अभिनेता अजय देवगणच्या आगामी चित्रपट ‘सन ऑफ सरदार-2’चा ट्रेलर शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये अभिनेता पुन्हा एकदा जस्सीच्या भूमिकेत दिसत आहे.
अभिनेता अजय देवगणने शुक्रवारी इन्स्टाग्रामवर आपला आगामी चित्रपट ‘सन ऑफ सरदार-2’ चा ट्रेलर शेअर केला आहे, ज्यात तो जस्सीच्या रूपात पुन्हा परतला आहे. ट्रेलर शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “ॲक्शन! इमोशन्स! गोंधळाचा महास्फोट. जस्सी परत आला आहे, आणि यावेळी सगळं काही डबल आहे. ‘सन ऑफ सरदार-2’, येत आहे २५ जुलैला थिएटरमध्ये!”
ट्रेलर पाहून असं वाटतं की चित्रपटात भरपूर ॲक्शन, विनोद आणि पंजाबी अंदाज पाहायला मिळणार आहे. ट्रेलरची सुरुवात ‘सन ऑफ सरदार’च्या जुन्या आठवणींनी होते, ज्यामुळे प्रेक्षकांना जस्सीच्या धमाल जगात परत नेले जाते.
यानंतर ट्रेलरमध्ये एक इंग्रजी बेबे पोल डान्स करताना दिसते, आणि करताना अचानक खाली पडते. त्याच वेळी जस्सीची भेट तीन महिलांशी होते, त्यातल्या एका महिलेला तो गंमतीशीर डायलॉग म्हणतो, “तू आधी फक्त बाई होतीस, पण आता एक बाई, ती पण पाकिस्तानी… तुम्ही आमच्या देशावर बॉम्ब टाकता, आमच्या देशावर!”
ट्रेलरमधील सर्वात मजेशीर सीन म्हणजे, जेव्हा मृणाल आपल्या मैत्रिणीचं लग्न लावून देण्यासाठी स्वतः मम्मी बनते आणि जस्सी ऊर्फ अजय देवगणला पप्पा बनवते. आणि रवि किशनला इम्प्रेस करण्यासाठी जस्सी ऊर्फ सरदारजी त्यांना ‘बॉर्डर’ चित्रपटाची कहाणी सांगू लागतो.
विजय कुमार अरोरा दिग्दर्शित या चित्रपटात संजय मिश्रा, विंदू दारा सिंग, डॉली अहलूवालिया, नीरू बाजवा, चंकी पांडे, कुब्रा सैत, दीपक डोबरियाल, रोशनी वालिया, शरद सक्सेना आणि साहिल मेहता प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
हे ही वाचा:
शिंदेंच्या ‘बॉक्सर’ आमदारावर कारवाई सुरु, गुन्हा दाखल!
ठाकरे बंधू एकाच मंचावर, जल्लोष माध्यमांच्या कार्यालयात!
‘छांगुर बाबा’ला मुस्लिम देशांकडून धर्मांतरासाठी मिळाले ५०० कोटी रुपये!
भाजपने टी राजा सिंह यांचा राजीनामा स्वीकारला!
हा चित्रपट जिओ स्टुडिओज, देवगण फिल्म्स आणि टी-सीरिज यांच्या संयुक्त विद्यमाने बनवण्यात आला आहे. यात भरपूर ॲक्शन, कॉमेडी आणि ड्रामा पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २०१२ मध्ये आलेल्या सुपरहिट ‘सन ऑफ सरदार’ चा सिक्वेल आहे.
२०१२ मध्ये आलेल्या ‘सन ऑफ सरदार’मध्ये सोनाक्षी सिन्हा प्रमुख भूमिकेत होती. त्या चित्रपटात अजय देवगणने जस्सी आणि संजय दत्तने बिल्लूची भूमिका साकारली होती. सिक्वेलमध्ये संजय दत्त पुन्हा एकदा डॉनच्या भूमिकेत परतणार आहेत. तसेच, आधी विजय राजसाठी लिहिलेली भूमिका आता संजय मिश्रा साकारताना दिसतील.







