पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांच्या दिल्लीतील निवासस्थानी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान मोठा गोंधळ उडाला. पत्रकार परिषद सुरू असतानाच एक तरुण अचानक सभागृहात घुसल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पप्पू यादव यांनी या घटनेनंतर गंभीर आरोप करत, “माझ्या हत्येचा कट रचला जात आहे,” असा दावा केला आहे.
पप्पू यादव यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित तरुण चाकू घेऊन त्यांच्या घरात शिरला होता आणि त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, उपस्थित समर्थकांनी वेळीच हस्तक्षेप करत त्या तरुणाला पकडले. या धक्कादायक घटनेनंतर समर्थक आणि त्या तरुणामध्ये झटापट झाली. या प्रकरणाची दखल घेत दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला असून, नेमके काय घडले याचा शोध घेतला जात आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे भारतात शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थांची तस्करी उधळली
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा: भारताची शानदार कामगिरी, ३९ पदके, चौथे स्थान
कृष्णा नदीच्या पुराचे पाणी वाईच्या महागणपती मंदिरात
हॉटेलच्या नॅपकिनवरच्या नकाशात ईशान्य भारतच गायब, खेळाडू संतापले
अलीकडेच संसद परिसरात राम मंदिर देणगी प्रकरणावर साधूच्या वेशात आंदोलन केल्यानंतर पप्पू यादव चर्चेत आले होते. त्या घटनेनंतर त्यांच्याविरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाल्याचे तसेच धमक्या मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडण्याची तयारी केली होती. तसेच संसद अधिवेशन सुरू होत असताना पुढील राजकीय रणनीतीही जाहीर करण्याचा त्यांचा मानस होता.
दरम्यान, पप्पू यादव यांच्या समर्थकांनी सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, जनता दरबाराच्या वेळी कोणत्याही प्रकारचे मेटल डिटेक्टर किंवा कडक सुरक्षा तपासणी नसल्यामुळे संबंधित व्यक्ती सहजपणे आत पोहोचली. हल्ला रोखताना काही समर्थक किरकोळ जखमी झाल्याचाही दावा करण्यात आला आहे.
या संपूर्ण घटनेमुळे राजधानी दिल्लीतील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांच्या तपासानंतरच हा खरोखर हल्ल्याचा प्रयत्न होता की इतर कोणते कारण होते, याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.







