पाकिस्तान आणि अफगाण तालिबानमध्ये चार दिवस चाललेल्या संघर्षानंतर आता युद्धबंदी झाली आहे. दोन्ही बाजूंनी पुढील ४८ तास एकमेकांवर हल्ला न करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, अफगाणिस्तानातील तालिबानी दहशतवादी पाकिस्तानवरील विजयाचा आनंद साजरा करत आहेत. अनेक ठिकाणी विजयाचे प्रतीक म्हणून पाकिस्तानी सैनिकांचे गणवेश प्रदर्शित केले जात आहेत. पाकिस्तानला लागून असलेल्या सीमावर्ती भागात विजय मिरवणुकीत पाकिस्तानी रणगाडे प्रदर्शित केले जात आहेत. चमन सीमेवर झालेल्या संघर्षादरम्यान तालिबानी सैनिकांनी हे पाकिस्तानी रणगाडे ताब्यात घेतले होते.
बुधवारी पाकिस्तानने काबूल आणि कंधारमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यांत किमान १५ अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. हा हल्ला त्या घटनेनंतर झाला जेव्हा अफगाण तालिबान लढवय्यांनी प्रत्युत्तरादाखल स्पिन बोलदाक येथील पाकिस्तानी सीमा चौक्यांवर कब्जा केला. तालिबानने पळून गेलेल्या पाकिस्तानी सैनिकांचे गणवेशही जप्त केले.
बीबीसीचे अफगाण पत्रकार दाऊद जुनबिश यांनी वृत्त दिले की, “ड्युरंड रेषेजवळील सोडून दिलेल्या पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांमधून सापडलेले पँट अफगाणिस्तानच्या पूर्व नांगरहार प्रांतात प्रदर्शित करण्यात आले आहेत.” त्यांनी तालिबानी सैनिकांचा एक फोटो शेअर केला आहे ज्यात ते पँट आणि शस्त्रे दाखवत आहेत.
“इस्लामी अमिरातने त्यांना योग्य उत्तर दिलं. सगळे लोक पाकिस्तानविरुद्ध इस्लामी अमिरातसोबत उभे आहेत,” असे वक्तव्य पक्तिया प्रांतातील रहिवासी बेतुल्लाह यांनी तोलो न्यूजशी बोलताना केलं. कंधारमधील मोहिबुल्लाह नावाच्या नागरिकाने म्हटले, “गरज भासली, तर आम्हीही इस्लामी अमिरातच्या लष्करासोबत मैदानात उतरू.”
हे ही वाचा :
२०३० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या यजमानपदासाठी अहमदाबादचा विचार होणार
एकटेपणा कर्करोगग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचा धोका वाढवू शकतो
जीएसटी सुधारांमुळे नागालंडच्या अर्थव्यवस्थेला बळ
दरम्यान, गेल्या चार दिवसांत पाकिस्तान-अफगाणिस्तान संघर्षात २०० हून अधिक लोक मारले गेले आहेत. बळी पडलेल्यांपैकी बहुतेक अफगाण नागरिक आहेत. गेल्या आठवड्यात पाकिस्तानने तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) च्या छावण्यांवर हवाई हल्ले केले तेव्हा हा संघर्ष सुरू झाला. तालिबानने याला सार्वभौमत्वाचे उल्लंघन म्हटले आणि सीमा संघर्ष आणि अफगाण हवाई क्षेत्राचे वारंवार उल्लंघन केल्याबद्दल पाकिस्तानला जबाबदार धरले.







