बांगलादेशमध्ये दीपू चंद्र दास आणि अमृत मोंडल या दोन हिंदू तरुणांची हत्या झाल्यानंतर जगभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. बांगलादेशमध्ये वारंवार अल्पसंख्यांकांवर हल्ले होत असून विशेषतः हिंदूंना लक्ष्य करण्यात येत आहे. यामुळे बांगलादेशमधील हिंदू भयभीत झाले असून त्यांनी भारताला आवाहन केले आहे. बांगलादेशात अडकलेले आणि इस्लामी कट्टरपंथीय गटाकडून होणाऱ्या रोषापासून वाचण्यासाठी म्हणून हिंदू लोक भारताची सीमा उघडण्यासाठी संदेश पाठवत आहेत.
टाईम्स ऑफ इंडियाने या संदर्भात वृत्त दिले असून चितगाव, ढाका आणि मयमनसिंग येथे राहणाऱ्या हिंदूंच्या विविध गटांनी यासंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “आपल्या श्रद्धेसाठी आपल्याला सतत अपमान सहन करावा लागतो. रस्त्यावरून चालताना आपल्याला येणारे टोमणे कधीही हत्येत बदलू शकतात. आता अडकलो असून कुठेही जायला जागा नाही. अपमान गिळंकृत करावा लागतो कारण दीपू किंवा अमृतसारखेच भवितव्य भोगावे लागेल अशी भीती वाटते,” असे रंगपूरमधील एका ५२ वर्षीय रहिवाशाने सांगितले. पुढे ते म्हणाले की, असहाय्य असून फक्त भारतात पळून जाऊ शकतो, पण सीमेवर कडक नियंत्रण आहे.
ढाक्यातील आणखी एका हिंदू रहिवाशाने सांगितले की, “जर दीपू दासच्या लिंचिंगमुळे भीती निर्माण झाली असेल, तर माजी राष्ट्रपती खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान यांचे बांगलादेशात परतणे अधिक चिंताग्रस्त आहे. जर बीएनपी सत्तेत आली तर आपल्याला अधिक छळाला सामोरे जावे लागू शकते. शेख हसीनाची अवामी लीग हीच आमची एकमेव तारणहार होती.” भारतीय सीमा उघडल्याने छळाला सामोरे जाणाऱ्यांसाठी किमान सुटकेचा मार्ग निर्माण होईल, असे ढाक्यातील एका हिंदूने सांगितले. बांगलादेशात अनेक जण मुठीत जीव घेऊन जगत आहेत. ज्यात दीपू चंद्र दास याच्या कुटुंबाचाही समावेश आहे.
हे ही वाचा:
मशिदीबाहेर ४५ वर्षे पडलेले दगड हटवल्यावर फोडली पोलिसांची डोकी
मुलुंडमध्ये ‘डिजिटल अटक’चा सापळा; निवृत्त कर्मचाऱ्याची २.०४ कोटींची सायबर फसवणूक
पाकिस्तानात नाही राहायचे, गेल्या वर्षी ७ लाख लोकांनी सोडला देश
बॉक्स ऑफिसवर स्टार्सचा ‘महामुकाबला’
माजी पूर्व पाकिस्तान निर्वासितांची संघटना असलेल्या बांगल समनबे समितीचे अध्यक्ष डॉ. सुबोध बिस्वास म्हणतात, “हिंदू संघटना सक्रिय का होत नाहीत? भारत हा एकमेव देश आहे जिथे बांगलादेशातील हिंदू संकटाच्या वेळी अवलंबून राहू शकतात. आम्ही सीमेवर निदर्शने करण्याची योजना आखत आहोत. बांगलादेशात २.५ कोटी हिंदू आहेत. ही संख्या कमी नाही.”







