भारत आणि अमेरिकेने परस्पर व्यापाराला नवी चालना देण्यासाठी मोठे पाऊल उचलत टॅरिफवर अंतरिम करार करण्यावर सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी करून सांगितले की, या अंतरिम चौकटीमुळे द्विपक्षीय व्यापार करार संदर्भातील चर्चेचा आवाका अधिक व्यापक होईल. ही घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील दूरध्वनी संवादानंतर समोर आली असून, त्यानंतर लगेचच अमेरिकेने भारतावरील टॅरिफमध्ये कपात करण्याची घोषणा केली.
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी या कराराला भारताच्या निर्यात क्षेत्रासाठी ऐतिहासिक संधी ठरवत सांगितले की, यामुळे भारतीय निर्यातदारांसाठी ३० ट्रिलियन डॉलर्सच्या जागतिक बाजारपेठेचे दरवाजे खुले होतील. त्यांनी स्पष्ट केले की, याचा सर्वाधिक लाभ एमएसएमई, शेतकरी आणि मच्छीमारांना होईल आणि परिणामी लाखो लोकांसाठी नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होतील. गोयल म्हणाले, “हा करार भारत आणि अमेरिकेला आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्यावर केंद्रित राहण्यास मदत करेल. हा आपल्या लोकांसाठी आणि उद्योगांसाठी शाश्वत विकासाच्या सामायिक संकल्पाचे प्रतिबिंब आहे.”
या अंतरिम व्यापार चौकटीअंतर्गत दोन्ही देशांनी टॅरिफमध्ये मोठ्या प्रमाणावर सवलती देण्यास आणि व्यापाराला चालना देणारे बदल करण्यास सहमती दर्शवली आहे. भारत अमेरिकेतून आयात होणाऱ्या सर्व औद्योगिक उत्पादने तसेच अन्न व कृषी उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीवरील टॅरिफ रद्द किंवा कमी करणार आहे. अमेरिकेकडून भारतीय उत्पादनांवर लावले जाणारे पारस्परिक टॅरिफ कमी करून १८ टक्के करण्यात येतील. यामुळे वस्त्रोद्योग व परिधान, लेदर व फुटवेअर, प्लास्टिक व रबर उत्पादने, सेंद्रिय रसायने, होम डेकोर, हस्तकला आणि निवडक यंत्रसामग्री या क्षेत्रांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल.
हे ही वाचा:
मुंबई महापौर- उपमहापौरपदाच्या उमेदवारांची घोषणा; कोणाची लागली वर्णी?
अमेरिकेकडून इराणवर नवे निर्बंध; ऊर्जा क्षेत्राला केले लक्ष्य
भारत- अमेरिका करारामुळे ‘मेक इन इंडिया’ला मिळणार चालना!
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर गुगलची ऐतिहासिक झेप
वॉशिंग्टन काही भारतीय विमान आणि विमानांच्या सुट्या भागांवर (एअरक्राफ्ट पार्ट्स) लावलेले टॅरिफही हटवणार आहे. तसेच करारात ऑटोमोबाईल पार्ट्ससाठी भारताला प्रेफरेंशियल टॅरिफ रेट कोटा देण्याचाही उल्लेख आहे. जनरिक औषधे, रत्न व आभूषण (हिरा-जवाहरात) यांसह अनेक उत्पादनांवरील टॅरिफ शून्य करण्यात येणार आहेत. दोन्ही देशांनी परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये कायमस्वरूपी प्रेफरेंशियल मार्केट ॲक्सेस उपलब्ध करून देण्यावरही सहमती दर्शवली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अंतरिम व्यापार कराराचे स्वागत करताना सांगितले की, हा करार भारत-अमेरिका भागीदारीची वाढती मजबुती दर्शवतो. ते म्हणाले, “हा करार भारत-अमेरिका भागीदारीतील वाढती खोली, विश्वास आणि गतिशीलता अधोरेखित करतो. भारत आणि अमेरिका नवोपक्रमाला चालना देण्याची सामायिक बांधिलकी ठेवतात आणि ही चौकट आपल्या देशांमधील गुंतवणूक व तंत्रज्ञान भागीदारी अधिक मजबूत करेल. भारत ‘विकसित भारत’ या उद्दिष्टाकडे वाटचाल करत असताना, लोकांना सशक्त करणाऱ्या आणि सामायिक समृद्धीत योगदान देणाऱ्या भविष्याभिमुख जागतिक भागीदाऱ्या उभारण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.”







