NEET पेपरफुट प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे आपल्यावर आणि कुटुंबावर दबाव टाकण्यात आला असून, “भाजपमध्ये प्रवेश करा, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल,” अशा धमक्या मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दिपके यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न होत असून आंदोलनकर्त्यांना लक्ष्य केले जात आहे. विद्यार्थी आपल्या हक्कासाठी आणि शिक्षणातील पारदर्शकतेसाठी लोकशाही मार्गाने लढत आहेत. अशा विद्यार्थ्यांना धमकावणे किंवा त्यांच्यावर दबाव आणणे हे लोकशाहीला शोभणारे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
रशियन तेलावरून भारत-चीन अमेरिकेच्या निशाण्यावर
पतंजलीची विमा क्षेत्रात दमदार एंट्री
फेडच्या निर्णयानंतर सोन्याला झळाळी; चांदीत मात्र घसरण
व्याजदर स्थिर, पण धोक्याची घंटा कायम!
यावेळी त्यांनी सरकारला इशारा देत म्हटले की, विद्यार्थ्यांचा छळ आणि आंदोलन दडपण्याचे प्रयत्न तात्काळ थांबवावेत. अन्यथा देशभरातील विद्यार्थी, पालक आणि युवकांना सोबत घेऊन व्यापक आंदोलन उभारले जाईल. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर राजकारण न करता सरकारने संवाद साधून योग्य तोडगा काढावा, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, दिपके यांच्या कुटुंबीयांनीही धमक्या मिळाल्याचा दावा केला असून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
