भिलावा: पचन, त्वचा आणि सांधेदुखीवर गुणकारी, पण काळजी गरजेची

भिलावा: पचन, त्वचा आणि सांधेदुखीवर गुणकारी, पण काळजी गरजेची

आयुर्वेदात भिलावा ही अतिशय प्रभावी औषधी मानली जाते. पचनाचे त्रास, त्वचारोग आणि सांधेदुखी यावर भिलावा उपयोगी ठरतो, असं आयुर्वेद सांगतो. दिसायला साधा फळासारखा वाटणारा भिलावा गुणधर्मांनी मात्र खूप शक्तिशाली आहे. योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात वापर केला, तर तो जुन्या तक्रारींमध्येही आराम देऊ शकतो.

भिलाव्याचा सगळ्यात मोठा फायदा पचनसंस्थेवर होतो. ज्यांना बद्धकोष्ठता, अपचन, गॅस, पोट फुगणं किंवा वारंवार पोट बिघडणं असा त्रास असतो, त्यांच्यासाठी भिलावा उपयोगी मानला जातो. तो पोटातील जंत नष्ट करायला मदत करतो आणि भूकही वाढवतो. पचन नीट राहिलं की शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि थकवाही कमी जाणवतो.

त्वचारोगांमध्येही भिलावा फायदेशीर मानला जातो. एक्झिमा, मुरुम, सोरायसिस आणि पांढरे डाग अशा समस्यांवर आयुर्वेदात भिलाव्याचा वापर केला जातो. त्याचे दाहशामक आणि जंतुनाशक गुण त्वचेच्या जुन्या त्रासात आराम देतात. मात्र, भिलाव्याचं तेल किंवा लेप थेट लावण्याआधी शोधन करणं गरजेचं असतं, नाहीतर जळजळ होऊ शकते.

सांधेदुखी आणि संधिवाताच्या रुग्णांसाठीही भिलावा उपयोगी ठरतो. भिलाव्याच्या तेलाने मालिश केल्यास सूज कमी होते आणि हालचाल करताना आराम मिळतो. काही आयुर्वेदिक वैद्य भिलावा अंतर्गत औषध म्हणूनही देतात, ज्यामुळे जुना दुखणा हळूहळू कमी होत असल्याचं दिसून येतं.

याशिवाय भिलावा लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि दमा सारख्या श्वसनाच्या त्रासातही मदत करतो, असं सांगितलं जातं. केस गळणं आणि अकाली पांढरे होणं या समस्यांवरही भिलाव्याच्या तेलाचा वापर केला जातो.

मात्र, भिलाव्याचे फायदे जितके आहेत, तितकीच काळजी घेणंही गरजेचं आहे. भिलावा स्वभावाने उष्ण आणि तीक्ष्ण असतो. शोधन न करता आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय त्याचा वापर केल्यास तो अपायकारक ठरू शकतो. गर्भवती महिला, लहान मुले आणि अशक्त प्रकृतीच्या लोकांनी भिलाव्यापासून दूर राहणंच योग्य ठरतं.

Exit mobile version