आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी अमृतसरमध्ये माता सीता तसेच लव आणि कुश यांना समर्पित भव्य मंदिर उभारण्याची, मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेचा विस्तार करण्याची, पंजाबभर ‘हमारे राम’ या नाटकाचे सादरीकरण करण्याची आणि राज्यातील सर्व २२ शहरांमध्ये ‘एक शाम भगवान शिवजी के नाम’ या भक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्याची घोषणा केली.
केजरीवाल यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह अमृतसरमध्ये आयोजित ‘एक शाम भगवान शिवजी के नाम’ या कार्यक्रमात भक्तांसोबत भजनात सहभागी होत ही घोषणा केली.
सभेला संबोधित करताना केजरीवाल म्हणाले की, जालंधरमध्ये आयोजित पहिल्या कार्यक्रमाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर पंजाब सरकारने अमृतसरमध्ये ‘एक शाम…’ कार्यक्रमाचे आयोजन केले. ते म्हणाले, “भक्ती अधिक बळकट करण्यासाठी आणि लोकांना एकत्र आणण्यासाठी अशा प्रकारच्या भजन संध्यांचे आयोजन करणारे हे पहिलेच सरकार आहे.” तसेच त्यांनी जाहीर केले की हा कार्यक्रम आता पंजाबमधील सर्व २२ शहरांमध्ये आयोजित केला जाईल.
केजरीवाल यांनी घोषणा केली की, अमृतसरमधील भगवान वाल्मिकी मंदिराजवळ माता जानकी (सीता) आणि भगवान राम यांचे पुत्र लव आणि कुश यांना समर्पित मंदिर उभारले जाईल.
हे ही वाचा:
दारिद्र्याचा घाला… एकाच कुटुंबातील ४ जणांची आत्नहत्या
‘युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार’ नाट्याविष्काराचे आयोजन
मुंबईपासून काही तासांत… पावसाचं नंदनवन!
ते म्हणाले, “जगभरातील भगवान राम आणि माता जानकी यांच्या भक्तांसाठी ही आनंदाची बातमी आहे. ते पुढे म्हणाले की, अमृतसरला धार्मिक महत्त्व असून त्याचा रामायणाशीही घनिष्ठ संबंध आहे. शुक्रवारी अयोध्येतील राम मंदिरात दर्शन घेतलेल्या दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, भगवान वाल्मिकी यांनी अमृतसरमध्ये वास्तव्यास असताना रामायणाची रचना केली होती. तसेच माता जानकी यांनी याच ठिकाणी लव आणि कुश यांना जन्म दिला होता. भगवान रामांनी सोडलेल्या अश्वमेध यज्ञाच्या घोड्याला लव-कुश यांनी याच ठिकाणी एका झाडाला बांधले होते.
मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही या निर्णयाला पाठिंबा देत म्हटले, “पंजाब सरकार हे मंदिर उभारणार आहे. त्यामुळे या स्थळाशी संबंधित ऐतिहासिक वारसा जतन केला जाईल. पंजाबची भूमी सद्भावना आणि बंधुभावाची आहे. सर्व धर्मांचे लोक अमृतसरला भेट देतात.”
यावेळी केजरीवाल यांनी मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेच्या विस्ताराचीही घोषणा केली. ते म्हणाले, “नवीन मार्गांमध्ये सालासर, खाटू श्यामजी, हरिद्वार, ऋषिकेश, मथुरा आणि वृंदावन यांचा समावेश करण्यात आला आहे. या यात्रा सुमारे १ ऑगस्टपासून सुरू होतील आणि या योजनेअंतर्गत सुमारे १.५ लाख भाविकांना लाभ मिळेल.”
ते पुढे म्हणाले की, प्रवास, निवास आणि भोजनाचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार आहे. पायाभूत सुविधांच्या कामांचा उल्लेख करताना केजरीवाल म्हणाले की, पटियालामधील काली माता मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. ते म्हणाले, “सुमारे ८० कोटी रुपयांच्या खर्चातून हे पुनर्बांधणीचे काम केले जात असून ते सप्टेंबरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.”
सांस्कृतिक उपक्रमांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, ‘हमारे राम’ या नाटकाचे १ ऑगस्टपासून संपूर्ण पंजाबमध्ये सादरीकरण केले जाईल. ते म्हणाले, “या नाटकात भगवान राम आणि रावण यांच्यातील संवाद दाखवण्यात आला असून ते सर्वसामान्यांसाठी विनामूल्य असेल. मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले, “हे सरकार जनतेने निवडून दिले आहे आणि त्यांच्या श्रद्धा-विश्वासाचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे.”
