शाकाहारी थाळीपेक्षा मांसाहारी थाळी स्वस्त! कारण काय?

क्रिसिल इंटेलिजन्सने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार

शाकाहारी थाळीपेक्षा मांसाहारी थाळी स्वस्त! कारण काय?

क्रिसिल इंटेलिजन्सने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, फेब्रुवारी महिन्यात घरगुती शाकाहारी थाळीच्या किंमतीत वार्षिक आधारावर कोणताही बदल झालेला नाही. मात्र, मांसाहारी थाळीची किंमत सुमारे ३ टक्क्यांनी कमी झाली आहे. अहवालात म्हटले आहे की, फेब्रुवारी महिन्यात बटाटा, कांदा आणि डाळींच्या किमतीत घट झाली असली तरी टोमॅटोच्या दरवाढीमुळे शाकाहारी थाळीची एकूण किंमत स्थिर राहिली. अधिक आवक झाल्यामुळे कांद्याच्या किमतींमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे २४ टक्क्यांची घट झाली आहे.

बटाट्याच्या किमतीतही मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे १३ टक्क्यांची घट झाली आहे. सध्या काढणीचा हंगाम शिखरावर असून मागील रब्बी हंगामातील कोल्ड स्टोरेजमधील साठ्याची विक्रीही सुरू असल्याने ही घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षात सुरुवातीचा साठा अधिक असल्यामुळे डाळींच्या किमतींमध्येही मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ९ टक्क्यांची घट झाली असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

घरगुती थाळी तयार करण्याचा सरासरी खर्च हा उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भारतातील कच्च्या मालाच्या प्रचलित किमतींवर आधारित मोजला जातो. या किमतींतील मासिक बदलांचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खर्चावर होत असल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. मांसाहारी थाळीच्या किमतीत झालेली घट ही मुख्यतः ब्रॉयलर कोंबडीच्या किमतीत वार्षिक आधारावर सुमारे ७ टक्क्यांची घट झाल्यामुळे आहे. मांसाहारी थाळीच्या एकूण खर्चात ब्रॉयलर कोंबडीचा सुमारे ५० टक्के वाटा असतो.

क्रिसिल इंटेलिजन्सचे संचालक पुष्पन शर्मा यांनी सांगितले की, टोमॅटोच्या किमती वाढण्यामागे लागवडीतील विलंब हे मुख्य कारण आहे. त्यामुळे पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम झाला. नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान बाजारात टोमॅटोची आवक वार्षिक आधारावर सुमारे ३२ टक्क्यांनी घटली होती. आगामी काळात भाजीपाल्यांच्या किमतींमध्ये काहीशी नरमाई येण्याची शक्यता आहे. टोमॅटोच्या किमती एप्रिलच्या मध्यापर्यंत मागील वर्षाच्या तुलनेत जास्त राहण्याची शक्यता असून त्यानंतर हंगामी आवक वाढल्यामुळे दर स्थिर होऊ शकतात. शर्मा यांनी पुढे सांगितले की, मार्च–एप्रिल या आवक शिखराच्या काळात बटाट्याच्या किमती कमी राहण्याची शक्यता आहे. तर पुढील दोन ते तीन महिन्यांत कांद्याच्या किमतींवर दबाव राहू शकतो, जोपर्यंत निर्यातीत लक्षणीय वाढ होत नाही.

मध्यपूर्वेतील अनिश्चित परिस्थिती आणि संभाव्य व्यापार अडथळ्यांमुळे बासमती तांदळाच्या मागणीतही काहीशी नरमाई येऊ शकते, ज्याचा परिणाम किमतींवर होण्याची शक्यता आहे. भारताच्या बासमती तांदूळ निर्यातीमध्ये इराणचा सुमारे १८ टक्के वाटा आहे, तर इतर मध्यपूर्व देशांचा वाटा सुमारे ५५ ते ६० टक्के आहे. त्यामुळे संभाव्य लॉजिस्टिक अडचणींबाबत निर्यातदार सध्या सावध आहेत. तथापि, आफ्रिकी देशांकडे मोठ्या प्रमाणात निर्यात होणाऱ्या गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर या परिस्थितीचा मोठा परिणाम होण्याची शक्यता नसल्याचेही शर्मा यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version