कोलंबियामध्ये राष्ट्रपती पदाच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला, रॅलीदरम्यान गोळीबार!

प्रकृती चिंताजनक

कोलंबियामध्ये राष्ट्रपती पदाच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला, रॅलीदरम्यान गोळीबार!

कोलंबियाची राजधानी बोगोटा येथे एका निवडणूक कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती पदाचे उमेदवार मिगुएल उरीबे टर्बे यांच्यावर हल्ला करण्यात आला. उरीबे यांच्यावर एका व्यक्तीने तीन गोळ्या झाडल्या, त्यापैकी दोन गोळ्या त्यांच्या डोक्यात लागल्या. शनिवारी (७ जून) एका उद्यानात उरीबे एका लहान जमावाला संबोधित करत असताना ही घटना घडली.

२०२६ मध्ये राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक लढवणारे ३९ वर्षीय सिनेटर हे कोलंबियाचे माजी अध्यक्ष अल्वारो उरिबे यांनी स्थापन केलेल्या विरोधी कंझर्व्हेटिव्ह डेमोक्रॅटिक सेंटर पक्षाचे सदस्य आहेत. कोलंबियन माध्यमांनुसार, उरीबे यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये भाषण सुरू असतानाच गोळी झाडल्याचे दिसून येते आणि तिथे उपस्थित असलेले लोक घाबरून पळून जाऊ लागतात. घटनेनंतर पोलिसांनी लगेचच एका संशयिताला अटक केली आहे.

उरीबे यांच्या पक्षाच्या सेंट्रो डेमोक्रॅटिकोने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे आणि म्हटले कि हा केवळ एका नेत्याच्या जीवनावर हल्ला नाही तर कोलंबियाच्या लोकशाही आणि स्वातंत्र्यावर थेट हल्ला आहे. कोलंबियाचे डावे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांच्या सरकारनेही या घटनेचा निषेध केला आहे आणि हा हल्ला लोकशाहीविरुद्ध हिंसाचाराचे गंभीर कृत्य असल्याचे म्हटले.

हे ही वाचा : 

संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भरतेच्या दिशेने

कोथंडारामस्वामी मंदिरात तब्बल ८३ वर्षांनंतर रथयात्रा

आप, काँग्रेसने झोपडपट्टीवासियांना वर्षानुवर्षे मूर्ख बनवलं

बकरीदच्या दिवशी ६० वर्षीय दिली स्वतःचीच ‘कुर्बानी’.

दरम्यान, कोलंबियाचे संरक्षण मंत्री पेड्रो सांचेझ यांनी सांगितले की गोळीबारात एका संशयिताला अटक करण्यात आली आहे आणि अधिकारी इतरांचा सहभाग आहे का याचा तपास करत आहेत. या हल्ल्यानंतर संपूर्ण कोलंबियामध्ये संतापाची लाट असून आरोपींवर कडक कारवाईची मागणी करत आहेत. सध्या पोलिस तपास सुरू आहे आणि संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवले जात आहे.

Exit mobile version