शनिवारी ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये स्थलांतरविरोधी प्रचंड लाट उसळली. ‘युनाइट द किंगडम’ या घोषवाक्याखाली तब्बल १.५ लाखांहून अधिक आंदोलक शहराच्या मध्यवर्ती भागात जमले आणि “आमचा देश परत द्या” अशा घोषणांनी वातावरण दणाणून सोडले.
ही मोर्चा उजव्या विचारसरणीचा कार्यकर्ता टॉमी रॉबिन्सन यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती. गेल्या काही महिन्यांपासून शरणार्थींना हॉटेलमध्ये ठेवण्याविरोधात देशभरात अनेक लहानमोठी निदर्शने होत होती. त्याच पार्श्वभूमीवर या मोठ्या निदर्शनाची आखणी झाली.
इंग्लिश चॅनेलवरील स्थलांतर प्रश्न पृष्ठभागी
इंग्लिश चॅनेल ओलांडून लहान बोटींनी ब्रिटनमध्ये प्रवेश करणाऱ्या स्थलांतरितांच्या मुद्द्यावर सध्या युनायटेड किंगडममध्ये तीव्र वादंग सुरु आहे. आंदोलकांनी “स्टॉप द बोट्स”, “सेन्ड देम होम”, “इनोफ इज इनोफ, सेव आवर चिल्ड्रन” अशा घोषणा देणारे फलक हातात घेतले होते. सेंट जॉर्जचा लाल-पांढरा झेंडा आणि युनियन जॅक फडकवत जमाव जोरजोरात “आमचा देश परत द्या” अशा घोषणा करत होता.
घोषणांनी परिसर दणाणला
जमावाने “केअर स्टार्मर इज अ…” या अपमानजनक गाण्याच्या तालावर घोषणाबाजी केली. “टॉमी”, “हूज स्ट्रीट? अवर स्ट्रीट”, “इंग्लंड” अशा आरोळ्यांनी संपूर्ण परिसर दणाणला.
आयोजक व वक्त्यांनी — ज्यात टॉमी रॉबिन्सन आणि टेस्ला प्रमुख इलॉन मस्क यांचा समावेश होता — “युरोपियन लोकांचा महान बदली (ग्रेट रिप्लेसमेंट)” या सिद्धांताला वारंवार उजाळा दिला. त्यांच्यानुसार, “नियंत्रणाबाहेर गेलेले स्थलांतर ब्रिटनचा नाश करत आहे.”
निदर्शनावेळी एका गाण्यात “पाश्चात्त्य जगाला मध्यपूर्वेसारखे बनवणे” अशा ओळी गायल्या गेल्या. आंदोलकांनी मुस्लिम ब्रदरहूड, आयसिस आणि पॅलेस्टाईनचे झेंडे जाळून फाडले. जमावाने जोरदार टाळ्यांच्या गजरात ते फाडलेले झेंडे हवेत उंचावले.
काही फलकांवर “पांढऱ्या लोकांचा तिरस्कार का, जेव्हा आमच्या करातून सगळं भरलं जातं?”, तर दुसऱ्यावर “कॉल सेंटरमध्ये इंग्रजी बोला” असे संदेश लिहिले होते.
हे ही वाचा:
आर.जी. कर मेडिकल प्रकरण : आरोपी मंगेतर मालदात अटक
मी भगवान शंकराचा भक्त, सगळं विष पचवतो…
ऑपरेशन सिंदूरमध्ये मणिपूरच्या शूर सुपुत्रांनी महत्वाची भूमिका बजावली!
“आमचा देश परत द्या”
आंदोलकांचा प्रमुख सूर आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या ब्रिटन परत मिळवण्याचा होता. आंदोलक सँड्रा मिशेल म्हणाल्या – “आम्हाला आमचा देश परत हवा आहे, आमचे मुक्त भाषण परत हवे आहे. बेकायदेशीर स्थलांतर थांबवले पाहिजे.” त्यांच्या मुलाने जोडले – “आमच्या देशावर एका विचारसरणीचे वर्चस्व बसत आहे. आम्हाला फक्त आमचा देश परत हवा आहे. समर्थकांचे म्हणणे होते की हे उजव्या विचारसरणीचे आंदोलन नसून एक देशभक्तीपर जमाव आहे.
टॉमी रॉबिन्सनचे आवाहन
रॉबिन्सन यांनी या निदर्शनाचे वर्णन “ब्रिटिश जनतेचे जागरण” असे केले. ते म्हणाले – “ब्रिटन अखेर जागे झाले आहे, हे आता थांबणार नाही. आज ब्रिटनमध्ये सांस्कृतिक क्रांतीची ठिणगी पडली आहे. हीच आपली वेळ आहे.”
इलॉन मस्क सहभागी
व्हिडिओ लिंकद्वारे जमावाला संबोधित करताना इलॉन मस्क म्हणाले – “तुम्ही हिंसा निवडा किंवा नका निवडू, पण हिंसा तुमच्याकडे येणारच आहे. तुम्ही लढा नाही दिला, तर नष्ट व्हाल.” त्यांनी पंतप्रधान *केअर स्टार्मर सरकार बरखास्त करण्याचे आवाहनही केले.
ते पुढे म्हणाले – “ब्रिटिश असण्यात एक सौंदर्य आहे. पण मला दिसतेय की मोठ्या प्रमाणावरचे स्थलांतर ब्रिटनची ओळख झपाट्याने पुसून टाकत आहे.”
एरिक झेमूरचे विधान
फ्रेंच अति-उजवा राजकारणी एरिक झेमूर यांनीही निदर्शनाला संबोधित केले. त्यांनी इशारा दिला – “युरोपियन लोकांच्या जागी मुस्लिम संस्कृतीतून आलेले लोक आणले जात आहेत. आपल्या माजी वसाहती आता आपल्यालाच वसाहत बनवत आहेत.”
सरकारची प्रतिक्रिया
ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टार्मर यांनी मात्र या मोर्च्यावर कोणतीही टिप्पणी केली नाही. त्या वेळी ते आपल्या मुलासोबत आर्सेनल-नॉटिंगहॅम फॉरेस्ट फुटबॉल सामना पाहताना दिसले, असे द इंडिपेंडंटने वृत्त दिले. सरकारनेही या मोर्चाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला आणि उपस्थिती १.१ लाखांपेक्षा कमी असल्याचा दावा केला.







