना तात्काळ विस्थापित होण्याचा इशारा दिला होता. उत्तर गाझा पट्टीतून बाहेर पडून त्यांनी दक्षिण भागात विस्थापित व्हावे असे इस्रायलच्या लष्काराने म्हटले होते. हमासच्या दहशतवाद्यांनी हा भाग आपल्या ताब्यात घेतला असून त्यांना हुसकावून लावण्यासाठी इस्रायलने हे पाऊल उचलले आहे.

Exit mobile version