जम्मू- कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांनी आपला प्राण गमावला. यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत असून मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्यदल प्रमुख, संरक्षणमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेतली. भारतातील हालचालीनंतर पाकिस्तानची भीतीने गाळण उडाली असून भारत राजनैतिक पातळीवर कोंडी करत असतानाचं लष्करी कारवाई करू शकतो अशी भीती पाकिस्तानला आहे. अशातच पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी मध्यरात्री दीड वाजता पत्रकार परिषद घेतली.
पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी दावा केला की, देशाला विश्वसनीय गुप्तचर माहिती मिळाली आहे, ज्यामध्ये असे सूचित केले आहे की भारत पुढील २४ ते ३६ तासांत लष्करी हल्ला करू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिल्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे.
एक्स वर पोस्ट केलेल्या एका निवेदनात, अताउल्लाह तरार यांनी इशारा दिला की, कोणत्याही आक्रमक कृत्याला निर्णायक प्रत्युत्तर दिले जाईल आणि या प्रदेशात होणाऱ्या कोणत्याही गंभीर परिणामांसाठी भारत जबाबदार असेल. “पाकिस्तानकडे विश्वासार्ह गुप्तचर माहिती आहे की भारत पहलगाम घटनेची खोटी सबब वापरून पुढील २४ ते ३६ तासांत लष्करी हल्ला करण्याचा विचार करत आहे,” असे अताउल्लाह तरार म्हणाले. कोणत्याही आक्रमक कृत्याला निर्णायक प्रत्युत्तर दिले जाईल. या प्रदेशात होणाऱ्या कोणत्याही गंभीर परिणामांसाठी भारत पूर्णपणे जबाबदार असेल, असेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री महोदय, ही घ्या शांतीदूत पवारांचे ऋण फेडण्याची संधी…
२०२५ मध्ये फ्रेशर्स आणि टेक टॅलेंटसाठी प्रचंड मागणी
मग पाकिस्तानचा श्वासही बंद केला जाईल
‘काल’ साठी दोन महिने वाघांसोबत जंगलात राहिली ईशा देओल
पुढे ते म्हणाले, पाकिस्तान स्वतः दहशतवादाचा बळी राहिला आहे आणि या संकटाचे दुःख त्यांना खरोखर समजते. आम्ही नेहमीच त्याचा सर्व स्वरूपात आणि प्रकटीकरणांमध्ये, जगात कुठेही निषेध केला आहे. पाकिस्तानने सत्य शोधण्यासाठी निष्पक्ष तज्ञ आयोगाद्वारे विश्वासार्ह, पारदर्शक आणि स्वतंत्र चौकशीची मोकळ्या मनाने ऑफर दिली आहे. विचित्र परिस्थिती निर्माण होण्याची आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामांची जबाबदारी भारतावरच असेल यावर भर देऊन त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला परिस्थितीचे गांभीर्य ओळखण्याचे आवाहन केले आहे.
