एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाविरुद्ध टॅरिफ वॉर पुकारला आहे, तर दुसरीकडे त्यांचे पाकिस्तानवरील प्रेम वाढत असल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर दोन महिन्यांत दुसऱ्यांदा अमेरिकेला भेट देणार आहेत. यापूर्वी मुनीर जूनमध्ये अमेरिकेला भेट दिली होती. असीम मुनीर यांच्यानंतर पाकिस्तानचे हवाई दल प्रमुख झहीर अहमद बाबर सिद्धू यांनीही अमेरिकेला भेट दिली होती.
जनरल असीम मुनीर हे यूएस सेंट्रल कमांड (सेंटकॉम) कमांडर जनरल मायकेल ई कुरिल्ला यांच्या निरोप समारंभात सहभागी होण्यासाठी अमेरिकेला भेट देणार आहेत. कुरिल्ला यांचा निरोप समारंभ फ्लोरिडातील टाम्पा येथील सेंटकॉम मुख्यालयात होणार असल्याचे मानले जात आहे. सेंटकॉम कमांडर जनरल मायकेल ई कुरिल्ला यांनी जुलैच्या अखेरीस पाकिस्तानला भेट दिली होती.
अमेरिकेच्या सेंटकॉम कमांडर जनरल कुरिल्ला यांना पाकिस्तानबद्दल खूप प्रेम आहे आणि त्यांनी अनेकदा दहशतवादाविरुद्धच्या लढाईत इस्लामाबादच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. काही महिन्यांपूर्वी, कुरिल्ला यांनी अमेरिकेने दिलेल्या गुप्तचर माहितीचा वापर करून पाच आयएसआयएस-खोरासन (आयएसआयएस-के) दहशतवाद्यांना पकडल्याबद्दल पाकिस्तानचे कौतुक केले होते.
“पाकिस्तान दहशतवादविरोधी जगात एक अभूतपूर्व भागीदार राहिला आहे… म्हणूनच आपल्याला पाकिस्तान आणि भारताशी संबंध ठेवण्याची गरज आहे,” असे कुरिल्ला यांनी म्हटले होते. दरम्यान, जुलैमध्ये इस्लामाबादला भेट देणाऱ्या जनरल कुरिल्ला यांना पाकिस्तानने त्यांच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक “निशान-ए-इम्तियाज” देऊन कौतुकाची परतफेड केली होती.
हे ही वाचा :
ट्रम्प यांनी आयात शुल्क दुप्पट करून ५० टक्के केले, भारत म्हणाले-“अत्यंत दुर्दैवी”
ट्रम्प यांच्या चिडचिडीचे कारण पल्की, रशिया की एफ-३५?
अमेरिकेने भारतावर लावले आणखी २५ टक्के शुल्क; पण भारत झुकेगा नही!
दोन महिन्यांत दुसरी भेट
असीम मुनीर यांनी या वर्षी जूनमध्ये अमेरिका भेट दिली होती. यादरम्यान त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत जेवणही केले. दोघांची भेट सुमारे दोन तास चालली. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने पाकिस्तानी लष्करी नेत्याचे कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याशिवाय स्वागत केले होते.







