ट्रम्प हे सत्तेत आल्यापासून त्यांनी भारताविरोधात आघाडी उघडली आहे. ऑपरेशन सिंदूरबाबत त्यांचे विधान चर्चेत आहेच पण आता भारतात मतदारसंख्या वाढवण्यासाठी यूएसएड (USAID) कडून २ कोटी डॉलर इतका निधी भारतात दिला गेल्याचे त्यांचे विधान खोटे ठरले आहे. अमेरिकन दूतावासाने हे स्पष्टीकरण दिल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने संसदेत सांगितले.
गुरुवारी राज्यसभेत परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सांगितले की अमेरिकेच्या दूतावासाने यावर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा फेटाळून लावला आहे. ट्रम्प यांनी म्हटले होते की यूएसएड (USAID) ने भारतात मतदार संख्या वाढवण्यासाठी २ कोटी डॉलर इतका निधी मंजूर केला होता.
परराष्ट्र राज्यमंत्री किर्ती वर्धन सिंह यांनी राज्यसभेत लेखी उत्तर देताना सांगितले की नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाने औपचारिकरीत्या कळवले आहे की, USAID/India ने २०१४ ते २०२४ या आर्थिक वर्षांदरम्यान भारतातील मतदार संख्या वाढवण्यासाठी २ कोटी डॉलर हा निधी ना तर प्राप्त केला ना वितरित केला. तसेच मतदार सहभागाशी संबंधित कोणतीही कार्यवाही भारतात केली नाही.”
पार्श्वभूमी
फेब्रुवारी २०२५ मध्ये अमेरिकेच्या Department of Government Efficiency (DOGE) ने जगभरातील ४८.६ कोटी डॉलर निधी रद्द करण्याची घोषणा केली होती.
त्यात भारतासाठी मतदार सहभाग वाढवण्यासाठी कथित २ कोटी डॉलर निधी राखून ठेवला असल्याचे सांगण्यात आले होते. स्वतः ट्रम्प यांनी याला “अमेरिकन मदतीचा गैरवापर” असे उदाहरण म्हणून मांडले होते.
याच पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकन दूतावासाकडे तातडीने मागील १० वर्षांतील सर्व USAID प्रकल्पांची माहिती मागवली होती.
जुलै २०२५ मध्ये दूतावासाने तपशीलवार निधी अहवाल दिला, पण पुन्हा स्पष्ट केले की, भारतामध्ये कधीही मतदार सहभागाशी निगडित उपक्रमांसाठी निधी देण्यात आलेला नाही.
हे ही वाचा:
भारत-रशिया संबंध अधिकाधिक पूरक बनवणे हाच हेतू !
बिहारच्या जनतेने ‘त्या’ यात्रेला पूर्ण नाकारले !
ऑनलाईन गेमिंग विधेयक : वाढत्या धोकेपासून संरक्षण
USAID ऑपरेशन्स संपुष्टात
मंत्रालयाने ने हेही स्पष्ट केले की भारतातील USAID ची सर्व कामकाजे बंद करण्यात आली आहेत. ११ ऑगस्ट रोजी अमेरिकन दूतावासाने भारताला कळवले की भारत सरकारसोबत असलेले सर्व ७ करारनामे रद्द करण्यात आले आहेत.
हे पाऊल अमेरिकेने जागतिक स्तरावर USAID विसर्जित करण्याच्या निर्णयाचा भाग आहे.
USAID निधी कुठे वापरला गेला?
संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२२ ते २०२४ या कालावधीत भारतात USAID निधी खालील क्षेत्रांत वापरला गेला होता:
तिबेटी समुदायांचे समर्थन
वंचित मुलांच्या शिक्षणासाठी मदत
वायू प्रदूषण नियंत्रण उपक्रम
नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प
HIV/AIDS प्रतिबंधक कार्यक्रम
मात्र निवडणुकांशी किंवा मतदार सहभागाशी संबंधित कोणताही कार्यक्रम यात नव्हता.







